Monday, May 11, 2026

श्रीनारायण महाराज ! जय जय नारायण महारा‌ज!

श्रीनारायण महाराज ! जय जय नारायण महारा‌ज!ध्रु.

भगवंताने तुला निवडले, बजाव तुझिया मनास पहिले 
भाग्य तुझे की भक्तिपथावर नकळत पडती पुढे पाउले 
बंधन छे छे नियम हिताचे पाळ सोडुनी लाज!१

वेदाध्ययने जे जे जमते ते ते नामस्मरण साधते 
सहनशीलता तनात येते, मना उलटवी नामच बनते 
मार्दव संभाषणी, दृष्टितुन सुधा सर्वदा पाज!२

दत्तराज आवडते दैवत जनात अथवा वनात सोबत 
गानकला या मना नीववत, शांति नसे क्षणभर ही सोडत
सीमा सगळ्या पुसून जातिल, अवनीवर गुरुराज!३ 

चुकून कोणाचा ना मिन्धा मनात जपतो हरिगोविंदा
संध्यावंदन सुसंधि साधा, बरवा कल्याणाचा धंदा 
सत्यनारायण व्रत चढवी दिव्यप्रभेचा साज!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२४.०३.२००४

Saturday, May 9, 2026

नामस्मरण करावे, सदा आनंदी असावे!

नामस्मरण करावे, सदा आनंदी असावे!ध्रु.

नाम घेणे करा नेम 
हृदयी फुले रामप्रेम 
कृपा करील 'श्रीराम' रामचरण भजावे!१ 

नको गुंतणे कशात 
राहू शुद्ध- बुद्ध- शांत 
जसे गगन तैसेच जगी निर्लेप असावे!२ 

देव येइल वर्णिता 
परि नामाची महत्ता 
कशी आहे शब्दातीत नाम घेऊनी पहावे!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १३० (९ मे) वर आधारित काव्य.

आपल्या घरातील वातावरण शुद्ध शांत आणि पवित्र असावे. तुमचे अंत:करण मात्र भगवंताच्या प्रेमाने ओथंबलेले राहू द्या. कोणाशी वाद घालीत बसू नका. जगाचा मान फार घातक आहे. प्रेमात गुंतू नका, तसेच द्वेष मत्सरातही गुंतू नका. दोन्ही सारखेच घातक आहेत. आपले कर्तव्य भगवंताच्या स्मरणात करून त्याचे अनुसंधान अखंड टिकू द्या. येथून रामाजवळून काही मागून नेणेच असेल, तर त्या नामाचे प्रेम तुम्ही सर्वांनी मागा. सर्वांनी नामस्मरण करा आणि आनंदात राहा. राम कृपा करील हा भरवसा बाळगा.

Monday, May 4, 2026

साधनी रमावे, संतरूप व्हावे!

साधनी रमावे, संतरूप व्हावे! ध्रु. 

चित्त शुद्ध होता 
प्रिय बनू संतां -
नाम नित्य घ्यावे!१

संत ना देहात 
संत साधनात 
तत्त्व आचरावे!२ 

करिता अंगीकार 
आनंद अपार 
देहा विसरावे!२

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १२५ (४ मे) वर आधारित काव्य.

परमार्थास संतांचे अधिष्ठान आवश्यक आहे. चित्त शुद्ध नसेल तर संतांच्या जवळ जाऊन तरी काय उपयोग होणार? संत हे काही देहात नसतात, त्यांना आपण देहात पाहू नये, ते जे काही सांगतात, त्या साधनात ते असतात. आपण जर चित्त शुद्ध करून गेलो तर आपल्याला संतांची भेट होते व भेट झाल्यावर, जे त्रिभुवनातही मिळणार नाही ते ते देतात. ते सांगतील तेच करणे हीच त्यांची खरी सेवा होते. गुरुने एकदा आपल्याला आपले म्हणावे हेच शिष्याला मिळवायचे असते. गुरु आपल्याला निवृत्ती देतात. निवृत्ती दिल्यावर विषयांची प्राप्ती व्हावी ही आठवणच जाते.