छत्रपती शिवरायांसारखा अजोड नेता लाभल्याने मराठ्यांच्या मनी दुर्दम्य आत्मविश्वास फुलला. परचक्राची धास्ती राहिली नाही. बारा मावळ स्वराज्यात सुखाने नांदू लागले.
शिवरायांनी केवळ तलवारीला धार लावण्यासच प्रोत्साहन दिले असे नाही, शेती, न्यायदान, पाणी पुरवठा इकडेही त्यांनी लक्ष पुरविले. अवघ्या बारा मावळाचे रूपच पालटून गेले.
शिवारं डुलू लागली, शेतकरी आनंदभराने गाऊ लागला..
------ ------ ------- -------
बारा मावळ हसू लागला, लक्ष्मी नांदे घरोघरी
शिवबा नेता भला लाभता, स्वर्ग पातला भूमिवरी!
नंदनवन जनमनांतरी!
गाई वासरे येथे रमती
नव्या गोकुळी सुखा नच मिती
गोरस पिउनी गोपाळांची सेना सजली पहा तरी!
शिवबा नेता भला लाभता, स्वर्ग पातला भूमिवरी!
नंदनवन जनमनांतरी!
सहस्र कुदळी पडता मिळुनी
नीर खळाळे पाटांमधुनी
वाऱ्यावरती शिवार डुलता मनी हरखला शेतकरी!
शिवबा नेता भला लाभता, स्वर्ग पातला भूमिवरी!
नंदनवन जनमनांतरी!
रावण आता कुणी न उरले
तस्कर सारे तिमिरी दडले
न्यायनिवाडा बघण्या यावे भूप विक्रमे धरेवरी!
शिवबा नेता भला लाभता, स्वर्ग पातला भूमिवरी!
नंदनवन जनमनांतरी!
राज्य आपुले शेतकऱ्यांचे
धारकऱ्यांचे वारकऱ्यांचे
देवराज्य या वानिती अवघे, हर्ष कोंदला दिगंतरी!
शिवबा नेता भला लाभता, स्वर्ग पातला भूमिवरी!
नंदनवन जनमनांतरी!
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
No comments:
Post a Comment