अध्याय दहावा – विभूतियोग
ऐकव गीते तुझी कहाणी, निर्मळ निर्मळ तुझी वाणी
कळो न कळो आपणा काही संस्कृत गीता वाचावी
श्रीकृष्णाची खरी बासरी मन लावून ऐकावी
ईश्वर आहे पूर्ण भरवसा डोळे झाकून बाळगावा
जे घडते ते कल्याणाचे शमेल दु:ख वणवा
श्रम करा, भाकरी मिळेल स्वये योग्यता वाढवावी
गोड बोला, मित्र जोडा मिळकत नकळत वाढावी
डोळस व्हावे ईश्वर दिसे ज्ञानेशाच्या ओवीत
सूर्यामध्ये, मेघात, गिरीराजांच्या रांगात
रोगट मन मोठेच विघ्न नाम औषध सेवत जा
देव ऐकतो आपले समजून त्याला दु:ख सांगत जा
आईत प्रेम, बापात प्रेम, भावंडातहि भरले प्रेम
दर्शन, पूजन, कीर्तन श्रवण पाळत जावा नित्य नेम
माझे चांगले कधी न म्हणता चांगले आपले म्हणत जा
मुलांबरोबर खेळात रंगता शैशव चांगले जपत जा
गंगा मरता तोंडात गेली पाप सारे धुवून गेले
शीतल वारे देहा शिवले ताप सारे पळून गेले
दृष्टी बदला, बदले सृष्टी गीताई ही सांगून जाते
चाली सुचती, नव्या सोप्या मन गीता गात बसते
शौर्य, धैर्य, त्याग औदार्य यात ईश्वर वसला आहे
सुखात जैसा दु:खातही पण आनंद भरून राहिला आहे
कोकिळ कावळा दोन्हीत कृष्ण कृष्णपणे आहे भरून
गीतेचा हा विभूतियोग यारे सारे घ्या शिकून
संवादाची रुची घेत ऐका कहाणी गीतेची ऐका
कहाणी गीतेची
No comments:
Post a Comment