जरी रामनाम प्रेमाने घेशील -
तरी समाधान पावशील!ध्रु.
तरी समाधान पावशील!ध्रु.
लौकिकाची नको आस
नको मायामोह फास
नामजपे पैलतीर, सहज गाठशील!१
भले बुरे जाणुनि घेई
संतचरणि ठेवी डोई
नामदीप घेउनि हाती थेट पोचशील!२
नाम देत संतसंग
नामि रंगला श्रीरंग
आचरणी तत्त्व येता उजळणार शील!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १७९ (२७ जून) वर आधारित काव्य.
लौकिकासाठी केलेले कर्म कधीही समाधान देऊ शकत नाही. प्रपंचात सुख लाभावे म्हणून देवाचे करतो आणि लौकिकासाठी नीतिधर्माने वागतो. मग त्यातून शाश्वतचे सुख कसे लाभेल? चांगले काय, वाईट काय हे कळायला लागल्यापासून जो त्याप्रमाणे वागेल, त्याला खात्रीने परमार्थ साधेल. परमार्थ तीन पैकी कोणत्याही एका गोष्टीने साधू शकेल. एक म्हणजे देहाने साधूची संगत, दुसरी म्हणजे संतांच्या वाङमयाची संगत व त्याप्रमाणे पुढे आचरण व तिसरी म्हणजे भगवंताचे नाम घेतल्याने त्याची संगत आपल्याला अखंड लाभू शकेल. संतांनी सांगितले ते न संशय घेता विश्वासाने करणे ही पहिली पायरी व ते पुढे निश्चयाने, श्रद्धेने व प्रेमाने चालू ठेवणे ही शेवटची पायरी; हाच शाश्वत समाधानाचा मार्ग आहे.
No comments:
Post a Comment