Thursday, January 15, 2015

ऐका कहाणी गीतेची - अध्‍याय अठरावा – मोक्षसंन्‍यासयोग


अध्‍याय अठरावा – मोक्षसंन्‍यासयोग

ऐकव गीते तुझी कहाणी, निर्मळ निर्मळ तुझी वाणी
धर बाळा हातात लेखणी, लिही थोडक्‍यात शहाण्‍यावाणी
शब्‍द जुने, अर्थ नवा लावत जावे छंद हवा
मीच अर्जुन, मीच कृष्‍ण संवाद आपल्‍याशी व्‍हावा
ठरल्‍या वेळी ठरल्‍या जागी बसता भरभर सुचत जाते
जाते फिरता मनबद्धींचे पीठ बारीक भुरुभुरु पडते
कर्म सतत करीत राहा, फलत्‍याग करीत राहा
वाईट कर्मे टाकून द्यावी, चांगली कर्मे करीत जावी
जगाला नाही सुधारायचे, आपण आतून बदलायाचे
विवेक, विचार बंधू आपले, सल्‍ले देतात नेहमी चांगले
राजस तामस सोडून द्यावे, सात्त्विक ते ते करीत जावे
मी कर्ता ही भ्रांति नको, हवेच फळ मज हाव नको
कोणी शिक्षक, किसान कोणी, कोणी सैनिक व्‍यापारी
जो तो परि उद्योजक असतो मने रंगला हरिनामी
जे होते ते शुभच चांगले, मी श्रीहरिचा हरि माझा
भगवंताची पाळिन आज्ञा हट्ट न दुसरा कधि माझा
माथ्‍यावरचे ओझे उतरे, आनंद झाला पार्थाला
चापबाण करि पुनरपि धरले, उधाण आले शौर्याला
संजय सांगे हुबेहुब तो प्रसंग झाला साकार
मानावे किती श्रीव्‍यासांचे आभारावर आभार
विषादातुनी प्रसादाकडे वाटचाल संवादाची
निराशेतुनी फुलवी आशा किमया कैसी कृष्‍णाची
वाचायाला आचरणाला ऐका कहाणी गीतेची ऐका कहाणी गीतेची


ऐका कहाणी गीतेची - अध्‍याय सतरावा – श्रद्धात्रयविभागयोग


अध्‍याय सतरावा – श्रद्धात्रयविभागयोग

ऐकव गीते तुझी कहाणी, निर्मळ निर्मळ तुझी वाणी
वर्तन घेरे बाळा बांधून, आनंदच वाटेल जीवनी
कणकणाने, क्षणक्षणाने साधकांत होशील अग्रणी
देहाचे आरोग्‍य राख तू, सृष्‍टीचे तू करी निरीक्षण
जगावयाला लाग बालका समुदायासह अपुले जीवन
ओघे आले काम यज्ञ ते, दान सवयीचे होवो तुजला
सहकाराविण प्रगती नसते, पुरवावे बल संघटनेला
आहाराविण शक्‍ती कुठली भोजन सात्त्विक तुझे असूदे
सामाजिक सेवा घेण्‍यास्‍तव कणाकणाने काया झिजु दे
मिताहार, मितनिद्रा आणिक रंजन सात्विक मनामनांचे
सुखदु:खांची देवघेव नित बंधारे ना अहंपणाचे
कर्म करांनी, नाम मुखाने राम जीवनी भरला अनुभव
जे माझे ते सर्व जनांचे प्रांजळपण हे अमोल वैभव
आचाराची जोड विचारा नित्‍य नवनवे प्रयोग करणे
चूक आपली ध्‍यानी येता सुधारून ती स्‍वयेच घेणे
समाजात संतोष नांदता एकरूप होऊया सगळे
रामराज्‍य का श्रीरामाचे याहून काही असे वेगळे?
दुर्योधन जर ठरे अडथळा कठोरतेने दूर करावा
बलशाली बलहीन यामधे नकोच संशय नको दुरावा
समाज व्‍यक्‍ती विरोध नाही नेता सोयीसाठी असतो
आज्ञांकितता, प्रेमळ श्रद्धा अनुयायांचा खाक्‍या बनतो
सूत्रमय उपदेश विखरला पानोपानी श्रोते व्‍हावे सावधान
ऐका कहाणी गीतेची ऐका कहाणी गीतेची
                                   


ऐका कहाणी गीतेची - अध्‍याय सोळावा – दैवासुरसंपद्विभाग योग


अध्‍याय सोळावा – दैवासुरसंपद्विभाग योग

ऐकव गीते तुझी कहाणी, निर्मळ निर्मळ तुझी वाणी
आत्‍मरुप असता आपण देहापुरतेच पाहु नका
कर्म, ज्ञान, भक्ती असले नसते कप्‍पे पाडू नका
समग्र जीवन आहे योग हरिशी नाते जोडाया
एक एक दैवी गुण जोडा घाला भरभक्‍कम पाया
सद्गुण दुर्गुण कट्टर वैरी सुरासुरांचा संग्राम
पराक्रमाने पुण्‍यापाठी सदैव ठाकावे ठाम
सत्‍यमेव जयते ना चाले धूर्तांची फसवाफसवी
दुष्‍टांचे निर्दालन हेही शुद्ध अहिंसा समजावी
विवेक हृदयी ज्‍याच्‍या त्‍याच्‍या विचार सुदर बुद्धीत
आचाराने लहान थोरां तत्‍त्‍वे उत्‍म पटतात
जीवन म्‍हणजे प्रयोगशाळा, बुरे टाकुनी भलेच घ्‍या
संस्‍कारांनी घडतो मानव, तप आचरुनी उजळू द्या
संस्‍कृति सत्‍ता संपत्‍तीवर केंद्रित आसुरी संपत्‍ती
सदाचारणा सज्‍जन सोडत त्‍यांची दैवी संपत्‍ती
स्‍वर्ग नरक या दोन अवस्‍था सांग मानवा काय हवे
असुर व्‍हायचे का सुर तुजला, तुझे तूच ते ठरवावे
दैवी गुण रे तुझ्यात वसती, खेद नको अर्जुना तुला
तुझ्यात मी, माझ्यात तूच तू याचा अनुभव येत मला
काम क्रोध नरकाची दारे दक्ष रहा तू दूर राहा
संयम पाळून हो आनंदी स्‍वरुपास नित पहापहा
जननीहून ही वाहे चिंता अपुल्‍या पोराबाळांची

म्‍हणून आवर्जून जन आपण ऐका कहाणी गीतेची ऐका कहाणी गीतेची 

ऐका कहाणी गीतेची - अध्‍याय पंधरावा – पुरुषोत्‍तम योग


अध्‍याय पंधरावा – पुरुषोत्‍तम योग

ऐकव गीते तुझी कहाणी, निर्मळ निर्मळ तुझी वाणी
जे सांगते ते ऐकत जा, ज्ञान कृतीतून दाखवत जा
सुखदु:खी सम रहावयाचे, आसक्‍तीला जिंकायाचे
रजस्‍तमांना टाकायाचे, सात्विक वर्तन तर सवयीचे
त्रिगुणांनी जे असे पोसले बघता बघता झाड वाढले
खाली फांद्या वरी मुळे ज्‍या, झाड आजवर कुणा न दिसले 
अश्‍वत्‍थाने नभ झाकळले, तिमिराने मन फार डहुळले
असंगशस्‍त्राने तू छेदी, आसक्‍तीला पार पिटाळी
यत्‍न करावा भक्‍तीसह रे ज्ञान येत मग शोधत शोधत
शांतिसुखाची जन्‍मभरी मग लाभे तुजला अखंड सोबत
चिखलातुन जे वरती आले कमळ सुगंधी स्‍वच्‍छ सोवळे
पवित्रता घे, अलिप्‍तता घे यत्‍ने मानव देव जाहले
जुने जातसे, नवे येतसे, नश्‍वरताही आहे सुंदर
जमीन निघते आधी तापून म्‍हणून जलधारा त्‍या सुखकर
सृष्‍टी देते शिक्षण सगळे, प्रेमपूर्ण करवूनि घे सेवा
शेती, उद्यम, व्‍यापारातही आनंदच देवांच्‍या देवा
कर्मातुनि श्रीहरिचे पूजन सर्वच कर्मे अतिशय मंगल
अवघे जीवन व्‍हावे हरिमय उदात्‍त, उन्‍नत, अतीव सोज्‍वळ
नाही चिंता, नाही भीती, परिग्रहांचे नावच पुसले
आता चलावे त्‍याच पथावर ज्‍याच्‍यावरुनी संत चालले
टिळक-आगरकर, बापू तात्‍या, द्वैत न कोठे नावाला
मार्ग वेगळे तरी पो‍चवित निश्चित एका गावाला
श्रवणाने चिंतना चालना कास धरा जिज्ञासेची
निमित्‍त केवळ लेखक समजा, ऐका कहाणी गीतेची ऐका कहाणी गीतेची



ऐका कहाणी गीतेची - अध्‍याय चौदावा – गुणत्रयविभागयोग


अध्‍याय चौदावा – गुणत्रयविभागयोग

ऐकव गीते तुझी कहाणी, निर्मळ निर्मळ तुझी वाणी
बाळांनो मज कौतुक वाटे, जिज्ञासु श्रवणोत्‍सुक श्रोते
या देहाची बेडी बनते आत्‍म्‍याला खालीच खेचते
देह विनाशी, अनंत आत्‍मा हे जाणे तो खरा महात्‍मा
सुखदु:खांच्‍या झंझावाती धैर्यवंत ना उडून जाती
जन्‍ममरण आत्‍म्‍याला नाही, देह परंतु येई जाई
सहनशीलता विवेक तैसा यांचा धरणे सदा भरवसा
मुक्‍त कराया बद्ध जनांना कारागारी कृष्‍ण जन्‍मला
प्रकृति पुरुषांचे जे नाते भल्‍याभल्‍यांना थक्कित करते
एक आवली दुजा तंकोबा जरी न पटते भक्ति न आटे
तीन गुणांनी व्‍याप्‍त प्रकृती पुरुषापासून दूर करावी
यासाठी तर नित्‍य साधके सोहं ची साधना स्‍मरावी
तमोगुणावर मात कराया परिश्रमाची कास धरावी
आळसरुपी कली न शिरतो क्षणोक्षणी काळजीच घ्‍यावी
अनवधान उत्‍पन्‍न जाहले येथे चुकले, तेथे चुकले
आळस निद्रा जिंकुन घ्‍यावी, तमोगुणावर मात करावी
लोभ वाढला कर्मासक्‍ती, हाव हावरी फरफट करते
रजोगुणी चंचल मुलखाचा त्‍याची शक्‍ती वाया जाते
स्‍वाभाविक जो धर्म तयाचे आचरणाने लाभे वैभव
सात्विक कर्ता सहज जपतसे प्रौढपणातहि अपुले शैशव
मायपित्‍यांची सेवा करुया भुकेल्‍यास प्रेमाने भरवू
सात्विकवृत्‍ती सहज बनू द्या, अहंकार ना कोठे मिरवू
आत्‍मज्ञानच मिळवायाचे, या ध्‍येया ना विसरायाचे
शरीर जोवर तोवर कर्मही ना कोणाला सुटावयाचे
चला भक्तिचा धरा आसरा तरावयाला दुस्‍तर माया
जे कळले ते आधी आचरुन हळूहळू लागा सांगाया
कधी गाऊन, बोलून, वाचून वा आठवून

सांगा कहाणी गीतेची,  ऐका कहाणी गीतेची ऐका कहाणी गीतेची

ऐका कहाणी गीतेची - अध्‍याय तेरावा – क्षेत्रक्षेत्रज्ञविभाग योग


अध्‍याय तेरावा – क्षेत्रक्षेत्रज्ञविभाग योग

ऐकव गीते तुझी कहाणी, निर्मळ निर्मळ तुझी वाणी
मी तर आहे वाहते पाणी तहान भागवा असा कोणी
देह वेगळा, आत्‍मा वेगळा नका नसता करु घोटाळा
देहदु:ख सुख मानावे खुशाल जगती हिंडावे
माझा उपयोग जगण्‍याकरिता माझा उपयोग मरण्‍याकरिता
कर्म करावे फळ टाकावे अनिकेता घर विश्‍वच व्‍हावे
असार टाकून सारच घ्‍यावे आत्‍म्‍याचे त्‍या पूजन व्‍हावे
देह नव्‍हे मी धोका नित्‍यच आत्‍मा मी हा अनुभव साच
देहा नापरि निंदायाचे साधन आहे ते कर्माचे
मी परमात्‍मा, तू परमात्‍मा, तो परमात्‍मा समज पटावी
मधुर मधुर हरिची मुरली ज्‍याच्‍या त्‍याच्‍या कानी यावी
देहासक्‍ती वाढत जाणे मोहकर्दमी रुतत राहणे
मरणभयाला भिरकावून द्या जरा मोकळी हवा खेळु द्या
या देहा जर क्षेत्र म्‍हणावे क्षेत्रज्ञच आत्‍मा समजावे
मी देहाहून पूर्ण निराळा हे जाणे तो पूर्ण मोकळा
दोन घडीचा डावच जीवन खेळू जावू विसरुन मीपण
साध्‍य नि साधन फरक कळूदे सुधारणा वृत्‍तीत घडू दे
श्रीहरिची करताना भक्‍ती प्रल्‍हादा ना शिवली भीती
भले बुरे ते आत्‍मा जाणे त्‍याच्‍या आज्ञेपर‍ी वागणे
यश मिळवावे, श्रेय न घ्‍यावे जनार्दनाला ते अर्पावे
अभय हवे, नम्रता हवी गुण बाणावे ते दैवी
तीच खरी संपत्‍ती बाळा जीवनात या जोडावी
संवादाची रुची आगळी वाढत जाते कळता गीता
अशी कहाणी या गीतेची रंगत जाते श्रवणा बसता

जगण्‍यासाठी उमेद येण्‍या ऐका कहाणी गीतेची ऐका कहाणी गीतेची 

Sunday, January 11, 2015

ऐका कहाणी गीतेची - अध्‍याय बारावा – भक्तियोग


अध्‍याय बारावा – भक्तियोग

ऐकव गीते तुझी कहाणी, निर्मळ निर्मळ तुझी वाणी
भक्तिरसाचा महिमा येथे स्‍वयेच गातो भगवंत
भक्‍ती मुरता अंतरात मग काय नि कसलीशी खंत
अंतरात भरला ओलावा अध्‍यायच अमृतधार
आतुन स्‍फुरते नाम अनावर मनोमलिनता जाणार
उंबरठ्याचा अवघड घाटहि तुकया वाणी ओलांडी
हरिपाठाची ऐसी महती वानू जाता हो कोंडी
देह भले हा राहो जावो कोण तयाची तमा करी
भाविकतेने गाता गाथा जो तो होतो वारकरी
अवघे वीसच श्‍लोक यातले अभ्‍यासक पावे विश्राम
सुजाण श्रोता जो तो अर्जुन श्रवणामध्‍ये भेटे श्‍याम
जे करतो देवाचे कार्यच असा बाळगा मनि विश्‍वास
नामांकित मग करून सोडा सगळे अपुले श्‍वासोच्‍छवास
सगुण नि निर्गुण उभय विलक्षण समजुन घ्‍या ते उमजेल
भक्तिपथाने चलाच पुढती वाट बघे तो गवसेल
कृष्‍ण कृष्‍ण जय लय सांभाळा मधेच गर्जा हरी हरी
पार्थसारथी तोच आपली नाव लावितो पैलतिरी
फुले मोगरा ज्ञानोबाचा, वांगी कवळी सावत्‍याची
रसाळ वाणी तुकयाची, घ्‍या संगत आता नाम्‍याची
गद्य असे का पद्य न ठावे तो सांगे ते लिहित बसे
भक्‍तीमध्‍ये भिजला कवि मग गात सुटे जमतसे तसे
सारी चिंता भगवंताला, नको मनामधि संसार
सोहं  मार्जन सडा गायने, आपण स्‍वागत करणार
मेंदीसम आली रंगाला आता महती भक्‍तीची
घराघरातुन, वाचा ऐका वाटा कहाणी गीतेची
ऐका कहाणी गीतेची ऐका कहाणी गीतेची


ऐका कहाणी गीतेची - अध्‍याय अकरावा – विश्‍वरुपदर्शनयोग


अध्‍याय अकरावा – विश्‍वरुपदर्शनयोग

ऐकव गीते तुझी कहाणी, निर्मळ निर्मळ तुझी वाणी
अर्जुनाला ओढ लागली विश्‍वरुप दर्शनाची
पुरता नव्‍हता झाला सराव तरी कसास उतरायाची
लाडका इतका भगवंताचा तो जे मागे माता पुरवी
आई बाळवेडी इतकी क्षणात विराट रुप दावी
कृष्‍णाहृदयी पार्थ होता, पार्थाच्‍या मनि कृष्‍ण रमला
तुझ्यात मी माझ्यात तू रंगा आला जणू भोंडला
जो विराट तोच तर सूक्ष्‍म लहान मूर्तीत पूर्ण दिसतो
झपाटलेला अर्जुन तरी जगावेगळे मागत सुटतो
स्‍थलाच्‍याही पलीकडे, कालाच्‍याही पलीकडे पहाणार कसे?
अंतच लागे ना सृष्‍टीचा, पार नकळतो काळाचा
विराट रुप डोळ्यात मावेना, मनात भरेना
त्‍याच्‍या सारखे देखणे तेच भयाणही तेच
प्रत्‍येक वस्‍तूत ईश्‍वर दिसला म्‍हणजे झालं
कर्ता करविता तो जगदीश पटलं म्‍हणजे झालं
कुठून मागितलं विश्‍वरुपदर्शन असेच झाले पार्थाला
बोबडी वळली, घाम फुटला धीर न उरला पहायला
लहानात महान बघता येते, भाव हवा दृष्‍टी हवी
आत बाहेर व्‍यापून उरला ऐसी शहाणी समजूत हवी
आपल्‍यापुरता सगुणच बरा, चालता बोलता देव खरा
आस्तिक्‍याला, सद्भावाला वासुदेव श्रीकृष्‍ण बरा
केव्‍हा तरी जायचेच आहे, कोणीतरी पाहतोच आहे
वाईट का मग बोला वागा अकरावा अध्‍याय सांगुन राहे
सौम्‍य मधुर रुप दाखवून हरी अर्जुना देतो धीर
तुम्‍हा बालका सांगत जाता मी झालो नकळत गंभीर
भक्तिभाव दृढ होण्‍यासाठी ऐका कहाणी गीतेची ऐका कहाणी गीतेची