Friday, May 13, 2022

रूप धरुनि शिवबाचे सूर्य मंगळास भिडे!

दो प्रहरी दरबारी नवलकथा एक घडे 
रूप धरुनि शिवबाचे सूर्य मंगळास भिडे! सूर्य मंगळास भिडे! ध्रु.

दिपले जन दरबारी 
उत्‍कंठा जोर करी 
नेत्री नच हो मैत्री 
पटली क्षणी ही खात्री 
अंगाऱ्यासम जहाल शब्‍दांची वृष्‍टी घडे  
रूप धरुनि शिवबाचे सूर्य मंगळास भिडे! सूर्य मंगळास भिडे! १

याचसाठि काय मला? 
बोलविले आग्र्याला? 
दे झणि दे शस्‍त्राला 
अति असह्य ताप मला 
रौद्र रूप ते बघता रोम रोम होत खडे 
रूप धरुनि शिवबाचे सूर्य मंगळास भिडे! सूर्य मंगळास भिडे! २

वीर पुरुष दुरी बसला 
फुरफुरली मनी ज्‍वाला 
खिलत नको ही मजला 
वरिन याच क्षणि शूळा 
वरुनि शांत, आत तप्‍त शाह मनी पाप दडे 
रूप धरुनि शिवबाचे सूर्य मंगळास भिडे! सूर्य मंगळास भिडे! ३

कडकडता ती बिजली 
भीरू मने झणि थिजली 
आपसात कुजबुजली 
कल लेंगे खिलत अली 
नाट्य खरे येथ सुरु, तूर्त जरी पटल पडे 
रूप धरुनि शिवबाचे सूर्य मंगळास भिडे! सूर्य मंगळास भिडे! ४

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले

No comments:

Post a Comment