Monday, May 2, 2022

आनंदाश्रू झरतात

 
तात्‍याकंठी माळ फुलांची, सुगंधलहरी येतात 
आनंदाश्रू झरतात ! ध्रु. 

चोरुनि फुले गुंफिली 
कुणि माळ गळा घातली 
रत्‍नहाराहुन ही मोलाची, तुला हिला ना जगतात! १ 

आनंदाचे आले भरते 
वनवासाची मुदत संपते 
तात्‍या नेता मी अनुयायी – अडे हुंदका कंठात! २ 

दर्शन घेण्‍या झुम्‍मड लोटे 
तात्‍यावरती दृष्‍टी खिळते 
गौरव बघता हा कष्‍टांचा शीण संपला निमिषात! ३ 

दान पावले दान पावले 
चित्त डोलले, चित्त डोलले 
तात्‍या गौरव गौरव अपुला आनंदाश्रू वदतात! ४ 

भक्ति जनांची बहुमोलाची 
तात्‍या विण ना कळावयाची 
दो कुड्यांतुनि एकच आत्‍मा ऐसा अनुभव दिनरात! ५  

कथा शबरिचि आता स्‍मरते 
भक्ती भोळी मना जिंकते 
सन्‍मानांतरि अमृतगोडी शब्‍द पांगुळे होतात! ६ 

श्रीकृष्‍णाच्‍या कंठि आजला
जशी शोभली तुलसी माला 
कृतार्थतेने, कृतज्ञतेने जुळले हात ! ७ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले

No comments:

Post a Comment