Thursday, May 28, 2020

हिन्दुहृदयसम्राट तुझा जय..

हिन्दुहृदयसम्राट तुझा जय!ध्रु.

आम्ही गातो तव जयगाथा
गाता होतो उन्नत माथा
तुझे यज्ञमय अवघे जीवन
मातृस्तनिचे संजीवक पय!१

हे योगीश्वर हे सत्कविवर
हे प्रलयंकर विक्रमसागर
गौरवगीता सुस्वरि गाता
तना मनांची साधू दे लय!२

महाकाव्य जणु अवघे जीवन
मुर्दाडांसी ते संजीवन
श्रद्धेने ते सेवन करिता
दौडदौडती प्रतिभेचे हय!३

अर्थवाहि तव नाव विनायक
तू जननायक तू गणनायक
आदरांजली तुला वाहता
विरघळविते मन एक एक सय!४

सागर जिंकुनि तीर गाठला
जन्माचा इतिहास बनविला
स्वतंत्र भारत, अखंड भारत
बघण्या जगणे हा तव निश्चय!५

तुवा पूजिली शस्त्रधारिणी
वज्रासम तव कणखर वाणी
शस्त्र शब्द अन् शब्द शस्त्र हे
समीकरण वाढविते विस्मय!६

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
मे १९७३

विनायक जन्माला आला..

साधली शुभ मंगल वेला, विनायक जन्माला आला
विनायक जन्माला आला!ध्रु.

घर गजबजले, नटले थटले
बालब्रह्म गालात हासले
सुवर्णचंपक कांति मुलाची, वासंतिक वेला!१

यदुराणा जणु जन्म घेतसे
आस्तिक्याची खूण पटतसे
कृतार्थ माता पितरे दोन्ही शुभ प्रत्यय दिसला!२

सफल मनीषा फुलली आशा
भाव बोलके मूकच भाषा
कैवल्याचा ठेवा अलगद करी कसा आला? ३

भाल भव्य अन् सतेज डोळे
इवली जिवणी ओठ कोवळे
सुस्वरूप हा पुत्र जननिने पुनःपुन्हा चुंबिला!४

किती प्रतीक्षा याची केली
हाक प्रभूने जणू ऐकली
रोमांचांनी तनू बहरली गात मधुर कोकिळा!५

दृष्ट न लागो यास कुणाची
अशी भावना त्या जननीची
गालबोट परि अधिकच खुलवी गौर गौर गाला!६

तेज पित्याचे रूप आईचे
निधान झाले वात्सल्याचे
बाल विनायक त्या सदनांतरि कुलभूषण झाला!७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Sunday, May 17, 2020

दार उघड ना रे दादा..

झोपडीच्या दारावर मुक्ताचे चिमुकले हात सारखे आघात करत होते -
दादा, दार उघड ना रे - दादा
आणि ज्ञानदेव साऱ्या जगावर रुसून, स्वतःला कोंडून घेऊन बसला होता. उठायचंच नाही या हट्टानं.
त्याचा तो निग्रह भयावह होता. या ज्ञानाची समजूत कोणी घालायची? याच्या मनातल्या भावनांची कोंडी कोणी फोडायची?
लहानग्या मुक्तेत साऱ्या विश्वाचंच शहाणपण आज उदेलं होतं -
तिचा अभिनव वाग्विलास सगळ्यांनाच चकित, प्रभावित करून सोडणारा. तिचे आवाहन पोचणार नाही असे कसे होईल?
ऐकाच तर तिची हाक - तिचा धावा -
---------------------------------------------

दार उघड ना रे दादा
दार उघड ना रे दादा! ध्रु.

राग धरसि कोणावर
आपल्याच रूपावर
खेद नको करु रे दादा दार उघड ना रे दादा!

क्रोधे जर विश्व भडकले
तुवा नीर होउनि वहिले
निरवावे अन् फुलवावे निवारण्या अगणित विपदा!

बहिण लाडकी मी मुक्ता
विनवी तुज सोड अहंता
ब्रह्म हेच अपुले रूप ओळखण्यासाठी दादा!

साधुपण सोपे नसते
घाव घाव सहणे असते
मनास या अधि मारावे अधिक काय सांगु विरक्ता!

शुद्ध मनाच्या राऊळी
हसत राहि चंद्रमौळी
गंगाजल हृदय करूनी अम्हां तारण्यास्तव दादा!

अंत नको पाहू दादा
राग सोड ना रे दादा
साद घालते मी मुक्ता
झडझडुनी उठ रे दादा, दार उघड ना रे दादा!

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
कल्याण / केरवा
(श्रीसंत ज्ञानेश्वर - कथाकाव्य)

Saturday, May 16, 2020

मुरारबाजी देशपांडा

हा क्रोध आत मावेना, अपयश जिवा सोसेना
उडविणे शत्रुचा फन्ना, मांडणे रिपूची दैना
आवेशे जणु कोसळला तो सह्याद्रीचा कडा
मुरारबाजी देशपांडा!१

खडाखड उडवि खांडोळी, मस्तके धडावेगळी
अंगार शत्रुला जाळी, खेळते नृत्य महाकाली
सर दरवाजावरी फुरफुरे डौले भगवा झेंडा
मुरारबाजी देशपांडा!२

चौदाशे हात उठलेले, रुद्राचे तांडव चाले
किति पठाण हे गडगडले, मावळी रक्त सळसळले
निर्वाणीचा खेळ मांडला मुरार गर्जे लढा
मुरारबाजी देशपांडा!३

छावणीत वैऱ्याच्या घुसे, हे दुधारी पाते जसे
जीव वसूल हे करतसे, दृष्टी ना मुळी ठरतसे
दारूचा भडका फिका ज्यापुढे असा वीर फाकडा
मुरारबाजी देशपांडा!४

जंग काहीवेळ थांबवुन, काही बोले दिलेरखान
निष्ठेचा घोर अपमान, बाजी झाला पुरा बेभान
खानाचं मुंडकं हीच बक्षिसी, दात खाई कडकडा
मुरारबाजी देशपांडा!५

औलाद प्रभूंची अमुची, बेइमान ना व्हायाची
बेफाम झुंज द्यायाची, बेहाय धडक द्यायाची
भूक भडकली तलवारीची रणि झडला चौघडा
मुरारबाजी देशपांडा!६

"मी शिवाजीराजाचा शिपाई, तुझा कौल घेत मी नाही"
खाने बाण सोडला लवलाही, वीराचा कंठवेध घेई
मुरारबाजी पडला गातसे शाहिर पोवाडा
मुरारबाजी देशपांडा!७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Saturday, May 9, 2020

नारायण वदता वदता..

"नारायण" वदता वदता
मी नारद तरलो, तरलो!ध्रु.

'नारायण' ऐसे नाम
दे तनामना आराम
छेडीत करातिल वीणा-
मी त्रैलोक्यातहि फिरलो!१

संतांची सेवा घडता
स्वस्वरूपात मन रमता
ऐकला अनाहत नाद
पुलकित मी झालो झालो!२

हरिपदकमलांना ध्यावे
मी माझे विलया जावे
तो राखे अनुसंधान
मी निवांत निश्चल झालो!३

'नारायण' फिरणे झाले
'नारायण' गाणे झाले
मुक्तीचा मंत्र मिळाला
श्रीहरीत मिसळुनि गेलो!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
५.१२.१९८९

Friday, May 8, 2020

तुझ्याच रूपे साकारे रे माझी आकांक्षा!

अंगीकृत कार्याची वाढव मम बाळा कक्षा
तुझ्याच रूपे साकारे रे माझी आकांक्षा!ध्रु.

परंपरागत चालत आले
तुवा पाहिजे ते वाढविले
आशीर्वच मम सदैव पाठी, तू माझी आशा!१

उघडी डोळे, पाही सृष्टी
हरिकरुणा करि विकसित दृष्टी
अगाध श्रद्धा, निरलसता ही तोडित भयपाशा!२

अपार श्रम पुण्याचा ठेवा
कर्मि कुशलता रुचते देवा
कंकण बांधी करांत बाळा ही पावन दीक्षा!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१४.३.१९७५

Wednesday, May 6, 2020

यावे नृसिंह होऊन..

अगा नारायणा यावे नृसिंह होऊन
तुझ्या दर्शना आतुर झाले असंख्य लोचन!ध्रु.

स्तंभ कडाडत, यावे गर्जत लक्ष्मीच्या रमणा
धडकी भरवित रिपूच्या मनी या या मधुसूदना
अभयदान द्यावे प्रल्हादापरि जे भक्तजन!१

वटारलेले डोळे आणखी विस्कटली आयाळ
लवथवणारी जिव्हा करते दैत्याला घायाळ
दुष्टांचे कर निर्दालन तू भक्तांचे रक्षण!२

शरणागत ते स्वस्थ तयांचा घेशी तू भार
नारायण नारायण म्हणता त्यांचा उद्धार
कधी संहारक कधी आश्वासक व्हावे आपण!३

हिरण्यकश्यपु दैत्य मारिला अंकी घेउनिया
कृपाच केली उभ्या जगावर अद्भुत ही किमया
आग जाहली नखे सह्य ती उंबरी रोवुन!४

उग्र रूप ते अत्यावश्यक धर्मा रक्षाया
निर्दालन जे दैत्यांचे ती असते खरी दया
पाठ शिकविला प्रल्हादाची पाठ राखून!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले