कविता पहिली
मोरया, मोरया करी दया!ध्रु.
चिदानंद तू, परब्रह्म तू
गुणसमुद्र तू परेशही तू
शरण शरण सदया!१
विघ्नविनाशक तू असशी
वीर विनायक तू असशी
भवभय ने विलया!२
मनसिंहासनि बसण्या ये
प्रबोधनासी ये रे ये
रवि आला उदया!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१६.०९.१९७७
यमन कल्याण
कविता दुसरी
मयुरेश्वरा मज उद्धरा!
गिरिजासुता करणे त्वरा! ध्रु.
गिरिजासुता करणे त्वरा! ध्रु.
मातेजवळी पुत्र म्हणूनी
तिची कामना पूर्ण करोनी
तारा आम्हां लंबोदरा!१
त्रिगुणातीता श्री शिवकुमरा
आत्मज्ञाना वितरा वितरा
शरणागता हाती धरा!२
मातीची जरी मूर्ती केली
आत्मशक्ती अंतरि शिरली
वृत्तान्त हा सगळा खरा!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
कविता तिसरी
तुज वंदितो मोरेश्वरा!ध्रु.
मयूर वाहन तुझे शोभते
रणांगणावर वेगे नेते
तू संहरी विघ्नासुरा! १
जे चरणी शरणागत झाले
तुझ्या कृपेने ते उद्धरले
सद्बुद्धि दे मोरेश्वरा! २
ॐकार जो भरला उरी
इच्छा त्वरे पुरती करी
मन सावरी योगीश्वरा! ३
मनात प्रतिमा तुझी उमटली
सिंदुरचर्चित मूर्ति प्रकटली
मोरेश्वरा, दे आसरा! ४
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०६.०१.२००६
#अष्टविनायक गीते
No comments:
Post a Comment