Sunday, March 29, 2020

सिद्ध होई मना, रामगुणगायना..

सिद्ध होई मना, रामगुणगायना!ध्रु.

रामनामा स्मरी
तू तुला उद्धरी
ब्रह्मरस मेळवी तू तुझ्या भोजना!१

योगिजन ध्याति जे
चित्ति तू आण ते
कल्पतरु नाम ते पूर्ण करि कामना!२

राम हृदयी असे
राम देही वसे
हे मना जाण तू उघडि तव लोचना!३

राम राही जिथे
काम नसतो तिथे
होय निःसंग तू चालवी साधना!४

रामदासा मना
रामभक्ता मना
राम शरणागता दूर लोटीत ना!५

१३.७.७३
आषाढ शुद्ध त्रयोदशी १८९५
शंकरा - जोड झणि कार्मुका
झंपा

Wednesday, March 25, 2020

फलश्रुति (रामरक्षेची)


अघनाशिनी, बलवर्धिनी, सुखदायिनी
श्रीरामरक्षा, श्रीरामरक्षा!

चारित्र्यवंता ही माउली
गाता धरी शिरि सावली
मोक्षगृहा ही वाटुली
पुत्रादिलाभे त्याच्या सुखा उरते न कक्षा!
श्रीरामरक्षा, श्रीरामरक्षा!

पातालि वा पृथ्वीवरी
मायामिषे जरि अंबरी
संचारती भूतें जरी
बघण्या न जीवा धृती लेश त्या, मंत्राक्षरे उतरेल नक्षा
श्रीरामरक्षा, श्रीरामरक्षा!

बळ वाढवी, विश्वास जिंकी
भय घालवी, नैराश्य फुंकी
हटवी तमा, तेजास फाकी
कंठी धरोनी घेईल जो सिद्धिस्वरूपा श्रीमंत्रदीक्षा
श्रीरामरक्षा, श्रीरामरक्षा!

हे रामकवच जो लेतो रे
वज्रासम कणखर होतो रे
प्रभुपालक त्याचा ठरतो रे
विजयी, विनयी, दीर्घायुहि तो पावत अंती मोक्षा!
श्रीरामरक्षा, श्रीरामरक्षा!

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

आधार मना नामाचा..


आधार मना नामाचा
मी बालक भगवंताचा!ध्रु.

'शिव, शिव' मी म्हणतो जेव्हा
मज शांत वाटते तेव्हा
जणु बालक उमाशिवांचा!१

'जय गणेश' मानस गाते
मांगल्य अंतरी येते
मज आश्रय गणरायाचा!२

'श्रीराम' अक्षरे तीन
देतात तोष संपूर्ण
व्रतधारक मी सत्याचा!३

'श्रीकृष्ण' सारथी होतो
सूत्रे तो हाती धरतो
मी अभ्यासक गीतेचा!४

'गुरुदेवदत्त' जप करता
आश्वासन लाभे चित्ता
मज छंद जडे भजनाचा!५

'श्रीविठ्ठल श्रीरखुमाई'
ठेविता पदी मी डोई
मी बालक त्या दोघांचा!६

का उगा कुणाला भ्यावे?
का उगाच कष्टी व्हावे?
आस्वादक आनंदाचा!७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२०.५.२००२

Saturday, March 21, 2020

गीतारहस्य जाणू -

गीतारहस्य जाणू कर्तव्य पार पाडू!ध्रु.

श्रीकृष्णजीवनाचे तात्पर्य हेच आहे
निष्काम कर्म हाच उद्योग वाटताहे
कार्पण्यदोष पूर्ण सगळे मिळून गाडू!१

विक्राळ विघ्न आले भय लेश ना आम्हाला
कोणी स्तवोत निंदो ना स्पर्श या मनाला
एकेक सद्गुणाला आम्ही सदैव जोडू!२

कारागृही जरी वा सत्तेवरी असावे
अंतःस्थ श्रीहरीला आम्ही सदा स्मरावे
साही रिपूस सारे देशांतरास धाडू!३

आहे कसा खरा मी ध्यानात पारखावे
व्हावे जगी कसा मी आधी सदा झटावे
मालिन्य जे मनाचे निपटून सर्व काढू!४

ये वज्रता तनाला खंबीरता मनाला
साफल्य सत्कृतीला ये तीक्ष्णता मतीला
स्वानंद हाच मोक्ष खाऊ आनंद लाडू!५

जी मूळ बंदिशाला ती मुक्तिची प्रशाला
अध्यापकेच येथे अभ्यास खोल केला
कारागृहास तीर्थ वदतात संतसाधु!६

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१७.०९.२००३
गीतारहस्य जाणू- (ऑडिओ)

Saturday, March 14, 2020

"फेडायाचे ऋण ते मजला"-

जे देवाने दिले तुला ते
कृतज्ञतेने पहा, पहा!
"फेडायाचे ऋण ते मजला"-
असे बजावत रहा रहा!ध्रु.

देह दिला तो राखी निर्मळ
कृष्णच आत्मा तव तन गोकुळ
श्वास नव्हे रे 'वेणुनाद' तो
सोsहं सोsहं सुरू अहा!

मन दिधले ते वश घे करुनी
कलाकलाने आत वळवुनी
हरिभजनाची चाखव गोडी
कमलपत्रसम जगी रहा!

भलेबुरे ते सहजच कळते
आतुन कोणी तुला शिकवते
मना आवरुन तनू सावरून
कर्तव्याला करत रहा!

गुण शोधावे सांगत जावे
न्यून दिसे ते पूर्ण करावे
सत्कार्याला दे उत्तेजन
गुणानुरागी सदा रहा!

कर्तव्याला करीत असता
निर्वाहाची कशास चिंता
शुभ चिंतावे, शुभ बोलावे
अनुसंधानी नित्य रहा!

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२१.९.१९८९

Thursday, March 12, 2020

गणेशा द्यावे आशीषा..

प्रणाम सादर स्वीकारावा आपण जगदीशा
गणेशा द्यावे आशीषा!ध्रु.

भोगवाद संपूर्ण सरावा
उपासनेचा मार्ग दिसावा
चित्ते अमुची विशुद्ध व्हावी द्या द्या उपदेशा!१

विकार शमता विचार स्फुरतो
ओंकाराचा ध्वनि प्रस्फुरतो
विद्यानिधि ही द्या अनुभूती जागृत जिज्ञासा!२

शुभचरणांचे व्हावे दर्शन
साहि रिपूंचे व्हावे खंदन
द्यावी श्रद्धा ज्ञानावरती अविचल परमेशा!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(श्रीगणेशदर्शन)