Friday, July 3, 2026

महर्षी धोंडो केशव कर्वे

धोंडो केशव कर्वे!ध्रु.

खडबडीत जरी नाव तयांचे
काटक असती ते मुलुखाचे
उदाहरण ठेवती कृतीचे
खणखणीत वच बरवे!१

महिलांना आधार वाटला
पाठीराखा तया भेटला 
ज्ञानदान सोहळा रंगला 
अन्याय न मुळि सहवे!२ 

कुणी शिक्षिका पर्यवेक्षिका
कोणी डॉक्टर, रुग्णसेविका
अण्णांच्या लडिवाळ बालिका
स्मृतिसुमना वेचावे!३

कोणी गाती करती भाषण
कोणी करती चिंतन लेखन
कर्तृत्वाने उजळे जीवन
मोल कुणाला करवे!४

चालायाचे चरणा ठावे
सोसायाचे शरिरा ठावे
तत्त्वावरती ठाम रहावे 
महर्षिपद वंदावे । ५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

२८ नोव्हेंबर २००२
गुरुवार, सायं ५.२०

कर्मवीर भाऊराव पाटील

झाड वडाचे कसे पसरले 
तसेच भाऊराव पाटील ! 
कर्मवीर भाऊराव पाटील!ध्रु.

जात मनातुन निघून जावी
माणुसकी परि बहरुन यावी 
कष्टाची करुनिया मशागत 
करि देती पाटी पेन्सिल!१

मुली शिकाव्या मुले शिकावी
मुखी असावी अभंग ओवी
प्रेमाची करतात लावणी 
उदार होते ज्यांचे दिल!२

थंडीवाऱ्यातुन ते फिरले 
तसे उन्हाचे चटके सहले (उन्हाने पाय पोळले)
परि बरसे मायेची माया 
जगावया जो तो काबिल!३

खडक फोडला पाट काढले
ज्ञानाचे पाणी झुळझुळले 
खेडोपाडी गंगा आली
अंधारामधला कंदिल!४

कणखर मनगट बळकट बाहू
धकेचपेटे हासत साहू
समाज जागे मराठमोळा 
निष्कलंक देशाचे शील!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

२७ नोव्हेंबर २००२
बुधवार, दुपार ३.२०