Saturday, June 28, 2025

इच्छा रामाची, वाटु दे इच्छा मज माझी

इच्छा रामाची, वाटु दे इच्छा मज माझी!ध्रु.
 
अभिमानाचे उतरो ओझे 
अता सरू दे मी पण माझे 
कधी पाळतो, वाटो मजला आज्ञा रामाची!१ 

नीतिबंधने मला रुचावी 
अंतरि भगवद्भक्ति रुजावी 
फुलुनी यावी, फुले सुगंधी दारी मोगऱ्याची!२ 

मने माझिया कणखर व्हावे 
घाव टाकिचे हसत साहावे
पाषाणातुनि मूर्ती उमटो मेघश्यामाची!३ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १८० (२८ जून) वर आधारित काव्य.

अभिमानाचे गाठोडे बाहेर ठेवून मगच रामाकडे जावे. मी कोण याची जाणीव जोपर्यंत राहते तोपर्यंत दुजेपण आलेच. अभिमान वाढवण्याकरता देवाकडे नाही जाऊ, दुसऱ्याचे वाईट व्हावे असे आपल्याला वाटले की आपला अभिमान वाढीला लागला आहे असे जाणावे. आपल्याला प्रिय तेवढीच आज्ञा आपण पाळतो हे बरे नव्हे. आपली व भगवंताची इच्छा एकच होणे हे परमार्थाचे सूत्र आहे. अगदी निस्वार्थ बुद्धीने केलेले कर्तव्य कधी वाया जात नाही. आपली मुलेबाळे ही देवाने आपल्याजवळ दिली आहेत, त्यांचे रक्षण करावे ते कर्तव्य होईल. पण त्यांच्या ठिकाणी आपलेपणा ठेवून सुखदुःख भोगणे मात्र पाप आहे. आपण भजनपूजन करू लागल्यावर त्याचा परिणाम आपल्यावर दिसला पाहिजे. जो शहाणा असेल त्यांनी समजून व जो अडाणी असेल त्याने श्रद्धेने बंधने पाळावीत. आपल्या स्वतःच्या मताबद्दल स्वतःस पूर्ण खात्री असावी, मनाने आपण खंबीर झाले पाहिजे.  सत्कर्माला विघ्ने फार येतात, त्यांना न जुमानता आपण सत्कर्म करावी. आचार व विचार ही दोन्ही जुळली म्हणजे उच्चारही तसाच येतो.

Friday, June 27, 2025

तरी समाधान पावशील..

जरी रामनाम प्रेमाने घेशील -
तरी समाधान पावशील!ध्रु.

लौकिकाची नको आस
नको मायामोह फास
नामजपे पैलतीर, सहज गाठशील!१

भले बुरे जाणुनि घेई
संतचरणि ठेवी डोई
नामदीप घेउनि हाती थेट पोचशील!२

नाम देत संतसंग
नामि रंगला श्रीरंग
आचरणी तत्त्व येता उजळणार शील!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १७९ (२७ जून) वर आधारित काव्य.

लौकिकासाठी केलेले कर्म कधीही समाधान देऊ शकत नाही. प्रपंचात सुख लाभावे म्हणून देवाचे करतो आणि लौकिकासाठी नीतिधर्माने वागतो. मग त्यातून शाश्वतचे सुख कसे लाभेल? चांगले काय, वाईट काय हे कळायला लागल्यापासून जो त्याप्रमाणे वागेल, त्याला खात्रीने परमार्थ साधेल. परमार्थ तीन पैकी कोणत्याही एका गोष्टीने साधू शकेल. एक म्हणजे देहाने साधूची संगत, दुसरी म्हणजे संतांच्या वाङमयाची संगत व त्याप्रमाणे पुढे आचरण व तिसरी म्हणजे भगवंताचे नाम घेतल्याने त्याची संगत आपल्याला अखंड लाभू शकेल. संतांनी सांगितले ते न संशय घेता विश्वासाने करणे ही पहिली पायरी व ते पुढे निश्चयाने, श्रद्धेने व प्रेमाने चालू ठेवणे ही शेवटची पायरी; हाच शाश्वत समाधानाचा मार्ग आहे.

देवाचा आठव पाडी देहाचा विसर!

देवाचा आठव पाडी देहाचा विसर!ध्रु.

ऐसा उपकार, करी रघुवीर
बुद्धि करी स्थिर, ध्यान हो गंभीर
नियम जगी शाश्वताचा प्रेमाची पाखर!१

करू अन्नदान,  स्मरू रामनाम
स्मरू रामनाम, ध्याऊ तेच ध्यान
अंतरात येऊनि राहे सखा रघुवीर!२

अंतरात राम, जपा रामनाम 
नाम हाचि साम, गायनी आराम 
संत वाढवीती साधकाचा धीर!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १७८ (२६ जून) वर आधारित काव्य.

परमार्थात नियम थोडा करावा, पण तो शाश्वताचा असावा.

Wednesday, June 25, 2025

नामस्मरणि रमावे!

परमार्थाच्या रस्त्यावरती हळूहळू चालावे! 
नामस्मरणि रमावे!ध्रु.

सद्‌ग्रंथाचे व्हावे वाचन 
वाचनांतुनी स्फुरो आचरण
तत्त्वाचरण घडावे!१

करु लागावे साधन आधी 
सरतिल आपोआप उपाधी 
सद्‌गुरुचरण धरावे!२ 

अन्न मुखांतुनि उदरी जाते
आचरणातुनि तत्त्व बाणते
भगवंताचे व्हावे!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १७७ (२५ जून वर आधारित काव्य)

केवळ काहीतरी वाचायचे म्हणून वाचन करू नये. अर्थ कळल्याशिवाय, पोथी वाचल्यासारखे नाही होणार. तसेच त्याचा अर्थ कळला, तितके तरी कृतीत आणण्याचा प्रयत्न करावा. मी जे करीत नाही ते प्रथम करायला सुरुवात करावी. साधन करू लागावे, सद्गुरूंची आज्ञा पाळावी म्हणजे सर्व काही होते. खरोखर परमार्थाचीच वाट अगदी सरळ आहे. प्रपंचाचा रस्ता मात्र डोंगराळ असून काटे कुटे यांनी भरलेला आहे. पोटात अन्न घालण्यासाठी जसे तोंड, त्याप्रमाणे परमार्थाला सदाचरण आवश्यक आहे. सदाचरण हा परमार्थाचा पाया आहे. आपण स्वतःच्या मुलाला जसे प्रेमाने घेतो, तसा परमार्थ करावा आणि आपण दुसऱ्याच्या मुलाला जसे घेतो तसा प्रपंच करावा. भगवंताच्या स्मरणात प्रपंच सुखाचा करणे हाच खरा परमार्थ.

Saturday, June 21, 2025

आपली श्रीगीतामाउली

कसे जगावे याची आहे सुंदर नियमावली 
आपली श्रीगीतामाउली ! ध्रु.

सुधारणा हो आपल्यापासुन
आपआपणा नियमित निरखुन
उद्धारा धावली!१

देहांतर मरणाला म्हणते 
आत्म्याचे अमरत्व सांगते 
सांत्वनास सजली!२

केविलवाणे कधी न व्हावे 
देहदुःख ते सुख समजावे 
वक्तृत्वे विनटली!३

मनावरी ठेवता नियंत्रण 
रोगांचे झडकरी विसर्जन
सूत्रबद्ध दिसली!४

निर्धाराने सगळे जमते 
नीती मुरता वृत्ति पालटे
विचार दीपावली!५
 
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(प्रसिद्धी - गीता दर्शन एप्रिल २००५)

आधार : दुःखमुक्त जीवनासाठी गीता
रा.रा. जांभेकर

Wednesday, June 18, 2025

पाहिजे परमार्थी गुप्तता!

पाहिजे परमार्थी गुप्तता!ध्रु

जे जे हातुनि घडते साधन
सद्गुरु घेती सगळे करवुन
जाणिव तारत स्वतः!१

भगवंताचे स्मरण प्रतिक्षण
करणे अपुली ओळख होऊन -
छंद हाच चित्ता!२

अन्याच्या नादी न लागणे
धैर्याने पाऊल टाकणे
जमण्या तद्रूपता!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १७० (१८ जून) वर आधारित काव्य.

वासनेच्या तावडीतून सुटणे फार कठीण आहे, वासनेला जिंकणे हे म्हणजे आपण मरून जाण्याइतके कठीण आहे. भगवंताजवळ "वास" ठेवला तरच वासना नष्ट होते. प्रपंचातील वासना बाहेर काढणे याचेच नाव परमार्थ. प्रपंचात प्रसिद्धीची जरुरी वाटते. त्याच्या उलट परमार्थात गुप्ततेची जरुरी लागते. परमार्थात गुप्ततेची गरज आहे. आपले साधन कोणाच्याही नजरेस न येईल अशी खबरदारी घ्यावी, कारण परमार्थाला दृष्ट फार लवकर लागते. आपल्या हातून जे साधन होत आहे ते सद्गुरु किंवा परमात्मा यांच्या कृपेने माझ्याकडून करवून घेतले जात आहे ही जाणीव ठेवावी. परमार्थात भगवंताचे स्मरण ठेवण्याचे काम आपल्या स्वतःलाच करायला पाहिजे, उगीच कोणाच्या नादी लागू नये. कोणाला फसू नका, कारण स्वतः फसणे हे जगाला फसविण्याइतकेच पाप आहे. ज्याचा प्रपंचात पाठीराखा परमात्मा आहे त्याचा तो प्रपंचच परमार्थ होतो.

Saturday, June 14, 2025

काळजीमुक्त जीवनाचे मंत्र

इछाशक्ती बळकट बनवी, 
फोल काळजी करू नको 
दे भिरकावुन काळजी चिंता, 
आज हातचा गमवु नको 

प्रभातसमयी करी प्रार्थना, 
शुभचिंतन तू सोडू नको 
जखम जाहली, हसत सोसली, 
काम हातचे टाकू नको 

ओत मनाचे कागदावरी 
भलेबुरे ते कसे असो
चिंता गेल्या पूर्ण लयाला 
दयाघना विसरणे नको

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
२६.११.२००४

(दै. सकाळ २५.११.२००४ गुरुवार मधील, दादा जे. पी. वासवानी यांच्या खालील सदरावर आधारित काव्य)

काळजीमुक्त जीवनाचे दहा मंत्र

१. काळजी करण्यातील फोलपणा लक्षात घ्या.
२. चिंता न करण्याइतकी इच्छाशक्ती तयार करा.
३. काळजी, चिंता दूर फेका.
४. एका दिवशी एकच दिवस जगा. 
५. दिवसाची सुरुवात प्रार्थनेने करा.
६. जीवनाची चांगली बाजू पहा.
७. प्रतिकूल परिस्थितीतही हसत रहा.
८. स्वतःला कामात गुंतवून ठेवा.
९. वाटणारी काळजी, चिंता एका कागदावर लिहून ती एका पेटीत टाका. आठवड्यातून ठराविक दिवशी ती पेटी उघडा. त्यातील बहुसंख्य चिंता तुम्ही काहीही न करता दूर झाल्याचे लक्षात येईल.
१०. देवाच्या चांगुलपणावर विश्वास ठेवा.

"कृष्ण, कृष्ण" बोलो!

"कृष्ण, कृष्ण" बोलो! ध्रु.

मनमंदिर में बैठे कबसे 
दर्शन को हैं अति अति तरसे 
तुम गीता गालो।१ 

क्या करना है? कैसे करना?
न रहे कुछभी क्षुद्र वासना 
वासुदेव चुन लो।२ 

आसन सुस्थिर हो जाएगा 
वदन सुमन सा खिल पाएगा
अनुभूति ले लो।३

पार्थ बनोगे सार्थ सुनोगे
कार्य करोगे, फल छोड़ोगे 
कृष्ण स्वयं बन लो।४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
१ अगस्त २००४ रविवार

Wednesday, June 4, 2025

भाग्यवंत तो..

भाग्यवंत तो राहि जयासी
भगवंताचे अनुसंधान!ध्रु.

देहबुद्धिचे मूळ वासना
द्वंद्व निर्मिते मनी वासना
ती निपटाया नाम जणू की रघुनाथाचा आहे बाण!१

प्रपंच जरि नेकीने केला
अभिमानाने बंधन ठरला
बंधन सुटण्या, शस्त्र एकले, भक्ती म्हणती तया सुजाण!२

जन्मा कारण अंति जी मती
राम असावा वचनी चित्ती
भगवद् भक्ती तनी मुरण्याते सोऽहं सोऽहं पूरक ज्ञान!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १५६ (४ जून) वर आधारित काव्य.

आपण प्रपंच तडीचा आणि परमार्थ सवडीचा मानतो.  प्रपंचात आम्ही काही पाप करीत नाही, मग परमार्थ तरी दुसरा कोणता राहिला? असे काही जण विचारतात.  प्रपंच सचोटीचा जरी असला तरी त्यात अभिमान असेल तर नाही तो परमार्थ होणार. जो विषयांना चिकटून राहतो त्याला त्यांचे सुखदुःख सोसणेच भाग असते. राम कर्ता म्हटल्याशिवाय, किंवा अभिमान सोडल्याशिवाय परमार्थ नाही साधणार. मी देही म्हणू लागलो यात अभिमान आला. देहबुद्धीला कारण म्हणजे वासना. वासना हे सर्वांचे मूळ आहे. जो त्या वासनेला मारतो तोच परमार्थाला लायक होतो. भगवंताचे सतत अनुसंधान हाच वृत्ति स्थिर होण्याचा एकमेव उपाय आहे.