परमार्थाच्या रस्त्यावरती हळूहळू चालावे!
नामस्मरणि रमावे!ध्रु.
नामस्मरणि रमावे!ध्रु.
सद्ग्रंथाचे व्हावे वाचन
वाचनांतुनी स्फुरो आचरण
तत्त्वाचरण घडावे!१
करु लागावे साधन आधी
सरतिल आपोआप उपाधी
सद्गुरुचरण धरावे!२
अन्न मुखांतुनि उदरी जाते
आचरणातुनि तत्त्व बाणते
भगवंताचे व्हावे!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १७७ (२५ जून वर आधारित काव्य)
केवळ काहीतरी वाचायचे म्हणून वाचन करू नये. अर्थ कळल्याशिवाय, पोथी वाचल्यासारखे नाही होणार. तसेच त्याचा अर्थ कळला, तितके तरी कृतीत आणण्याचा प्रयत्न करावा. मी जे करीत नाही ते प्रथम करायला सुरुवात करावी. साधन करू लागावे, सद्गुरूंची आज्ञा पाळावी म्हणजे सर्व काही होते. खरोखर परमार्थाचीच वाट अगदी सरळ आहे. प्रपंचाचा रस्ता मात्र डोंगराळ असून काटे कुटे यांनी भरलेला आहे. पोटात अन्न घालण्यासाठी जसे तोंड, त्याप्रमाणे परमार्थाला सदाचरण आवश्यक आहे. सदाचरण हा परमार्थाचा पाया आहे. आपण स्वतःच्या मुलाला जसे प्रेमाने घेतो, तसा परमार्थ करावा आणि आपण दुसऱ्याच्या मुलाला जसे घेतो तसा प्रपंच करावा. भगवंताच्या स्मरणात प्रपंच सुखाचा करणे हाच खरा परमार्थ.
No comments:
Post a Comment