लगबग करती गडी मावळे
घर्मजले न्हाऊन निघाले
विश्वसंपुटी ब्रह्म कोंदले
देशाचे सौभाग्य सावळे
निजदेहाच्या कुशीत घेउन धन्य जाहला पेटारा
वसुदेवाचे कार्य आपुले अश्व जाणती भाव खरा!
पोचायाचे राजगडा
पहावयाचा सह्यकडा
नद्या नि नाले ओलांडा
विघ्नांची कोंडी फोडा
अमोल ठेवा पाठीवरचा जपुन न्यायचे तया घरा
वसुदेवाचे कार्य आपुले अश्व जाणती भाव खरा!
टपटप टपटप टाकित टापा तुरग दौडती भराभरा
एक्या पाठी राजयोगी तर
दुजा मिरवितो चिमणे सुंदर
मागे पळती गावे झरझर
अबोध काही मनास हुरहुर
बेहाय दौडुनी मुके जनावर भारुन टाकी चराचरा
वसुदेवाचे कार्य आपुले अश्व जाणती भाव खरा!
जय अलख निरंजन गोसावी
रूपे न भासती मायावी
प्रभुपाखर शिरी ती समजावी
विरणार खचित विघ्ने भावी
आत्मबळा अनुभविता शरिरी रोमरोम फुलतसे पुरा
वसुदेवाचे कार्य आपुले अश्व जाणती भाव खरा!
दिसला विंध्याचल, सह्याचल
गहिवरता नयनात उभे जल
दिसल्या गोदा तापी पवना
त्याच आपुल्या गंगा जमुना
कल्पिताहुनी नवलपूर्ण प्रत्यक्ष असे दिसतसे जगा
गजेंद्रमुक्ति पुन्हा पाहता गगन उणे झाले विहगा!
गगन उणे झाले विहगा!
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
No comments:
Post a Comment