स्त्री ही देवता मंदिरी!ध्रु.
पहिला मुजरा स्त्री जातीला
आद्यगुरूला माणुसकीला
रावणशाही झुगारण्याला
शिवबा शस्त्र धरी!१
स्वराज्य राहिल संतजनांचे
पतिव्रतांचे सति साध्वींचे
अपहरणाते विटंबनेते
कैसा सहन करी?२
रामायण वाचणे कशाला?
भारत श्रवणे तरी कशाला?
सती प्रतिष्ठा शिरोधार्य ती
कंकण शिवबा करी!३
लक्ष्मणरेषा जपणे जपणे
नारी देवी ती न खेळणे
शाप तिचा शासतो पातक्या
क्रोधहि अग्नीपरी!४
जातिधर्मनिरपेक्ष पाहणे
स्त्रीजातीते नित गौरवणे
दुवा तिचा जो मनापासुनी
शिरि सुमवृष्टी करी!५
नतमस्तक स्त्री जातीपुढती
तिला वंदने शतशत कोटी
सिंहासनि सच्छीला लक्ष्मी
अशी भावना धरी!६
स्वस्त्री वाचुनि अन्य भामिनी
त्या तर अपुल्या माताभगिनी
धर्मपुत्र अन् धर्मबंधु हा
नाते सुमधुर धरी!७
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
No comments:
Post a Comment