Monday, January 5, 2015

ऐका कहाणी गीतेची : अध्याय सहावा - आत्मसंयम योग


अध्याय सहावा - आत्मसंयम योग 

ऐकव गीते तुझी कहाणी, निर्मळ निर्मळ तुझी वाणी
मुलांनो मी तर तुमची माता मला वाटते यात धन्यता 
व्यवहार शुद्ध निर्मळ व्हावा समाधान शांती अक्षय ठेवा
तुमच्या घरीच मी येते हात धरून पुढे नेते 
अडाण्यातला असो अडाणी त्याला समजे गीतावाणी 
माझा उद्धार मी करीन ऐसी बाळगा काही हिंमत 
विशाल करा मनास तुमच्या वाढवा आपली आपण किंमत 
हीन भावना मारून टाकते कल्पनांचे पंख तोडते 
वाढवा थोडा आत्मविश्वास टिकाव धराल तुम्ही हमखास 
साधन करायचे याचसाठी एकाग्रता साधण्यासाठी 
भगवंतावर असीम निष्ठा प्रयत्नांची पराकाष्ठा 
चित्ताची जी एकाग्रता बुद्धीची ती तेजस्विता 
आत्मा बलवान झाला पाहिजे तेज तनी फाकले पाहिजे 
आत्म्यात मन रोवून द्यावे आतले चक्र बंद करावे 
ऐसे तन्मय होता यावे माझे मीपण हरवून जावे 
व्यवहार ज्याचा शुद्ध झाला त्याचा सारा उद्देश बदलला 
आपले आपण तपासत जावे चुका जाणून सुधारत जावे 
वाईट वस्तू नव्हेच पाहू शिवी कोणा नयेच देऊ
जिभेचे चोचले कशाला पुरवा? आपले आपण मरण ओढवा 
भगवंताचे स्मरण जीवन त्याचा विसर हेच मरण 
इंद्रियांना धाक वाटो परमार्थाची पहाट फुटो 
सारी सृष्टी मंगल आहे देवाजीची लीला आहे 
अभ्यासाला असाध्य काय? भगवंताच्या पायी ठाय 
संवादाची रुची घेत ऐका कहाणी गीतेची, ऐका कहाणी गीतेची

No comments:

Post a Comment