आधार मना नामाचा
मी बालक भगवंताचा!ध्रु.
'शिव, शिव' मी म्हणतो जेव्हा
मज शांत वाटते तेव्हा
जणु बालक उमाशिवांचा!१
'जय गणेश' मानस गाते
मांगल्य अंतरी येते
मज आश्रय गणरायाचा!२
'श्रीराम' अक्षरे तीन
देतात तोष संपूर्ण
व्रतधारक मी सत्याचा!३
'श्रीकृष्ण' सारथी होतो
सूत्रे तो हाती धरतो
मी अभ्यासक गीतेचा!४
'गुरुदेवदत्त' जप करता
आश्वासन लाभे चित्ता
मज छंद जडे भजनाचा!५
'श्रीविठ्ठल श्रीरखुमाई'
ठेविता पदी मी डोई
मी बालक त्या दोघांचा!६
का उगा कुणाला भ्यावे?
का उगाच कष्टी व्हावे?
आस्वादक आनंदाचा!७
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२०.५.२००२
No comments:
Post a Comment