Tuesday, August 23, 2022

किती जगावे?


"मी देह" कल्पना फसवी
ती बंधनात मग गोवी!ध्रु.

मग कुठला आत्मानंद 
जाचतात निष्ठुर बंध
माया ही अक्षय रडवी!१

निष्ठेने घ्यावे नाम
श्रध्देने बनते काम
सद्गुरूच सोऽहं शिकवी!२

तू नकोस मोजू काळ
तुज नवीच नित्य सकाळ
भक्तीची गाणी गावी!३

जे प्रश्न तयाचे असती
ते तुजला कैसे सुटती?
"मी माझे" मनुजा शिणवी!४

तू लाव मनाला नेम
ये नामाचे मग प्रेम
त्या आत्मारामी रमवी!५

आईच मुला झोपविते
मांडीवर त्याला घेते
विश्वास प्रभूवर ठेवी!६

एकांती धरूनी नेट
घे भगवंताची भेट
श्रीराम जगाया शिकवी!७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०४.०७.१९८९

No comments:

Post a Comment