दुःख द्वैतामध्ये आहे, सुख एकामध्ये!ध्रु.
प्रपंचाच्या दहा दिशा
परमार्था एक दिशा
तिच्याकडे लक्ष देणे मर्म हेच साधे!१
जन्महेतु परमार्थ
होमिणे हो निजस्वार्थ
परमार्थ शिकताना देहबुद्धि बाधे!२
वासनेचे बीज सूक्ष्म
कधी येत पालवून
नामस्मरणात रहा तृप्त होत संतबोधे!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १६४ (१२ जून) वर आधारित काव्य.
द्वैतामध्ये दुःख आहे तर एकामध्ये सुख आणि आनंद आहे. प्रपंचाच्या दहा दिशा आहेत, पण परमार्थाची मात्र एकच दिशा आहे, तिच्याकडे आपण लक्ष लावावे . काही न करणे, अर्थात मनाने, हा खरा परमार्थ होय. परमार्थ साधणे हाच आपल्या जन्माचा खरा हेतू आहे हे आपल्याला कळत नाही. वासनेचे सूक्ष्म बीज आपल्यात कुठेतरी दडलेले असते त्यामुळे लौकिक सुटत नाही. याकरता संतांनी स्वतः एक मार्ग सुचवला आहे आणि तो म्हणजे नामस्मरणात राहून विषयाची उर्मी उठू न देणे. आपण काही न करताच संतांना दोष देतो. प्रपंचातील विघ्न ही सूचनावजा असतात ती आपल्याला जागे करतात. जन्मास आलो ते भगवंतांना ओळखण्याकरता हे विसरू नये म्हणून विघ्नांची योजना असते.
No comments:
Post a Comment