Thursday, January 15, 2015

ऐका कहाणी गीतेची - अध्‍याय चौदावा – गुणत्रयविभागयोग


अध्‍याय चौदावा – गुणत्रयविभागयोग

ऐकव गीते तुझी कहाणी, निर्मळ निर्मळ तुझी वाणी
बाळांनो मज कौतुक वाटे, जिज्ञासु श्रवणोत्‍सुक श्रोते
या देहाची बेडी बनते आत्‍म्‍याला खालीच खेचते
देह विनाशी, अनंत आत्‍मा हे जाणे तो खरा महात्‍मा
सुखदु:खांच्‍या झंझावाती धैर्यवंत ना उडून जाती
जन्‍ममरण आत्‍म्‍याला नाही, देह परंतु येई जाई
सहनशीलता विवेक तैसा यांचा धरणे सदा भरवसा
मुक्‍त कराया बद्ध जनांना कारागारी कृष्‍ण जन्‍मला
प्रकृति पुरुषांचे जे नाते भल्‍याभल्‍यांना थक्कित करते
एक आवली दुजा तंकोबा जरी न पटते भक्ति न आटे
तीन गुणांनी व्‍याप्‍त प्रकृती पुरुषापासून दूर करावी
यासाठी तर नित्‍य साधके सोहं ची साधना स्‍मरावी
तमोगुणावर मात कराया परिश्रमाची कास धरावी
आळसरुपी कली न शिरतो क्षणोक्षणी काळजीच घ्‍यावी
अनवधान उत्‍पन्‍न जाहले येथे चुकले, तेथे चुकले
आळस निद्रा जिंकुन घ्‍यावी, तमोगुणावर मात करावी
लोभ वाढला कर्मासक्‍ती, हाव हावरी फरफट करते
रजोगुणी चंचल मुलखाचा त्‍याची शक्‍ती वाया जाते
स्‍वाभाविक जो धर्म तयाचे आचरणाने लाभे वैभव
सात्विक कर्ता सहज जपतसे प्रौढपणातहि अपुले शैशव
मायपित्‍यांची सेवा करुया भुकेल्‍यास प्रेमाने भरवू
सात्विकवृत्‍ती सहज बनू द्या, अहंकार ना कोठे मिरवू
आत्‍मज्ञानच मिळवायाचे, या ध्‍येया ना विसरायाचे
शरीर जोवर तोवर कर्मही ना कोणाला सुटावयाचे
चला भक्तिचा धरा आसरा तरावयाला दुस्‍तर माया
जे कळले ते आधी आचरुन हळूहळू लागा सांगाया
कधी गाऊन, बोलून, वाचून वा आठवून

सांगा कहाणी गीतेची,  ऐका कहाणी गीतेची ऐका कहाणी गीतेची

No comments:

Post a Comment