भजन करा स्मरण करा मोरयाचे
कारण ते दूर करा चिंतांचे! ध्रु,
श्रीगणेश जय गणेश घोष हा करा
एक देश एक वेश यत्न हा करा
संयम हे बीज असे सौख्याचे! १
विघ्नांचे काय मला येउ देत ती
ती सारी झेलाया निधडी छाती
राष्ट्र जगे संगरात दक्ष सदाचे! २
ढोल नि लेझीम खेळ गोपगड्यांचा
वेत्रचर्मयुद्ध ध्यास नवयुवकांचा
मैदानी खेळ दान करत यशाचे! ३
भारतात बंधुभाव नित्य असूू दे
हे मंगलमूर्ती दे वरच असा दे
निर्धार नि सतत यत्न शब्द खुणेचे! ४
कधि वादळ कधि पाउस धरणि हादरे
मी अजिंक्य मी अभेद्य भाव धरा रे
जे ठाके ठाम तेच राज्य गणांचे! ५
मंदिर हे जागतसे जिथे प्रार्थना
सोऽहं हे बाणाया ध्यानधारणा
संघटना नाव असे नविन युगाचे! ६
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२४.०८.१९९८
No comments:
Post a Comment