Sunday, January 11, 2015

ऐका कहाणी गीतेची - अध्‍याय अकरावा – विश्‍वरुपदर्शनयोग


अध्‍याय अकरावा – विश्‍वरुपदर्शनयोग

ऐकव गीते तुझी कहाणी, निर्मळ निर्मळ तुझी वाणी
अर्जुनाला ओढ लागली विश्‍वरुप दर्शनाची
पुरता नव्‍हता झाला सराव तरी कसास उतरायाची
लाडका इतका भगवंताचा तो जे मागे माता पुरवी
आई बाळवेडी इतकी क्षणात विराट रुप दावी
कृष्‍णाहृदयी पार्थ होता, पार्थाच्‍या मनि कृष्‍ण रमला
तुझ्यात मी माझ्यात तू रंगा आला जणू भोंडला
जो विराट तोच तर सूक्ष्‍म लहान मूर्तीत पूर्ण दिसतो
झपाटलेला अर्जुन तरी जगावेगळे मागत सुटतो
स्‍थलाच्‍याही पलीकडे, कालाच्‍याही पलीकडे पहाणार कसे?
अंतच लागे ना सृष्‍टीचा, पार नकळतो काळाचा
विराट रुप डोळ्यात मावेना, मनात भरेना
त्‍याच्‍या सारखे देखणे तेच भयाणही तेच
प्रत्‍येक वस्‍तूत ईश्‍वर दिसला म्‍हणजे झालं
कर्ता करविता तो जगदीश पटलं म्‍हणजे झालं
कुठून मागितलं विश्‍वरुपदर्शन असेच झाले पार्थाला
बोबडी वळली, घाम फुटला धीर न उरला पहायला
लहानात महान बघता येते, भाव हवा दृष्‍टी हवी
आत बाहेर व्‍यापून उरला ऐसी शहाणी समजूत हवी
आपल्‍यापुरता सगुणच बरा, चालता बोलता देव खरा
आस्तिक्‍याला, सद्भावाला वासुदेव श्रीकृष्‍ण बरा
केव्‍हा तरी जायचेच आहे, कोणीतरी पाहतोच आहे
वाईट का मग बोला वागा अकरावा अध्‍याय सांगुन राहे
सौम्‍य मधुर रुप दाखवून हरी अर्जुना देतो धीर
तुम्‍हा बालका सांगत जाता मी झालो नकळत गंभीर
भक्तिभाव दृढ होण्‍यासाठी ऐका कहाणी गीतेची ऐका कहाणी गीतेची



No comments:

Post a Comment