Friday, January 2, 2015

ऐका कहाणी गीतेची : अध्याय पाचवा - कर्मसन्यास योग



अध्याय पाचवा - कर्मसन्यास योग

ऐकव गीते तुझी कहाणी, निर्मळ निर्मळ तुझी वाणी 
नको गोंधळू व्यर्थच पार्था, सन्यासयोग दोन्ही सारखे 
एक जरी हा अनुसरला ब्रह्मभू्त व्हावे सुखे 
कर्मयोग ऐसा काही अंगी बाणवे कौशल्य 
करून अकर्ता होता येते जगता वाटे साफल्य 
मने मलाच जोडून घ्यावे, विसरावे ना, यासाठी 
प्रसन्नचित्ते रंगून जावे, मिसळावे रे हरिपाठी
रणांगण छे क्रीडांगण, जीवन आहे खुली शाळा 
ज्याचे त्याने शिकत जावे अनुभव देतो साह्याला 
आसक्ती जर आतून सुटली पाप कसले पुण्य कसले 
पाण्यामध्ये असले तरी कमलपत्र नसते ओले 
कर्म सहजच घडू द्यावे तने मने वा बुद्धीने 
आत्मशुद्धी व्हावी म्हणून साधन लाभे भाग्याने 
हातचे सोडून पळत्यामागे धावते का रे कधी कुणी 
ओघे आले काम करावे ईश्वर कर्ता घे ध्यानी 
प्रेक्षक कसा साक्षी असतो, नाटक आहे विसरत नसतो 
तोच भाव जागा ठेवा, निरासक्त निर्मळ असतो 
स्वभावत: बदलत जाणे सृष्टिचक्र चालू राहे 
जन्म विकास जरा विनाश हाही क्रम तसाच आहे 
पापपुण्य यांना कधी परमात्मा तो कारण नाही 
स्वभाव जैसा वर्तन तैसे सुधारणेला वाव राही 
मनानेच या देहापासून ज्याने त्याने दूर जावे 
द्वंद्वे सारी ओलांडूनिया आत्मानंदी दंग व्हावे 
इथून तिथून विश्वामध्ये चैतन्याचा खेळ आहे 
हे जाणले ज्याने तो तो आनंदाचा स्वामी आहे 
चला साधना करू सारे मनोबल वाढू दे 
संवादाची रुची घेत ऐका कहाणी गीतेची, ऐका कहाणी गीतेची

No comments:

Post a Comment