Saturday, December 30, 2023

हेच ज्ञान।

जीव ब्रह्मरूप !
विश्व ब्रह्मरूप!
"तो मी! तो मी!" हेंच ज्ञान
! हेच ज्ञान। ध्रु.

देव आहे कोठें ? 
देव नाही कोठें ? 
तयावीण ऐसे नाही रितें स्थान!१ 

ज्ञानें देहिं मुक्ती 
ज्ञाने मोक्षप्राप्ती 
देई शांति जीवा सोऽहं ध्यान ! २ 

लपे देव आंत 
वाटुली पहात 
साधकास सांगे हेच गीता गान! ३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०७.१२.१९७४

एथ अविद्यानाशु हैं स्थळ । 
तेणें मोक्षपादान फळ । 
या दोहींसी केवळ । 
साधन ज्ञान ॥ [ १८ : १२४३ ] 

ज्ञानेश्वरीतील या ओवीवर आणि स्वामी माधवनाथांच्या ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या पुस्तकातील प्रवचन क्रमांक १८८ वर आधारित हे काव्य.

जडले नाते भगवंताशी !

जडले नाते भगवंताशी ! ध्रु. 

कर्मे करितां 
त्यातें स्मरता 
कळले 'मी अविनाशी!'१ 

तरंग वरिवरि 
मिळत सागरी 
समरसता ही तैशी!२

अभिन्नता ती
खरि शरणागति 
खूण बाणली कैशी?३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१३.१२.१९७४

सुवर्णमणी सोनिया । 
ये कल्लोळू जैसा पाणिया । 
तैसा मज धनंजया । 
शरण ये तूं ॥ [ १८ : १४०० ] 

या ज्ञानेश्वरीतील ओवीवर आणि स्वामी माधवनाथांच्या ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या पुस्तकातील प्रवचन क्रमांक १९४ आधारित हे काव्य.

Friday, December 29, 2023

तुझा आधार असता रामा

तुझा आधार असता रामा, 
भोग सोईने भोगेन!ध्रु.

तूं करविशीं तें तें घडते 
तू देशी- घेणे पडते 
जिथे तुझा मी झालो रामा 
देह प्रारब्धि टाकेन!१

प्रारब्ध न चुकतें कोणा 
मग व्यर्थच देणे वेणा 
देहबुद्धि काढिसी तर रामा
सुखधामासि पोचेन!२

लागुं दे तुझा मज ध्यास
अभ्यास करिन अभ्यास 
हृदयांगणि यावे रामा ऽऽ
अवगुणांसि झाडेन!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचन क्रमांक २९५, २१ ऑक्टोबर वर आधारित काव्य.

माणसालादेखील आलेले भोग भोगावे लागतात. पण भगवंताचा पाठिंबा ज्याला आहे तो मागेपुढे सोयीने भोग भोगू शकतो. 

म्हणून प्रारब्धाने देहभोग आला असता त्यामध्ये मनाची वृत्ती कशी ठेवावी हे स्वातंत्र्य आपल्याला आहे. ते प्रारब्धावर अवलंबून नाही.

जोपर्यंत आपल्या अंत:करणात अवगुण आहेत तोपर्यंत आपली प्रगती होणे फार कठीण आहे. भगवंताचे प्रेम येण्यासाठी आपले अंत:करण दुर्गुणांपासून स्वच्छ केले पाहिजे.

परमार्थाच्या मार्गावरती सावध सावध वर्तावे!

'सोऽहं हंसः' 

परमार्थाच्या मार्गावरती सावध सावध वर्तावे! ध्रु.

मना मुरडणे 
निर्मम होणे 
ब्रह्मरूप व्हायचे तयाने मोहि न कसल्या गुंतावे!१

दुराशा नको 
परिग्रह नको 
कामक्रोधरिपु वेष बदलती, जपून पाउल टाकावे!२

नव्हे देह मी
तो मी! तो मी!
अलिप्त राहुनि विषयांपासुनि अनुसंधाना राखावे!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०४.१२.१९७४

“शिष्यशाखादिविलासें । मठादिमुद्रेचेनि मिसें । 
घातले आहाती फांसे । 
निःसंगा येणे ॥ " [ १८ : १०६४ ]

या ज्ञानेश्वरीतील ओवीवर आणि स्वामी माधवनाथांच्या ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या पुस्तकातील प्रवचन क्रमांक १८५ वर आधारित काव्य.

Monday, December 25, 2023

अरे मना का भितोस तू? तुझ्या सारखा समर्थ तू!

अरे मना का भितोस तू? 
तुझ्या सारखा समर्थ तू! ध्रु. 

विघ्ने येतिल 
निघून जातिल 
कशास धरसी तू किंतू ?१ 

भय कोणाचे 
बाळगण्याचे ? 
धीर धरी हो निश्चल तू!२ 

समर्थ मालक 
समर्थ सेवक 
प्रेम होतसे जणु सेतू !३ 

रामा भजले 
पापी तरले 
कंकण करि घे बांधुनि तू !४ 

राघव सन्निध 
सिद्ध सदोदित 
कृपादृष्टि धर ध्यानी तू!५ 

भाव जसा रे 
देव तसा रे 
देशिल त्याहुनि घेशिल तू!६ 

बलोपासना 
ध्यानधारणा 
चालव चालव अविरत तू!७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०७.०९.१९७९

(समर्थांचा मनास बोध या वि.गो. आपटे यांच्या पुस्तकाच्या आधारे लिहिलेलं हे काव्य)

राम वसत अंतरीं..

परमेश्वरच फक्त सत्य; बाकी सर्व देहाच्या मनाच्या गोष्टी खोट्या आहेत परमेश्वराचा अहोरात्र ध्यास लागला पाहिजे..

ॐ श्रीराम समर्थ 

सहन करी, धीर धरीं
राम वसत अंतरीं ! ध्रु. 

धैर्य जोड 
मोह सोड 
निश्चल हो निमिष तरी ! १ 

गाई गान 
टाक मान 
गुरुपदि हो लीन तरी!२ 

कर विचार 
घेई सार 
नीर-क्षीर निवड करी!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
चैत्र शु. ११
३१.०३.१९७७

Sunday, December 24, 2023

मना तू आळव प्रेमें रामा!

卐 ॐ श्रीराम समर्थ  卐

मना तू आळव प्रेमें रामा! ध्रु.

नाशवंत तनु नागवंत जग
कशास करशीं उगाच तगमग 
घे घे रे प्रभुनामा १

मानवकीर्ती नकोच गाणें 
रघुनाथासी प्रतिपळ स्मरणे 
सुख ये चालुनि धामा!२ 

घे रात्रंदिन नाम प्रभूचे 
चुकवी फेरे जन्ममृत्युचे 
कवळुनि आत्मारामा ! ३  

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
१५.०४.१९७७
चैत्र वद्य १२

Saturday, December 23, 2023

मना बघ नामोदय झालाऽऽ

ॐ श्रीराम समर्थ

मना बघ नामोदय झालाऽऽ
ही भाग्याची आज खरोखर आलीसे वेला! ध्रु. 

राम स्मरावा 
रामच गावा 
अवघी काया पुलकित होता, कंठ रुद्ध झाला !१

कर जुळताती 
स्वर जुळताती 
रागरागिण्या होती आतुर गीत गायनाला!२ 

नामासंगे 
सोऽहं रंगे 
धन्य संतजन ज्यांनी आत्मा आहे ओळखला!३ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१२.०६.१९७७ 
ज्येष्ठ वद्य ११.

सकल हृदयी राहिला हरि!

सकल हृदयी राहिला हरि! ध्रु.

सर्वसाक्षी तोचि आहे 
विश्वव्यापी नित्य आहे 
वदवि हे जो तो ही श्रीहरि ! १

कर्म जे हातूनि घडतें 
अर्पि ते ही श्रीहरी ते 
पूजि ऐसा सावळा हरि!२

मी न कोणी भिन्न आहे 
"तोच मी" होऊनि राहे
ध्येय-ध्याता-ध्यान श्रीहरि!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
चाल : उगीच का कांता, काफी

“तया सर्वात्मका ईश्वरा । 
स्वकर्मकुसुमांची वीरा 
पूजा केली होय अपारा । 
तोषालागीं । " [ १८ : ९१० ] 

ज्ञानेश्वरीतील या ओवीवर आणि स्वामी माधवनाथांच्या ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या पुस्तकातील प्रवचन क्रमांक १८१ वर आधारित काव्य.

Friday, December 22, 2023

अर्जुना संमोहें ग्रासलें!

अर्जुना संमोहें ग्रासलें! ध्रु. 

निजदेहासी म्हटलें अर्जुन 
परदेहांसी म्हटले स्वजन 
युद्ध मग पापकर्म बाटले!१ 

मी देहाहुनि असे वेगळा 
परमात्मा तो परम सोवळा 
ज्ञान हे, अज्ञानें झांकले!२ 

धर्माधर्म कळेना कांहीं 
बुडुनी गेला मग संदेही
दैन्य हैं केवळ भ्रांतीमुळे!३ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०८.१२.१९७४

स्वदेहा नाम अर्जुनु । 
परदेहा नाम स्वजनु ।
संग्रामा नाम मलिनु ।
पापाचारु । [ १८ : १२७९ ]

या ज्ञानेश्वरीतील ओवीवर आणि स्वामी माधवनाथांच्या ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या पुस्तकातील प्रवचन क्रमांक १८९ वर आधारित काव्य.

Tuesday, December 19, 2023

मन देवरूप आहे- क्षण एक आंत पाहे!

मन देवरूप आहे-
क्षण एक आंत पाहे! ध्रु.

डोळे मिटू‌नि घेई 
पवनास ठेव ग्वाही 
सोऽहं सुरूच आहे! १ 

घेतों स्वयेंच नाम
रमतो असाच राम 
हें गुज सांगताहे! २

अद्वैतबोध झाला-
मग देव का निराळा ? 
"तो राम मीच "आहे ! ३ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

२०.०७.१९७७ पहाटे १.५५ ते २.१०
चाल : डोळ्यात वाच माझ्या

वरि वरि जरि भूषणे लपले अंतरि सोनें

'वरि वरि जरि भूषणे'
लपले अंतरि सोनें ! ध्रु.

नाम रूप दिसत भिन्न 
तत्त्व असत परि अभिन्न 
तेंच नित्य पारखणे!१

विश्वि दिसत वस्तुजात 
परमात्मा त्यात वसत 
तयाचेचि ओतणे!२ 

भुलतो जो बहिरंगा 
तो मुकला श्रीरंगा 
अद्वयत्व पावणे!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२६.११.१९७४
 
" अलंकारपणे झांकले । 
बाळा सोनें कां वाया गेलें । 
तैसे नामी रूपीं दुरावलें । 
अद्वैत तया ।। " [ १८ : ५४२ ]

ज्ञानेश्वरीतील या ओवीवर आणि स्वामी माधवनाथांच्या ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या पुस्तकातील प्रवचन क्रमांक १७७ वर आधारित काव्य.

Saturday, December 16, 2023

मोगऱ्याचा वेलू नभावरि गेला !

तुझा जन्म ज्ञाना सुफलित झाला!
मोगऱ्याचा वेलू नभावरि गेला ! ध्रु.

खेद मज वाटे तुझ्या विरहाचा 
सखा गमावला जिवाचा भावाचा
मुखी हरिनाम परी अंतरात कळा ! १

ज्ञानमार्ग ज्ञाना तुवा दाविलासी 
समाधीची वाट स्वये चाललासी
करूनि दाखवीला भोगांचा सोहळा ! २

आवतण दिले तुवा पांडुरंगा
इंद्रायणी आता ठरे चंद्रभागा
काय म्यां बोलावे गळा दाटलेला ! ३

सुखात वेदना वेदनेत सुख
कसे आकळले तुला आपसूक 
तुझ्या सुखासाठी घोट दुःखाचा गिळला!४ 

म्हण नाम्या वेडा, म्हण तू भाबडा
माझ्या अंगणात प्राजक्ताचा सडा
आत्माराम माझा धाय मोकलला ! ५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

धन्य झाला जन्म, सफल जीवन !

गुरुमाउली गे, नमितो चरण
धन्य झाला जन्म, सफल जीवन ! ध्रु.

माझा मीच देव, माझा मीच भक्त 
तुवां बोधवीले अपार अद्वैत
पूर्वसुकृताने लाभले निधान!१

क्षेत्र नि क्षेत्रज्ञ होत एकरूप 
तुवां वत्सले गे दाविले स्वरूप
आज आसवांनी क्षाळिन चरण ! २
 
सिद्धेश्वरापुढे आसन मांडीले
माहेराचे मूळ पोचले पोचले
समाधीचे मज गूढ आकर्षण!३

आज मी होतसे सदेह विमुक्त 
नको या प्रसंगी दुःखाचे आवर्त
वर्णवे न ऐसा आनंदाचा क्षण!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Tuesday, December 12, 2023

तू देहाहुनि असशि निराळा!

तू देहाहुनि असशि निराळा!ध्रु.

देहोऽहं ची होता भ्रांती 
बुद्धि फिरतसे देहाभवती 
मध्यरात्र ती समज श्यामला!१

दुःखी कष्टी म्हणुनी असशी 
द्वंद्वसागरी गोते खाशी 
जाग झडकरी या समयाला!२ 

' तो मी ' ऐसे घेता ध्यानी
मुक्त विहंगम विहरे गगनी
आत्मतृप्त तू रहा मोकळा!३ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२३.११.१९७४ 

परी देहाहंमानभूली 
जयाची बुद्धि देहीच आतली 
तथा आत्मविषयी जाली 
मध्यरात्री गा 

या ज्ञानेश्वरीतील ओवीवर आणि स्वामी माधवनाथांच्या ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या पुस्तकातील प्रवचन क्रमांक १७४ वर आधारित काव्य.

Sunday, December 10, 2023

श्रीरामास आरति गाऊ..

श्रीरामास आरति गाऊ 
श्रीरामास आरति गाऊ!ध्रु.

निळा सावळा मेघ भासला 
रामचंद्र तर सुंदर हसला 
सगळे पुलकित होऊ!१

आजानुबाहू ध्यान शुभंकर 
रघुनाथाचे आपण किंकर 
साधनि तत्पर राहू !२ 

दशरथनंदन हृदयी भरला 
सोऽहं सोऽहं शब्द उमटला 
आत्मारामा पाहू!३ 

मातृभक्ति ती, पितृभक्ति ती 
प्राणांहुनि वचनांवर प्रीती 
गुण हे गीती गाऊ!४ 

झांज झणाणे, अश्रू झरती 
कंठ दाटतो शब्द न सुचती
अनुभव ऐसा घेऊ!५ 

आंजनेय सम कर जोडावे 
मी रामाचा नित्य म्हणावे
राघवस्मरणी राहू!६ 

श्रीरामा हा प्रसाद दिधला
शब्दसुमांचा हार जाहला 
कर्म तत्पदी वाहू!७ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
बलिप्रतिपदा कार्तिक शुद्ध एक
१२.११.१९७७

Saturday, December 9, 2023

"तत् त्वम् असि" घे ध्यानी तू!

 तुझी अहंता शोध तू!
"तत् त्वम् असि" घे ध्यानी तू!ध्रु.

देहालागी मी मी म्हणसी
सुखदुःखांनी बांधुनि घेसी
विवेक प्रतिपळ बाळग तू!१

जे मिथ्या ते सत्य भासते
आत्मरूप नच ध्यानी येते
मीपण दे दे सोडुनि तू!२

संतांलागी पुसत असावे
पदसेवेने ज्ञान मिळावे
श्रवणि राहावे तत्पर तू!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
ललत 
२१.०७.१९७७

बनू नको अविचारी, मना, फिर फिर रे माघारी!

भगवंताशी तुला एकरूप होता येते हा चमत्कार दाखव..

******


बनू नको अविचारी,
मना, फिर फिर रे माघारी!ध्रु.

देहाचा आधार घेतला
आत्म्यालागी पूर्ण विसरला
तुझा तूच सावरी!१

आत्म्याशी तू खेळ खेळ रे
अनंतास त्या जाण जरा रे
निदिध्यास तू धरी!२

श्रद्धेची जर जोड लाभली
पैलतिराला नाव लागली
राम हाच कैवारी!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
३१.०३.१९७७ चैत्र शु. ११ गुरुवार.

Friday, December 8, 2023

श्रवणे विवेक यावा! प्रभु अंतरी दिसावा!

श्रवणे विवेक यावा!
प्रभु अंतरी दिसावा!ध्रु.

जे तथ्य ते कळावे
जे त्याज्य ते सुटावे
गीती अनंत गावा!१

विश्वात विश्वनाथ
करि भाविका सनाथ
तो जीवनी भरावा!२

व्रत पाळिता कठोर 
सुखलाभ होत थोर
मिळु दे असा विसावा!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२७.११.१९७४

विवेकश्रवणे खरपुसे
जेथ व्रताचरणे कर्कशे
करिता जाती भोकसे
बुद्ध्यादिकांचे

ज्ञानेश्वरीतील या ओवीवर आणि स्वामी माधवनाथांच्या ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या पुस्तकातील प्रवचन क्रमांक १७८ वर आधारित हे काव्य.

Thursday, December 7, 2023

कशी करावी सद्गुरुराया मी अपुली पूजा?

कशी करावी सद्गुरुराया मी अपुली पूजा?ध्रु.

देही नसता कसले वर्णन?
म्हणुनी मौना वरिते भाषण
अनुभूती ते वर्णायासी शब्द न ये काजा!१

त्रिगुणातीता, देहातीता
सोऽहं भावा अगा अनंता
स्तवनासाठी गायन करिता स्वर कंपित माझा!२

उपचारांचे नाही कारण
स्वकर्मकुसुमे घडते पूजन
सोऽहं बोधी नित्य राहणे रुचते गुरुराजा!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१७.११.१९७४

स्तुति काही न बोलणे 
पूजा काही न करणे 
सन्निधी काही न होणे 
तुझ्या ठायी 

ज्ञानेश्वरीतील या ओवीवर आणि स्वामी माधवनाथांच्या ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या पुस्तकातील वरील ओवी वरच्या प्रवचन क्रमांक १६८ वर आधारित काव्य.

Tuesday, December 5, 2023

संन्यासाचा अर्थ सांगते श्रीगीतामाता!

संन्यासाचा अर्थ सांगते श्रीगीतामाता!ध्रु.
 
देह नव्हेसी -
तो तू असशी! 
ध्यानी घेई स्वतः!१ 

तू नच कर्ता 
नच तू भोक्ता 
स्वस्थ रहा आता!२ 

नको फलाशा 
धरि जिज्ञासा 
वरि रे सावधता!३ 

सोड अज्ञता
घे अलिप्तता 
वाढवि तव योग्यता!४ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२०.११.१९७४ 

या लागी त्याग संन्यास 
पुसावयाचे घेऊनि मिस 
उपलविले दुस 
गीतेचे ते 

ज्ञानेश्वरीतील या ओवीवर आणि या ओवीवरील स्वामी माधवनाथांच्या ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या पुस्तकातील प्रवचन क्रमांक १७१ वर आधारित हे काव्य.

Saturday, December 2, 2023

गीतेमाजी एकचि बोध ! अंतरंगि श्रीहरिसी शोध !

गीतेमाजी एकचि बोध !
अंतरंगि श्रीहरिसी शोध !ध्रु.

सगळे आहे तुझ्याचपाशी - 
परि तू जागा चुकला असशी 
सोऽहं ज्ञाने मिळत प्रमोद!१

विशुद्ध कर्मी फुलते भक्ती 
भक्तिसवे ज्ञानाची प्राप्ती 
सद्गुरु करिती असा सुबोध!२

संतत करिता सोऽहं साधन
आत्मानंदी करी निमज्जन 
मावळेल मग सकल विरोध!३ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
मालकंस 
केरवा 
चाल: सुग्रीवा हे साहस कसले
 
साते शते श्लोक 
अध्याया अठरांचे लेख 
परि देव बोलिले एक 
जे दुजे नाही 

स्वामी माधवनाथांच्या ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या पुस्तकातील ज्ञानेश्वरीतील वरील ओवीवरील प्रवचन क्रमांक १७० वर आधारित हे काव्य.

Friday, December 1, 2023

श्रीव्यासांनी असे बांधिला मोक्षाचा प्रासाद!

श्रीव्यासांनी असे बांधिला मोक्षाचा प्रासाद!ध्रु.

उपनिषदांचे सार काढले 
श्रीगीतामृत प्रेमे दिधले 
बसुनि सुखाने परिसा आता कृष्णार्जुनसंवाद!१ 

छायेमाजी श्रम विसरावे 
धर्माचरणा बल मिळवावे 
गीतातत्त्वे देत राहती तना मना आल्हाद!२ 

अवधानाचा विडा देउ या 
आत्मरूप हरिसी भेटू या 
उराउरी भेटणे माधवा - श्रवणे मिळत प्रसाद!३ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१८.११.१९७४
मारुबिहाग, केरवा

ते निजबोधे उराउरी 
भेटती आत्मया श्रीहरी
परी मोक्षप्रासादी सरी 
सर्वांही आथी 

ज्ञानेश्वरीतील या ओवीवर आणि स्वामी माधवनाथांच्या ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या पुस्तकातील प्रवचन क्रमांक १६९ वर आधारित काव्य.

क्षमाशील असतो धर्म..

ध्यानि धरा इतुके मर्म
क्षमाशील असतो धर्म!ध्रु.

स्वभावेच विकसन पावे
अंतरंग जाणुनि घ्यावे
बाह्यरंग टरफल नुसते, ज्ञानहीन कर्म!१

सामावुनि सकला घेतो
चुचकारुनि पुढती नेतो
क्रोधयुक्त जर तो असता, मानला अधर्म!२

भूति पाहणे भगवंत
दयायत्त त्याचे चित्त
चुकलेल्या जो सावरितो तोच तोच धर्म!३

दुरुनि वंदितो तुम्हासी
एक मागतो देवासी
कळो तरी अंती अपणा न्यायनीतीमर्म!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

(इंद्रायणीकाठी या रविंद्र भटांच्या कादंबरी वर आधारित ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रावर रचलेल्या काव्यामधील एक काव्य)

ऐसे नमन मजसि साधावे!

ऐसे नमन मजसि साधावे!ध्रु.

उदकामाजी लवण मिसळता 
एकजीवपण सहज साधता 
बहुत काय बोलावे!१ 

संत नमन भक्तीला म्हणती 
पूर्णपणे बोधावर असती 
आत्मतत्त्व उमजावे!२ 

विनय हीच वाटु दे संपदा 
समता चित्ती असो सर्वदा 
तयांत मी मिसळावे!३ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२८.१०.१९७४ 

तरी नुरोनि वेगळेपण 
रसी भजिन्नले लवण
तैसे नमन माझे जाण 
बहू काय बोलो 

(ज्ञानेश्वरीमधील या ओवीवर आणि स्वामी माधवनाथांच्या ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या पुस्तकातील या ओवीवरच्या प्रवचन क्रमांक १६२ वर आधारित  काव्य.)

Thursday, November 30, 2023

ध्यानास काय भ्यावे? मनने सुशांत व्हावे!

ध्यानाचे भय वाटते. का? आपले असंख्य दोष दिसतात. वासना/कामना स्वैर उधळतात. हीच हीच ती माया. ध्यान सोडायचे नाही त्याला भ्यायचे नाही. उपासनेला दृढ चालवावे. मनाचे अमन होण्यासाठी..

**********

ध्यानास काय भ्यावे?
मनने सुशांत व्हावे! ध्रु.

ठायी रहा निवांत
जाईच आत आत
नामी मने वसावे!१

त्या संपता उपाधी
लागे पहा समाधी
सोऽहं सुधेस प्यावे!२

जरि पातके उदंड
उठली करूनि बंड
गुरूच्या पदां स्मरावे!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१७.०७.१९७७

Tuesday, November 28, 2023

देहाचा जो भोग, भोगून सरावा भोगतां भोगतां राम आठवावा!

देहाचा जो भोग, भोगून सरावा
भोगतां भोगतां राम आठवावा!ध्रु.

संकटे दुखणी
मानु बंधुभगिनी
कर जोडुनीया नमू वासुदेवा!१

ठेविसी जैसे
सुखे राहु तैसे
जनकाजा देह - चंदन झिजावा!२

रामाचे होऊन
प्रपंच करून
भक्तिभावे राम आम्ही आळवावा!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज प्रवचन क्रमांक २२६, १३ ऑगस्ट वर आधारित काव्य 

परमात्म्याने पाठविलेली दुखणी, संकटे यात आनंद मानला पाहिजे.
परमात्म्याच्या इच्छेने येणारी दुखणी, संकटे, यांचाही तुम्ही का नाही मानू आनंद ? पण परमात्मा आपला सर्वस्वी हितकर्ता आहे असा तुमचा दृढ विश्वास आहे कुठे ? परमात्म्यानेच धाडलेली संकटे त्यालाच दूर करायला कशी सांगावीत ? दुसरे असे की, भोग हा भोगलाच पाहिजे. आता जर भोगला नाही, तर पुढे तरी भोगावा लागणारच ना ?

Monday, November 27, 2023

आनंद गगनि मावेना..

आनंद गगनि मावेना, आनंद गगनि मावेना!ध्रु.

ध्यानयोग भगवंत सांगतो
सकल जगाला प्रभु तोषवितो
गंगा आली परमार्थाची स्वये चालुनी सदना!१

सरिता वाहे आत्मानंदे
तिचिया तीरी गोकुळ नांदे
कल्पना न तिज ती उजळविते जीवांच्या जीवना!२

उपकारच जणु हे पार्थाचे
निमित्त घडले अज्ञानाचे
ज्ञान सुमंगल म्हणुनि येतसे सहजच अपुल्या श्रवणा!३

विकल अवस्था सरली सरली
तृषा मनाची शमली शमली
अमृतमधुरा वाणी परिसुनि मानस करिते नर्तना!४

गीतेचे ये सारच हाता
पैलतीर तो दृष्टिस पडता
पुष्प अनंताचे हे अवचित वितरत मंगलदर्शना!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०४.०१.१९७३

Sunday, November 26, 2023

प्रार्थना

प्रार्थना

माझा विकास होऊ दे 
अंतर सगळे उजळू दे!ध्रु. 

विश्व हेच घर 
करु दे ईश्वर 
परिमल पसरू दे!१ 

देव दयाघन 
पावन करि मन 
श्रद्धा सुदृढ होऊ दे!२ 

नको फलाशा 
वा अभिलाषा 
विशाल मज बनू दे!१ 

रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले
०१.११.१९७७

घातक परमार्था क्रोध हा!

घातक परमार्था क्रोध हा!ध्रु.

विफल कामना 
भारिते मना -
कडेलोट जणु करी क्रोध हा!१
 
अशांति येते 
दु:खी करिते 
जीवन मसण करी क्रोध हा!२ 

सोऽहं भावे 
हरिस पहावे 
सिद्ध जनां ना छळी क्रोध हा!३ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
२७.१०.१९७४

ऐसा जो कामक्रोधलोभा 
झाडी करूनि ठाके उभा 
तोचि येवढिया लाभा 
गोसावी होय 

या ज्ञानेश्वरीतील ओवीवर आणि स्वामी माधवनाथांच्या ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या पुस्तकातील प्रवचन क्रमांक १६१ वर आधारित काव्य

Saturday, November 25, 2023

श्रीकृष्णाचे सद्गुण गावे, सद्गुण गावे सद्गुण घ्यावे..


श्रीकृष्णाचे सद्गुण गावे 
सद्गुण गावे सद्गुण घ्यावे!ध्रु.

खेळगडी हा गोपाळांचा 
कार्यक्रम रंगे काल्याचा 
सगळ्यांशी मी समरस व्हावे!१

अधरी लावी हरी बासरी 
हळवी फुंकर कैसी मारी 
सूरसागरी मी विहरावे!२ 

खांद्यावर घोंगडी घेतली 
गाईमागे हा वनमाळी 
ते साधेपण स्वभाव व्हावे!३ 

दैत्यांना हा ठरला भारी 
प्रतापसूर्यच जसा अंबरी 
शत हत्तींचे बळ मिळवावे!४ 

' मी करतो ' हे नसे बोलणे 
' आपण करु या ' असे सांगणे 
मी माझेपण विलया जावे!५ 

मोहन मोही रुतला नाही 
स्वरूपात तो रमून राही 
स्वरूपात राहणे जमावे!६ 

श्रीगीता कृष्णाचे जीवन 
जैसे जीवन तैसी शिकवण 
श्रीकृष्णार्पण सगळे व्हावे!७ 

गाता गाता गीता कळते 
सुखदु:खी सम होता येते 
श्यामसुंदरा आत पहावे!८ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२८.०६.१९८७

माधवनाथ ऐसे घडले!

माधवनाथ ऐसे घडले!ध्रु.

सहज बोलणे, सहज चालणे 
सहज पाहणे, सहज वागणे
अंत:करणी अलगद वसले!१ 

जणु ते ओवी ज्ञानेशाची 
रसाळ वाणी श्री तुकयाची 
भजनानंदी कसे डोलले!२ 

पाषाणाची असु दे प्रतिमा 
पूजनात परि अपूर्व प्रेमा 
आनंदाश्रू ओघळलेले!३ 

गान ऐकता समरस होता 
मुद्रेवरती प्रभा फाकता 
पावसचे मज स्वामी दिसले!४

अवघे जीवन असे साधना 
नित राखावे अनुसंधाना 
मधुर वचांनी सावध केले!५ 

मधुर स्मित ते झळको वदनी
ओलावा ही असो भाषणी 
आचरणाने कसे शिकविले!६ 

क्षणहि न वाया जाऊ द्यावा
परोपकारी देह झिजावा 
समर्थ वचने आपण जगले!७
 
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२९.०९.१९८९

Thursday, November 23, 2023

सकल हृदयि मी राहतसे सोऽहं भावी सदा वसे!

सकल हृदयि मी राहतसे
सोऽहं भावी सदा वसे!ध्रु.

देहाविषयी ना आसक्ती
लाभाविण करिता प्रीती
ती ओळख पटता मीच हसे!१

' मी आत्मा ' प्रत्यय हा येता
निजसंगे भक्ते मज नेता
ते प्रेमसूत्र मज बांधतसे!२

जे स्वरूपाचे अनुसंधान
ते योग, भक्ति तैसे ज्ञान
साध्य होत नित्याभ्यासे!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१५.१०.१९७४

परि संतांसवे वसता
योगज्ञानी पैसता 
गुरुचरणी उपासिता
वैराग्येसी 

येणेचि सत्कर्मे 
अशेषही अज्ञान विरमे 
जयाचे अहं विश्रामे
आत्मररूपी
 
या ज्ञानेश्वरीतील ओव्यांवर आणि स्वामी माधवनाथांच्या ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या पुस्तकातील प्रवचन क्रमांक १५२ वर आधारित काव्य.

Wednesday, November 22, 2023

उपनिषदांचे सार गीता सद्भाग्याने आले हाता!

उपनिषदांचे सार गीता 
सद्भाग्याने आले हाता!ध्रु.

अनुभव ज्याचा त्याने घ्यावा 
अंतरंगि भगवंत पहावा 
अंगुलिने नच ये दाखविता!१

श्रवण करिता मनन करावे 
श्रद्धेने ते कृतीत यावे 
तो मी! तो मी! अनुभविता!२ 

मी, माझे हे सोडुनि द्यावे 
तूच, तुझे हे मनी ठसावे 
अज -अमर प्रभूशी समरसता!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

साचचि बोलाचे नव्हे हे शास्त्र
पै संसारु जिणते हे शस्त्र 
आत्मा अवतरवी ते मंत्र 
अक्षरे इये 

ज्ञानेश्वरीतील या ओवीवर आणि स्वामी माधवनाथांच्या ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या पुस्तकातील प्रवचन क्रमांक १५४ वर आधारित काव्य.

Tuesday, November 21, 2023

माझा कैसा होईल राम?

माझा कैसा होईल राम? ध्रु.

कवित्व त्याचे
गायन त्याचे
होइन का निष्काम?१

रामचि गातो
राम ऐकतो
श्रोता गायक राम!२

विषयी विरक्ती
रामी प्रीती
पालट घडविल नाम!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज प्रवचन क्रमांक २४७, ३ सप्टेंबर वर आधारित काव्य

भगवंत माझा कसा होईल याचा आपण विचार करावा. भगवंताच्या प्राप्तीसाठी भक्ती हे सर्वांत श्रेष्ठ साधन सांगितले आहे.

प्रत्येक नामात ‘ भगवंत कर्ता ’ असे म्हणावे, म्हणजे अभिमान वाट अडवणार नाही.

Sunday, November 19, 2023

मनाला नाम घेण्याचा श्रीहरि छंद लागू दे

साधनेचे तेज चेहऱ्यावर दिसतं

मानवाला आयुष्याच्या शेवटी कसली ना कसली खंत वाटत राहते. मी कोण आहे हे कळले नाही. ही खंत लागली पाहिजे. 

मन लावून संसार केल्याने मन मळलेलं असतं. मी मूळचा तेजोमय आहे हे माणूस विसरतोच. अभ्यासाची गोडी लागली पाहिजे. रोज साधना झालीच पाहिजे. संत वचन श्रवणाने चित्त शुद्ध व्हायला लागतं. रोज अभ्यास केला तर मनही झळाळायला लागतं. चेहऱ्यावर तेज विलसतं. साधनरहित माणूस जिवंतपणीच नरकयातना भोगतो. संतवाणी ऐकली, तसे वागायचे ठरवले तर अनहित कसे होईल?
***********

मनाला नाम घेण्याचा श्रीहरि छंद लागू दे 
हरी जो आतला आहे तयाशी सख्य साधू दे!ध्रु.

कळेना कोण मी ज्याला करंटा तोच या जगती 
शांति ना सौख्य त्या जीवा तया ना लेश विश्रांती 
हरी दे संग संतांचा जगी मी नांदतो मोदे!१ 

आदि ना अंत ज्याला असा मी सोवळा पूर्ण 
हवे ना वाटते काही कर्म ही सर्व परिपूर्ण
दिवाळी हीच ज्ञानाची प्रसादा नित्य सेवू दे!२ 

बोचणी लागता जीवा चुकेना साधना येथे 
कदापि खंड जर नाही कृपा ती ईश्वरी तेथे 
दिवा हा रामनामाचा सदाचा शांत तेवू दे!३ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१३.११.१९९३ 

माजघरातली ज्ञानेश्वरी या परमपूज्य ताई दामले यांच्या प्रवचनांवर आधारित काव्य

होणार कैसी - भगवंताची भेट?

अंत:करणी विषय राहता 
होणार नाही, होणार कैसी - भगवंताची भेट?ध्रु.

प्रवचन, कीर्तन सुंदर केले
भाराभर दृष्टांत मांडले 
दिव्याखाली अंधार परी जर - 
साधनि न धरला नेट!१ 

क्वचित आढळे विषयि विरक्ति 
फारच दुर्मिळ निर्मम भक्ति
कोटींतुनि एखादा योगी 
त्यांसी भिडतो थेट!२ 

हवीच नियमित ध्यानधारणा 
सोडणे न कधि माधवचरणा 
सोऽहं भावी नित्य नांदतो 
विशुद्ध सात्त्विक हेत!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१३.१०.१९७४
केरवा 

पै तोंडभरो का विचारा 
आणि अंतःकरणी विषयांसी थारा
तरी नातुडे धनुर्धरा 
त्रिशुद्धी मी 

या ज्ञानेश्वरीतील ओवीवर आणि स्वामी माधवनाथांच्या ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या पुस्तकातील प्रवचन क्रमांक १५० वर आधारित काव्य.

भगवत्प्राप्तीसाठी प्रथमतः अंतःकरणातून विषयांविषयीचा ओढा नष्ट व्हावा लागतो ही गोष्ट जोपर्यंत घडून येत नाही तोपर्यंत नुसते तोंड भरून परमार्थिक विचार मांडले, त्यावर प्रवचने झोडली तरी त्यापासून काहीही प्रगती होणार नाही.

Saturday, November 18, 2023

जीव हा अंश समज माझा!

जीव हा अंश समज माझा!ध्रु.

देहाची या दिसे उपाधि 
तिलाचि जडती आधि- व्याधि 
आत्मा निर्लेपच राजा!१ 

ज्ञानदृष्टिने पाहू जाता 
अभिन्न मजशी सर्व तत्त्वत: 
अनुभव नित्यचि हा ताजा!२ 

"देहरूप मी" अबोध आहे 
शिवरूपासी शोधुनि पाहे 
सहज मग सरेल तव ये- जा!३ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१२.१०.१९७४
मारुबिहाग, रसिया, आधा. 
 
तसे ज्ञानाचिये दिठी 
मजसी अभिन्नचि ते किरीटी 
येर भिन्नपण ते उठी 
अज्ञानास्तव 

या ज्ञानेश्वरीतील ओवीवर आणि स्वामी माधवनाथांच्या ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या पुस्तकातील प्रवचन क्रमांक १४९ वर आधारित काव्य.

Friday, November 17, 2023

मना नाम घे, पहा अंतरी श्याम वाजवी कशी बासरी!

मनाचं प्रतिबिंब आपल्या वर्तनात!

आपल्या मनाचे प्रतिबिंब आपल्या वागण्यातून प्रतिबिंबित होते! 
देहाच्या क्षणिक सुखासाठी आपण इंद्रियांचे कौतुक करतो, इंद्रिये सांगतील तसे ऐकतो. मनाच्या घोड्याचे - इंद्रियांचे लगाम आपल्या ताब्यात ठेवले पाहिजेत. मन स्थिर होण्यासाठी नामासारखे दुसरे साधन नाही. अभ्यासाला सुरुवात केली थोडे नियम पाळू लागलो की संयम येऊ लागतो. परमार्थ हा सूक्ष्म व अंतरंगाचा असतो. अंतरीची तृप्तता भक्तीने प्राप्त होते.

**********

मना नाम घे, पहा अंतरी 
श्याम वाजवी कशी बासरी!ध्रु.

श्वासावरती लक्ष असावे 
नामस्मरणी दक्ष असावे 
राम कृष्ण हरि वदो वैखरी!१ 

तुझेच असते तुझियापाशी 
उगाच का मग वणवण फिरशी? 
एक निमिष दे वदे श्रीहरी!२ 

मना लाग रे अभ्यासाला 
जागव जागव आत जिव्हाळा
हरिभक्तीने मोक्ष ये करी!३ 

रचयिता :  श्रीराम बाळकृष्ण आठवले 
माजघरातली ज्ञानेश्वरी या परमपूज्य ताई दामले यांच्या प्रवचनांवर आधारित काव्य

Tuesday, November 14, 2023

गुणातीत व्हावं; सुखी व्हावं..!

देवाने जगात मुक्त हस्ताने सौंदर्य उधळलेलं आहे - सौंदर्याचा आस्वाद घ्यायला वेळ हवा.  संसारी जिवांचे विश्व अगदी सीमित, बंदिस्त. संत म्हणतात - राहते घर सोडू नको पण शरीर - रूपी घरात मुळीच राहू नको.

आनंदसागरात मी ला बुडवून टाक. संसाराचे खोटे ओझे क्षणभर जरी दूर केले तरी कसं वाटतं सांगू? आवाजाचा स्टोव्ह बंद केल्यावर वाटत तसं.

तुझा देहभाव हरपण्यासाठी रोज फिरत जा. तू कोणी विशेष नाहीस हे पटेल.

अभ्यासाने तीन गुण नक्की ताब्यात ठेवता येतात. 

*********

तिन्ही गुणांना लंघुनि जावे -
हरिमय हे जीवन व्हावे!ध्रु.

शरीर आहे तुरुंग मोठा 
आत सुरक्षित भावच खोटा 
मुक्त मनाने विहरावे!१ 

संसाराचे ओझे खोटे 
न दिसे परि ते जाचक मोठे 
दूर फेकुनी ते द्यावे!२ 

तुझ्याविना ना अडे कुणाचे 
चंद्रसूर्य हे झळकायाचे 
भजने मीपण विलयावे!३ 

रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले
११.११.१९९३ 

माजघरातली ज्ञानेश्वरी या परमपूज्य ताई दामले यांच्या प्रवचनांवर आधारित कविता.

सर्व काही माझे वाटो रामराया!

सर्व काही माझे वाटो रामराया!
रामराया! रामराया!ध्रु.

घडावी ती सेवा
प्रिय जीच देवा
माझा राम देई मज माउलीची माया!१

खरा कर्ता राम
खरा दाता राम
काय उणे त्याला ज्याच्या जगी रामराया!२

दिले त्यात समाधान
वाटे ज्यास तो सुजाण
रामनाम येता मुखे शिरी धरी छाया!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज प्रवचन क्रमांक २०९, २७ जुलैवर आधारित काव्य.

राम कर्ता म्हणेल तो सुखी, मी कर्ता म्हणेल तो दुःखी.
आपल्या जीवनामधली प्रत्येक क्रिया ही रामाच्याकरिता व्हावी. 
सर्व काही राम करतो, खर्रे कर्तेपण रामाचे, हे नीट लक्षात आणून, भगवंताकडे कर्तृत्व द्यावे आणि आपण मीपणाने नाहीसे व्हावे.

Sunday, November 12, 2023

येई दासबोधा, अंतरी, सोऽहं घमघमला कृपा राघवाची स्वागता शुद्ध स्वर लागला!

येई दासबोधा, अंतरी, सोऽहं घमघमला 
कृपा राघवाची स्वागता शुद्ध स्वर लागला!ध्रु. 

तुझ्या प्रसादे होता सावध कोऽहं हे कळले 
नाम दिलेसी त्या तेजाने तिमिर हि मावळले 
त्रयोदशाक्षरी मंत्र आवडे परमार्थी आगळा!१ 

एकांताची ओढ लागली मिटली नयनदले 
जनांत असुनी शांतिगृहाच्या सौख्या अनुभविले 
भक्तिकमळ उमलले पाहुनी ज्ञानभास्कराला!२ 

गुरु शिष्यांच्या संवादाची रुचीच ही वेगळी 
प्रमेय आले रुचीस येथे प्रज्ञा टवटवली 
उत्साहाचा चैतन्याचा निर्झर झुळझुळला!३

शिवथर घळ प्रत्येक मानसी सदैव असलेली 
तुझ्या वाचने साधकास ती पुरती जाणवली 
जो तो साधक डोळे मिटुनी अंतरंगि वळला!४ 

अखंड चाले सोऽहं सोऽहं रामदास वदले 
श्वासाला त्या भूदेवाने नाम जोडुनी दिले 
अनुभव घेता साधक ऐसा कणकण मोहरला!५

प्रपंच परमार्थाचे नाते उमा शंकरांचे
परस्परांविण जगी न भागे पळभर कोणाचे 
गृहस्थाश्रमी सहज पांघरे विरक्तिशालीला!६

अक्षर अक्षर ठसव मनावर ऐकावी प्रार्थना 
धार लाव प्रज्ञेला अमुच्या बळ दे गा चिंतना 
श्रीरामाचा अजुनि जिव्हाळा ध्यानी न का आला!७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
प्रसिद्धी सज्जनगड मासिक एप्रिल १९७७ चैत्र

Saturday, November 11, 2023

श्रीसमर्थां आरती! रामदासा आरती!

श्रीसमर्थां आरती! 
रामदासा आरती!ध्रु.

जांब जन्मे धन्य केले 
सान थोरा हर्षवीले 
देवभूमी गमत ती!१ 

वाहिला शिरि देवराणा 
शैशवी त्या चिंतिताना
कौतुकावह ती धृती!२ 

टाकळीला ध्यास त्याचा 
छंद त्या सर्वोत्तमाचा 
लाभु दे रामी रती!३

सर्व भारत पाहिला 
राम अंतरि स्थापिला 
योजिली नामी कृती!४ 

" खात ना आम्ही कुणाचे -
दास केवळ राघवाचे! " 
द्या निराशा थोर ती!५ 

राष्ट्र ज्यांसी देव हो 
देशकारण धर्म हो -
त्या तुम्हां ही आरती!६

दासबोधा वाचताना 
बोल परखड ऐकतांना
भक्त भाविक हर्षती! ७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०८.१२.१९७६

(पाचव्या कडव्यात निराशाचा अर्थ प्रचलित निराशा नव्हे.  निरपेक्ष वृत्ती किंवा ज्याला काही ऐहिक आशा नाहीत असा असावा .)

जो आला तो गेला मनुजा भज भज रामपदाला!

जो आला तो गेला 
मनुजा भज भज रामपदाला!ध्रु. 

एक मरे तधि दुसरा रडतो 
रडणाराही मरण पावतो 
खंड न या यात्रेला!१ 

नको शोक अन नकोच चिंता 
जे जे येई सुखे भोगता 
मिळेल अमृतपेला!२

देहदुःख विस्मरणासाठी 
रामनाम तू जोडच गाठी 
उद्धरिण्या ' तो ' ठेला!३ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

जे मन आत्मसुखा भोगे कसे ते विषयसुखी रंगे?

जे मन आत्मसुखा भोगे
कसे ते विषयसुखी रंगे?
नच ते विषयसुखी रंगे!ध्रु.

मृगजळ आले वाहुनि गेले
प्रचंड पर्वत जरा न चळे (हाले)
समदृष्टीचा संत विरागी रमला देवासंगे!१

मेघच्छाया येत न कामा
मना मोहवी जरि अभिरामा
विषय देत जे सुखाभास ते इंद्रियसंयोगे!२

शाश्वतसुख नच विषय देतसे
जहर का कधी सुधा होतसे?
सर्पफणा का देते छाया, घातक ठरे प्रसंगे!३

विरक्ति काठी टेकू देते
झंजावाती तोल राखते
निश्चयबंधू सहाय्य देता योगाभ्यसनी दंगे!४

अहंकार मन बुद्धि न उरती
ब्रह्मसुखांतरि विरूनी जाती
जिवाशिवांचा मिलनसोहळा ऐसा अद्भुत रंगे!५

देहधारी हि तरी विदेही
ब्रह्मपदाला पावत तोही
वृत्ति मनांकित, नित्यानंदी, ब्रह्मानंदा भोगे!६

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

आत्मरूप होणे ध्येय साधकाला!

आत्मरूप होणे ध्येय साधकाला!ध्रु.
 
जन्म - मृत्यु नाही मजला 
स्तुतिनिंदा लेप न कसला 
राम सर्व ठायि आहे भरुनि राहिलेला!१

त्रिगुणात्मक प्रकृति बनली 
गुंते नर नकळत जाली 
अहंकार निरसन होता, मार्ग खुला झाला!२

अभेदत्व अंगी यावे 
विश्वरूप मनि विकसावे 
हेच भजन दिव्या दृष्टी देत साधकाला!३ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

म्हणोनि विश्वपण जावे 
मग माते घेयावे 
तैसा नव्हे आघवे
सकटचि मी 

ऐसेनि माते जाणिजे 
ते अव्यभिचारी भक्ति म्हणिजे 
येथे भेद काही देखिजे
तरि व्यभिचारु तो

या ज्ञानेश्वरीतील ओव्यांवर आणि स्वामी माधवनाथांच्या ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या पुस्तकातील प्रवचन क्रमांक १३९ वर आधारित काव्य

Tuesday, November 7, 2023

स्थितप्रज्ञ तो जगी खरा!

दुःखाने हिरमुसला व्हायचे नाही, आनंदाने हुरळून जायचे नाही. बुद्धी कुठल्याही प्रसंगात स्थिरच ठेवायची.

भगवंतांनी एका मागून एक खुणा सांगितल्या. असा हा स्थितप्रज्ञ खऱ्या अर्थाने जीवन जगणारा असतो. पलायनवादी तर नसतोच नसतो.

शरीर यात्रा व्यवस्थित चालू ठेवावी यासाठी तो यत्नशील असतो.
आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा अगदी आत्मतृप्त, नित्य आनंदी वृत्तीचा असतो.

मोहोराने लहडलेला आम्रवृक्षच जणू! पिसारा फुलवून नाचणारा मत्त मयूरच!

स्थितप्रज्ञाची लक्षणे विशद करून सांगण्यासाठी भगवान म्हणाले -
**********

जो उदास राही फला न वांछी
रडे न दुःखी हसे न सौख्यी
स्वतःशीच संतुष्ट पुरा
स्थितप्रज्ञ तो जगी खरा!१

कुणा न वंदी कुणा न निंदी
संयम पाळी रमे न विषयी
कूर्मापरि रोधी गात्रा 
स्थितप्रज्ञ तो जगी खरा!२

गात्र गुंतवी मनास वळवी
भजनी रंगुनी सत्पथ दावी
स्वकर्म दीपे उजळि घरा
स्थितप्रज्ञ तो जगी खरा!३

कर्म न टाळी स्वधर्म पाळी
कुशल होउनी विकार जाळी
कैवल्याचा जणु पुतळा
स्थितप्रज्ञ तो जगी खरा!४

द्वाड इंद्रिया मुळी न मारी
मितोपभोगे तयां सावरी
स्थिरावली ज्याची प्रज्ञा
स्थितप्रज्ञ तो जगी खरा!५

झरा सुधेचा उदरी ज्याच्या
तृषा क्षुधाही अंकित त्याच्या
प्रसन्न नित ज्याची मुद्रा
स्थितप्रज्ञ तो जगी खरा!६

विश्व झोपते तेव्हा जागा
नच संदेहा मनात जागा
जागृत राहुन वाहि धुरा
स्थितप्रज्ञ तो जगी खरा!७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Sunday, November 5, 2023

अनंत रूपे अनंत नटला

अनंत रूपे अनंत नटला देखिलें त्यासी - 
खूण बाणली कैसी? ध्रु.

चैतन्याचा विलास येथे 
चैतन्याविण काहीच नसते 
जगत् जीव परमात्मा एकच
मिळविलेच ज्ञानासी!१ 

भूषण कधि झाकते सुवर्णा
तेज प्रकटवी अधिकच रत्ना 
रूपे नामे असोत अगणित 
जाणलेच तत्त्वासी!२ 

कशास जगता दूर सारणे? 
सर्व ठिकाणी हरि पाहणे 
गुरुकृपेने स्वरूप - ज्ञाने 
सोऽहं बोध मनासी!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०९.०८.१९७४
केदार, त्रिताल

जालेनी जगे मी झांके
तरी जगत्वे कोण फाके?
किळेवरी माणिके 
लोपिजे काई?
म्हणोनि जग परौते
सारूनि पाहिजे माते
तैसा नोहे उखिते
आघवे मीचि

या ज्ञानेश्वरीतील ओव्यांवर आणि स्वामी माधवनाथ यांच्या ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या पुस्तकातील प्रवचन क्रमांक १३७ वर आधारित काव्य.

Saturday, November 4, 2023

नको नको करू लाड कधी इंद्रियांचे समाधान त्याने कधि का होतसे जिवाचे!

इंद्रियांचे लाड नकोत

घरात दहा माणसं असली की सर्व जणांचं करता करता घरातल्या मुख्य बाईचा जीव मेटाकुटीला येतो. तिला थोडा सुद्धा विसावा मिळत नाही. आपल्या शरीराच्या घरात पण दहाच माणसं आहेत. पंच ज्ञानेंद्रिये, पंच कर्मेंद्रिये. जीव मायेत गुंतलेला मनाला विश्रांती कशी मिळायची?

देवासाठी एवढे कष्ट घेतले असते तर देव तरी प्रसन्न झाला असता - खरं तर या संसाराचा कर्ता कोण? माझे प्रयत्न व प्रभूची इच्छा असेल तरच जीवनात स्वास्थ्य मिळेल.

भक्तीने रघुपतीस आळवावे.
******

नको नको करू लाड कधी इंद्रियांचे
समाधान त्याने कधि का होतसे जिवाचे!ध्रु.

हवे हवे संपत नाही 
माय मात्र कष्टत राही 
गणित ना सुखाचे काही असे सुटायाचे!१ 

जीव गुंतला मायेत 
राम नाही हाता येत 
देह होत कोठारच हे मनोविकारांचे!२

ओढ जिवा प्रपंचाची 
तमा कोठली कष्टांची? 
मन:स्वास्थ्य गेले, ये ना नाम विठोबाचे!३ 

जीभ आणता ताब्यात 
तीही रमे अभंगात 
अता तरी साध जीवा हित आयुष्याचे!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०४.११.१९९३
माजघरातली ज्ञानेश्वरी या परमपूज्य ताई दामले यांच्या प्रवचनांवर आधारित काव्य

Friday, November 3, 2023

सुख विषयामधि नाही!

किती कितीदा सांगावे?
सुख विषयामधि नाही!ध्रु. 

अंत न भोगा 
स्‍थानचि रोगा 
जो विषयदास त्‍यासी, शून्‍य दिशा दाही ! १ 

घ्‍या हो नामा 
आळवा रामा 
जर नाम कंठि धरले, मग बाधत ना काही! २ 

धुंदि निराळी 
तृप्ति निराळी 
जो वासनांस जिंके, तो समाधानी राही! ३ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले 

गोंदवलेकर महाराज प्रवचन क्रमांक २३५, २२ ऑगस्‍ट वर आधारित काव्‍य.

प्रत्येकाला त्याची गरज भागेल एवढे भगवंत देतच असतो, म्हणून जे आहे त्यात समाधान मानावे.

आपुले आपणां झाले विस्मरण! आपणां आपण पाहणे हे ज्ञान!

आपुले आपणां झाले विस्मरण!
आपणां आपण पाहणे हे ज्ञान!ध्रु.

मी कोण? याचा करावा विचार
देहाचा साधकां पडावा विसर
नच घडू द्यावा विकारांनी ताण!१

भवस्वर्गादिकां तिलोदक द्यावे
आत्मसुख लाभो - मनी हे धरावे
उपासावे आधी गुरूचे चरण!२

सोऽहं भजनात होताच तन्मय
झणी एक होती ज्ञाता आणि ज्ञेय
प्रत्यये वदाल हेच आत्मज्ञान!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०८.०८.१९७४
पूरिया, भजनी धुमाळी

एऱ्हवी ज्ञान हे आपुले
परी पर ऐसेनि जाले
जे आवडोनि घेतले
भवस्वर्गादिक

या ज्ञानेश्वरीतील ओवीवर आणि स्वामी माधवनाथांच्या ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या पुस्तकातील प्रवचन क्रमांक १३६ वर आधारित काव्य.

Tuesday, October 31, 2023

तो नर कृतार्थ मानी, अर्जुना!

भगवान श्रीकृष्‍णांना अर्जुनासारखा जिज्ञासू श्रोता लाभला.  निष्‍काम कर्माचा बोध कोणाला झाला असे समजावे? ज्ञानी पुरुष संसारात कसा वावरतो? अशा प्रश्‍नांची उत्‍तरे देण्‍यासाठी भगवान श्रीकृष्‍ण त्‍या पुरुषाची लक्षणे सांगू लागले.  ज्ञानरूप अग्निज्‍वालेने फलाशा  बुद्धीचे अंकुर मुळातच नाहीसे झालेले आहेत असा कृतकृत्‍य पुरुष मनुष्‍यररूपाने ब्रह्मच मानावा असा गौरव श्रीकृष्‍णांनी केला.  अर्जुनास तसे होण्‍याची प्रेरणा दिली 
*******

तो नर कृतार्थ मानी, अर्जुना! ध्रु. 

पदतळि तुडवित अहंभाव तो 
आकाशासम विशाल होतो 
चित्ती ज्‍याच्‍या भाव आपपर नाममात्र राहीना! १ 

देहासक्ती ज्‍याची मिटली 
चित्ताची तर भ्रांती फिटली 
करुनी कर्मे कर्मरहित तो कर्तेपण स्‍वीकारिना! २ 

योगक्षेमा खेळ खेळतो 
साक्षित्‍वाने स्‍वये पाहतो 
हेतुशून्‍य निष्‍काम कर्म ते यज्ञ थोर ही भावना! ३ 

ज्ञानाधारे द्वैत नाशते 
अनुभवधन परि विशुद्ध उरते 
सोऽहं सोऽहं ही अनुभूती उज्ज्वल करिते जीवना! ४ 

त्‍याग नाव यज्ञाला दुसरे 
तनमनसंयम योग जाण रे
ज्ञानयज्ञ तर तोडी तटतट सर्व तऱ्हांच्या बंधना! ५ 

संकल्‍पाचे अतीत व्‍हावे 
मोही कसल्‍या नच गुंतावे 
ज्ञानाग्‍नी करि भस्‍मसात झणि कर्मरूपी इंधना! ६ 

पवित्रतम जगि ज्ञानच केवळ 
मुक्त दरवळो विरक्ति परिमल 
परमशांति ज्‍या मिळवायाते विलंब काही लागत ना! ७  

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले 
०१.०१.१९७३

श्रीरामाचा पोवाडा..

कर्तव्याच्या मार्गावरती निर्धाराने चालू दे
श्रीरामाचा पोवाडा या श्रीरामाला गाऊ दे!ध्रु.

नाम स्मरता उमजू लागे जीवनातला श्रीराम
राजा व्हावे मनामनाचा नेत्याला ना विश्राम
अतुलविहारी एकलाच तो त्याचे कौतुक गाऊ दे!१

मायपित्यांची सेवा म्हणजे सोन्याची असते संधी 
प्रसन्नतेतच त्यांच्या बघतो निष्प्रभ ठरती त्या व्याधी
घरीच काशी, गंगा सरिता अनुभव घेता येऊ दे!२

दुसऱ्याचे सुख ते माझे सुख वेदना तिथे कळ येथे
समाजात या पूर्ण मिसळता बोथट होती ते काटे
देवघेव प्रेमाची ऐसी घराघरातुन चालू दे!३

सत्य सूर्य जो प्रभा तयाची तनीमनी या पसरावी
शांतिचंद्र तो आभा त्याची वदनावरती विलसावी
ठरो अयोध्या नगरी नगरी रामायण मज गाऊ दे!४

तुझे नि माझे दुजेपण असे भाल्यासम ते भोसकते
एकत्वाचे अमृत औषध संतांना ते सापडते
तू मी तो तर आत्मारामच पाठ नेहमी गिरवू दे!५

सुनील होता रामचंद्र तो, लक्ष्मीची मूर्ती सीता
सेवेचा आनंद आगळा सौमित्रहि घेतच होता
भरताच्या भावाची भरती मनोमन मला जाणू दे!६

रघुपति राघव राजाराम, पतित पावन सीताराम
जीवनमूल्ये पुन्हा जागवू भूमिके वरी ठाकू ठाम
चुका आमुच्या आम्ही सुधारू आशा ऐसी पालवु दे!७

रामायण वाचता ऐकता मनात येतो ओलावा
जिव्हाळा वाढतो होतसे भाऊ आवडता भावा
भोगाहुनही त्याग सुखाचा जे जे कळते ते वळु दे!८

संस्काराविण मानव दानव संस्कारे घडतो देव
हासत करतो सहन वेदना तो मानव ठरतो देव
देहाच्याही पलीकडे तो आत्मा रामच जाणू दे!९

पतिपत्नींचे मंगल नाते भावाभावांची माया 
कर्तव्याच्या पालनात श्रीराम मंदिराचा पाया
नामाचा ध्वज कळसावरि तो आनंदाने फडकू दे!१०

चिंतनास चालना चैत्र दे रहस्य नकळत उलगडते
तप केल्याविण आम्रफलाला अमृतपण कोठे मिळते
सागरावरी सेतु बांधला स्फुरण त्यातुनी लाभू दे!११

अशिवातुन शिव ये जन्माला राजा दशरथ करि दिव्य
पाप्याला देहांतच शासन उजळे तेणे भवितव्य
भ्रष्टाचारच रावण त्याला सज्जन राघव दंडू दे!१२

महाकाव्य इतिहास अलंकृत आदरपूर्वक अभ्यासा
आचारे आचार्य होतसे सद्गुण दैवी जोपासा
अभिनव पाठ्यक्रम हा ऐसा पालट सुंदर घडवू दे!१३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१०.०३.१९९९

Monday, October 30, 2023

परमार्थातही, अंधश्रद्धा नसावी.

परमार्थातही, अंधश्रद्धा नसावी.

वास्तविक देवाला जाण्याचा व संसारातील इष्ट गोष्टी घडण्याचा अर्थाअर्थी काही संबंध नसतोच! फक्त आपल्या मनातला भाव! याला काय म्हणायचं? 

सत्संगाने नामस्मरण करावेसे वाटते. विवेक आपला खरा स्वार्थ कशात आहे ते सांगतो. नामस्मरणाने वृत्तीत पालट होतो. 

आपणच आपल्या उद्धारासाठी परमार्थाचा मार्ग सोडता उपयोगी नाही. 
********

देव देत नाही काही! देव घेत नाही काही!ध्रु.

ज्याचे त्यानेच चालावे 
घर आपले गाठावे
हरिनाम घेतो त्याचा धीर वाढताच राही!१

काम आपुले करावे 
कुठे मने न गुंतावे
हरिनाम घेता घेता वृत्ती पालटत जाई!२

ज्याचा जेवढा अभ्यास
फळ तेवढेच त्यास
हरिनाम घेता घेता शांति हृदयात येई!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०५.११.१९९३

माजघरातली ज्ञानेश्वरी या परमपूज्य ताई दामले यांच्या प्रवचनांवर आधारित काव्य.

भगवंता इतके द्यावे - ' मी माझे ' सर्व सरावे!

निरहंकाराने देव आपलासा होतो!

परमार्थ मार्गाची थोडीशी वाटचाल झाली, की वाटतं, आपण विशेष आहोत. (हाच अहंकाराचा वारा..). प्रत्येक जण आपण केलेल्या परमार्थाचा हिशोब मनात जुळवत असतो. 

आपली साधना पूर्ण झाली आहे असे ज्याला वाटते, तो संपलाच समजावा! नाम घेता घेता जो स्वरूपाशी तदाकार झालेला असतो त्याच्याकडेच भगवान जातात व त्याचा हात धरून त्याला घेऊन जातात. 

अहंकाराजवळ परमेश्वर कसा येईल?
********

भगवंता इतके द्यावे - 
' मी माझे ' सर्व सरावे!ध्रु.

मी कर्ता घातक भाव 
मग सरे न धावाधाव 
लेकरा कडेवर घ्यावे!१ 

अभिमान वसन हे मळके 
कधी भरते गळके मडके? 
मन निरहंकारी व्हावे!२ 

तू साधन घे करवून 
मज पटो आपली खूण 
संसारी असुनि नसावे!३ 

रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले
०९.११.१९९३ 

माजघरातली ज्ञानेश्वरी या परमपूज्य ताई दामले यांच्या प्रवचनांवर आधारित काव्य.

Saturday, October 28, 2023

पहावे आपणासि आपण तेचि जाणावे ज्ञान!

पहावे आपणासि आपण
तेचि जाणावे ज्ञान!ध्रु.

आत असे ' मी '
विश्वी तो ' मी '
पटली ही खूण!१

सद्गुरु शिकवी 
हातुनि करवी
लागे मग ध्यान!२

ज्ञान जाहलें
तनिमनि मुरले
जनांस ये कळुन!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२९.०७.१९७४

मग तेचि इये शरीरी।
जै आपुला प्रभावो करी।
तै इंद्रियांचिया व्यापारी।
डोळाही दिसे ।।

या ज्ञानेश्वरीतील ओवीवर आधारित आणि स्वामी माधवनाथांच्या ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या पुस्तकातील प्रवचन क्रमांक १२८ वर आधारित काव्य.

आनंदी असणे हेच ते प्रभूकडे जाणे!

आनंदी असणे हेच ते प्रभूकडे जाणे!ध्रु.

ठेव कसा ही
तुझाच राही
तुझा लाभ व्हावा अन्यथा व्यर्थ व्यर्थ जगणे!१

स्वस्थ बसावे 
मज शिकवावे
तू गुरु, देव हि तू - स्फुरु दे भक्तीचे गाणे!२

निष्ठा दे रे
तळमळ दे रे
करुणेच्या मेघा, चातकास्तव धावत येणे!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज प्रवचन क्रमांक २३९, २६ ऑगस्ट वर आधारित काव्य.

कारणावाचून आनंद, तो खरा.
आनंद मिळविण्यासाठीच प्रत्येक मनुष्याची खटपट आहे; पण कारणावर अवलंबून असणाऱ्या आनंदाची वाट दु:खामधून आहे, आणि त्या आनंदासाठी मनुष्य दु:खदायक प्रपंचाची कास धरतो. म्हणून, कोणतेही कारण नसलेला आनंद भोगण्याची आपण सवय लावून घ्यावी.

राम आहे अंतरी या पाहिजे दृढ भावना!

राम आहे अंतरी या पाहिजे दृढ भावना!ध्रु.

राम कर्ता राम दाता
राम वक्ता राम श्रोता
चालवीतो तनमनाची राम सगळी यंत्रणा!१

हृदय झाले क्षेत्र काशी
सद्गुरु तर हृदयवासी
तोच मी! श्रद्धा अभंगा राघवाची अर्चना!२

देव आहे साह्यकारी
या मनाची हीच खात्री
ना शिवो माझ्या मनासी वावगा कर्तेपणा!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज प्रवचन क्रमांक ३०२, २८ ऑक्टोबर वर आधारित काव्य 

परमेश्वर आपल्या हृदयात आहे. 
उपासनेचा हेतू असेल तर तो राम आपल्या पाठीमागे उभा आहे ही भावना उत्पन्न करणे हा होय.

Tuesday, October 24, 2023

सांगे गीता


नको शोक जे नश्वर त्याचा 
सांगे गीता!१ 

मी नच कर्ता, फल न लगे मज 
सांगे गीता!२ 

विहित कर्म हे भगवत्पूजन 
सांगे गीता!३ 

अभ्यासे मन आवरताहे
सांगे गीता!४

आत्मतत्त्व सर्वत्र नांदते 
सांगे गीता!५

स्थितप्रज्ञ जो जगी धन्य तो 
सांगे गीता!६

दे धैर्याने तोंड प्रसंगा 
सांगे गीता!७

तत्त्वासाठी युद्ध करावे 
सांगे गीता!८

स्वर्गनरक या जीवनांतरी 
सांगे गीता!९

अंतरात भगवंत नांदतो 
सांगे गीता!१० 

जनी जनार्दन कसा पाहावा 
सांगे गीता!११ 

पार्थ नि माधव एक तत्त्वतः 
सांगे गीता!१२ 

नकोस समजू हीन आपणा 
सांगे गीता!१३

स्वभाव सात्त्विक यत्ने होतो 
सांगे गीता!१४ 

मी गंगा तू कर अवगाहन 
सांगे गीता!१५

रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले
१८.१०.१९८२

श्रीरामकृपेचे वैभव हे घ्‍या ध्‍यानी, घ्‍या ध्‍यानी!

श्रीरामकृपेचे वैभव हे घ्‍या ध्‍यानी, घ्‍या ध्‍यानी! ध्रु. 
  
जे घडते ते त्‍याची सत्ता
जे लाभे ते त्‍याची मत्ता 
रामनाम घ्‍या उठता बसता तसे निरंतर जनि विजनी! १ 

दु:खाविषयी घृणा नको 
सुखविषयक लालसा नको 
राम ठेवु दे कसेहि अपणा रंगायाचे तद् भजनी! २  

भगवद्भजनी वृद्ध रमू दे 
कर्तव्‍यी रत, युवक असू दे 
भगवद्प्रेमा साधे केवळ रामचंद्र नामोच्‍चरणी! ३ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले 

गोंदवलेकर महाराज प्रवचन क्रमांक २३१, १८ ऑगस्‍ट वर आधारित काव्‍य 

 आपले हे सर्व वैभव केवळ रामाच्या कृपेचेच आहे. जो काही पैसाअडका, मानमरातब मिळतो आहे, तो सर्व भगवंताच्या कृपेमुळेच आहे हे प्रत्येकजण जाणून आहे. म्हणून जे जे कर्म आपल्या हातून घडत असते ते त्याच्याच सत्तेने होत असते याची खात्री बाळगून, कोणत्याही बऱ्यावाईट कर्माचा अभिमान धरू नका.
म्हातारे असतील त्यांनी भगवद्भजनात आपला वेळ घालवावा, आणि तरुण असतील त्यांनी भगवत्स्मरणात कर्तव्याला चुकू नये, हाच समाधानाचा मार्ग आहे; यातच सर्वस्व आहे.

Sunday, October 22, 2023

जय जय विठ्ठल रखुमाई !

जय जय विठ्ठल रखुमाई ! ध्रु.

कटीवरी कर ठेवुनि असती 
जे येती त्या धीर पुरवती 
कलियुगात नवलाई!१ 

पतिपत्नींची ऐसी जोडी 
प्रपंचात परमार्था जोडी 
इथे शिकू चतुराई!२ 

उभ्या जगाची यांना चिंता 
परि मुद्रेवर ना त्रासिकता 
ठाम भूमिका राही!३ 

चरण जुळवुनी उभे रहावे 
तटस्थ व्हावे, अवलोकावे 
संकट येई जाई!४ 

संतांचे माहेर पंढरी 
ते तर आले अपुल्या दारी 
सदनच पंढरि होई!५

दुःख दुज्याचे जाणुनि घ्यावे 
अश्रु पुसावे उरी धरावे 
मन गंगाजल होई!६

नाम घालते मनास आळा 
नाम नमविते त्या कळिकाळा
हरिपाठा नित गाई!७ 

पुंडलिकास्तव विठ्ठल आला 
रखुमाईला निरोप कळला 
पति शेजारी येई!८ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२८.०२.१९९५

Saturday, October 21, 2023

ते भगवंता आवडते

अन्य योनींना पापपुण्य नाही

मानव सोडून सर्व योनी पाप पुण्याच्या पार आहेत. मनुष्य मात्र स्वतःच आपल्या प्रगतीला अथवा अधोगतीला जबाबदार असतो.
अज्ञानी जीव निरपेक्षपणे कुठलेही काम करूच शकत नाही. निरपेक्षतेने, निरहंकार वृत्तीने केलेले कर्मच ईशाला आवडते. सत्त्वगुणाच्या प्रभावाने मन व इंद्रिये प्रसन्न असतात. त्यामुळे चटदिशी ज्ञान ग्रहण करता येते. आत्महित साधायचं म्हणजे थोडे कष्ट हे आहेतच. साधनेची गोडी लागली की पुण्य कर्मे घडतात व ती सहजपणे होतात. मानवाने वेळीच सावध व्हायला पाहिजे.
********

नको अहंता, नको अपेक्षा, कर्म असे जे जे घडते 
ते भगवंता आवडते!ध्रु.

मी माझे हे अज्ञान 
ते दुःखा कारण जाण 
हे कळताक्षणि ग्रहण सुटे!१
 
आळस घातक सिद्ध सदा 
तो हाणतसे शिरी गदा 
उद्योगे लक्ष्मी येते!२

सावध वेळेवर व्हावे 
जीवन स्मरणे उजळावे 
सदाचरण सवयच बनते!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१०.११.१९९३

(माजघरातली ज्ञानेश्वरी या परमपूज्य ताई दामले यांच्या प्रवचनांवर आधारित काव्य)

Thursday, October 19, 2023

मी सांगतो तुला रे - निष्काम प्रेम भक्ती!

मी सांगतो तुला रे - 
निष्काम प्रेम भक्ती!ध्रु.

जनकारणी झिजावे
त्यागात दंग व्हावे
अस्तित्व वेगळे ना
ऐसी विशुद्ध रीती!१

हे भक्ति हे चि ज्ञान
हे ध्येय हेच ध्यान
नच कामनांस थारा
निरपेक्ष दिव्य प्रीती!२

जगि एक तोच भक्त
पळ ही न जो विभक्त
तो अंतरात माझ्या 
होऊन राहि मूर्ती!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२२.०७.१९७४ 

गेला दरिया पार , केरवा

जयाचिया ठायी पांडवा
अपेक्षे नाही रिगावा
सुखासि चढावा
जयाचे असणे

या ज्ञानेश्वरीतील ओवी वर आणि स्वामी माधवनाथांच्या ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या पुस्तकातील प्रवचन क्रमांक १२१ वर आधारित काव्य.

भाग्यवान तो, ज्याला राम भेटला!

भाग्यवान तो, ज्याला राम भेटला!ध्रु.

नामामृत सेवितसे
आनंदे डोलतसे
अश्रूंचा पूर अजि नयनि लोटला!१

अहंकार लव न त्यास
रामाचा नम्र दास
भक्तीने रामचंद्र विकत घेतला!२

' देह नव्हे मी ' कळले
सोऽहं मय जग सगळे
घेइ मोद वितरी मोद छंद आगळा!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज प्रवचन क्रमांक ३०५, ३१ ऑक्टोबर वर आधारित काव्य. 

ज्याला भगवंत भेटला तो खरा भाग्यवान. भगवंत आपल्याला भेटणे हे प्रत्येकाने जीवनातले मुख्य कार्य समजावे.

Monday, October 16, 2023

मी पाठीशी, पुढेच चल तू माधव सांगे पार्था!

मी पाठीशी, पुढेच चल तू
माधव सांगे पार्था!ध्रु.

भवती तांडव
मनात माधव
भक्तिदीप तो तेवत राही पंथे पुढती जाता!१

रघुपति राघव
यदुपति माधव
जीवन अवघे होते गीता राम कृष्ण हरि म्हणता!२

देह विसरणे
देव स्मरणे
सोऽहं आहे सार सांगते प्रेमळ गीतामाता!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज प्रवचन क्रमांक ३०६, १ नोव्हेंबर वर आधारित काव्य.

ज्ञानेश्वरी ही भगवंताची वाणी होय. त्यात सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करावे. ‘ मी मागे आहे, तू पुढे चल. ’ हेच भगवंतांनी आपणा सर्वांना सांगितले आहे.
भगवंताच्या इच्छेने सर्व घडत आहे, ही भावना ठेवून आपले कर्तव्य करणे, हे गीतेचे सार आहे.

खोटी आशा घात करते



खरे तर परमेश्वर सर्वत्र भरलेला आहे. पाने, फळे, फुले त्याचीच रूपे हे माहीत नसल्याने समोर प्रभू असून दिसत नाही. चैतन्यमय प्रभू आपल्या अंतःकरणातच आहे. परमेश्वराशिवाय इतकं जवळ शेवटपर्यंत कोणी असत नाही. हे न कळल्याने मानव दुःखी होतो. सुख मिळेल या खोट्या आशेने ऊर फुटेतो धावतो आणि मरून जातो.  दुःखाचे मूळ षड्रिपूत आहे. एका ठिकाणी बसून चिंतन करणे जमले पाहिजे सद्गुरूंचा लाभ झाल्यावर त्यांच्या उपदेशानुसार अभ्यास केला तरच मानवी जीवन कृतार्थ होते.

************

सुख मिळेल आशा सोडावी
विषयांची संगत टाळावी!ध्रु.

हाव हावरी फरफट करते
क्रोधे अंतःकरण पेटते
षड्रिपुच फसविती मायावी!१

चल एक ठिकाणी बैस जरा
बघ रम्य पसरली वसुंधरा
सोऽहंची मुरली ऐकावी!२

हरिचिंतन चिंता घालवते
आतल्या हरीला भेटविते
सद्गुरुकृपा ही समजावी!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०६.११.१९९३
(मजघरातली ज्ञानेश्वरी या परमपूज्य ताई दामले यांच्या प्रवचनांवर आधारित काव्य)

Sunday, October 15, 2023

निशिदिनि मधुगीता अंतरंगी जपावी



अचपळ मन माझे नावरे आवरीता
तुजविण मज कोणी नाहि रे सावरीता
पळभर तरि चित्ता शांतता सापडावी
निशिदिनि मधुगीता अंतरंगी जपावी!१

मजसम जगि कोणी नाही तत्वार्थवेत्ता 
अजुनिहि भुलवीती मानसा श्री नि सत्ता 
प्रतिपळ बुडताहे काय युक्ती करावी
निशिदिनि मधुगीता अंतरंगी जपावी!२

मजवरि करुणेचा माधवा पूर लोटी
अगणित अपराधा माधवा घाल पोटी
घडिघडि मम वृत्ती सद्गुरो पालटावी
निशिदिनि मधुगीता अंतरंगी जपावी!३

स्मरणरहित कृष्णा सर्व हा जन्म जाई
झडकरि मम साह्या केशवा कोण येई
तळमळ निववाया माउली आठवावी
निशिदिनि मधुगीता अंतरंगी जपावी!४

सहजच तनु टाकी घाबरा जीव होतो
तडफड बहु चाले पूर्ण अस्वस्थ होतो
अजर अमर आत्मा खूण त्वां दाखवावी
निशिदिनि मधुगीता अंतरंगी जपावी!५

हळुहळु मन होई संयमी नी विचारी
अगणित बुध योगी सांगती तू सुधारी
धडपड मम देवा मी कशी चालवावी
निशिदिनि मधुगीता अंतरंगी जपावी!६

वश न मन जयाला सर्वथा तो भिकारी
स्थिर मति जगि ज्याची तो खरा ब्रह्मचारी 
अनुसरु तरि कोणा तू दिशा दाखवावी
निशिदिनि मधुगीता अंतरंगी जपावी!७

चुकत शिकत जाता थोर आनंद व्हावा 
"हरि, हरि" म्हणताना मुक्तिमेवा मिळावा
नरतनु प्रभुकार्यी चंदनी खोड व्हावी
निशिदिनि मधुगीता अंतरंगी जपावी!८

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Saturday, October 14, 2023

माझ्या भक्तांलागी कुठली संसाराची चिंता?

माझ्या भक्तांलागी कुठली संसाराची चिंता?ध्रु.

सर्व भार माझ्यावर
टाकताति निरंतर
कोरान्न का मागे कधी समर्थाची कांता?१

जे जे घडे हातातून
मलाच ते समर्पून
राहतात मोकळे त्या काय करे गुंता?२

देहभाव मावळतो
जन्म मरण फेरा टळतो
सोऽहं साधनेत रमता काय उणे भक्ता?३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१६.०७.१९७४

एऱ्हवी तरी माझिया भक्ता
आणि संसाराची चिंता
काय समर्थाची कांता
कोरान्न मागे?

या ज्ञानेश्वरीतील ओवीवर आणि स्वामी माधवनाथांच्या ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या पुस्तकातील प्रवचन क्रमांक ११५ वर आधारित काव्य.
काफी, केरवा भजनी धुमाळी

Friday, October 13, 2023

सोडुनी या जगताची आस व्हायचे भगवंताचे दास!

सोडुनी या जगताची आस
व्हायचे भगवंताचे दास!ध्रु.

मनी विमलता ऐसी यावी
रसाळता शब्दांत मुरावी
मुखावर प्रसन्नसे मधु हास!१

चिंतेचे जधि नाव संपले
रामनाम श्वासातुनि स्फुरले
सुखवु दे भगवद्भक्ति विलास!२

राम ठेवितो तैसे राहू
अवती भवती रामचि पाहू
विरक्ती नाव भक्तिभावास!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज प्रवचन क्रमांक ३०३,   २९ ऑक्टोबर वर आधारित काव्य. 

भगवंताचे होण्यास आपण निर्दोष असणे जरूर आहे.
ही प्रपंचाची आणि जगाची आस सोडून भगवंताचे दास झाल्याशिवाय आम्हाला समाधान मिळणे कठीण आहे.

Wednesday, October 11, 2023

आसक्ति मूळ दु:खाचे ..

आसक्ति मूळ दु:खाचे 
भक्तीच राज्‍य सौख्‍याचे! ध्रु.  

‘मी करतो’ ऐसे म्‍हणणे 
बंधनात आपण पडणे 
हे जिणे काय कामाचे? १ 

घे रामनाम दिनराती 
तो राम खरा सांगाती 
अम्‍ही दास न कुणि देहाचे! २  

जो विषयि नसे आसक्त 
देहात राहुनी मुक्त 
करि स्‍मरण रामचंद्राचे! ३ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले 
गोंदवलेकर महाराज प्रवचन क्रमांक ३०७, २ नोव्‍हेंबर वर आधारित काव्‍य 
आसक्ती वस्‍तूंमध्‍ये नसावी भगवंताच्‍या ठिकाणी असावी.

तू पाठीशी असता रामा कशास करणे चिंता?

तू पाठीशी असता रामा
कशास करणे चिंता?ध्रु.

जे जे घडते हितार्थ असते
बाळ अडाणी माय जाणते
मोद उरे काळजी संपता!१

कर्तेपण जर तुला वाहिले
ओझे भारी सहजचि सरले
विनम्रता दे सीताकांता!२

स्वानंदामधि तुला स्मरावे
तुला स्मरावे निर्भय व्हावे
हे ही सगळे तूच वदविता!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

(गोंदवलेकर महाराज प्रवचन क्रमांक ३०१, २७ ऑक्टोबर वर आधारित काव्य)
परमेश्वराकडे कर्तेपण देऊन काळजी सोडून द्यावी. आपला देह प्रारब्धावर टाकून, साधकाने मजेत त्याच्या सुखदुःखाकडे पाहावे.

Sunday, October 8, 2023

आहे खुली सकलिकां मननास गीता


 
पार्था रणांगणि जिथे अति मोह झाला 
कर्तव्य काय म्हणुनी रणि स्तब्ध झाला 
सोडूनि स्वार्थ, रणि झुंजच धर्म आता
आहे खुली सकलिकां मननास गीता!१ 

नैराश्य येथ मुळि ना अति धैर्य आहे
चांचल्य येथ मुळि ना अति स्थैर्य आहे 
सामर्थ्य मूर्त प्रकटे किति लाभ मोठा
आहे खुली सकलिकां मननास गीता!२

एकेक श्लोक मतिला अति चालना ती 
एकेक मौक्तिक असे सहवे न दीप्ती
रत्नाकरास जगती नच जोड आता
आहे खुली सकलिकां मननास गीता!३

पार्था निमित्त करुनी उपदेश केला 
जो ऐकता सपदि मोह निघून गेला
आसक्ति सोड सगळी सुटतोच गुंता
आहे खुली सकलिकां मननास गीता!४

मी देह देह म्हणता बनते समस्या 
कर्तृत्व भार वहता फसते तपस्या
यज्ञार्थ कर्म सगळे, नच मोह भक्ता
आहे खुली सकलिकां मननास गीता!५

बिंदू न भिन्न उरतो सरितेविना तो
दानाविणा न कवणा कधि लाभ होतो
द्या ज्ञान जे जवळचे जपयज्ञ मोठा
आहे खुली सकलिकां मननास गीता!६

जे दिव्य भव्य सगळे हळु मेळवावे
माझ्यापरीच सगळे मनि वागवावे
कृष्णांकिता न जगती कसलीच चिंता
आहे खुली सकलिकां मननास गीता!७

वृत्तीत पालट घडे जर ध्यास लागे
ही इंद्रिये वश मना जर ध्यास लागे
नाही अशक्य जगती अभ्यास घडता
आहे खुली सकलिकां मननास गीता!८

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

शरणागती


सर्व प्रकारच्या धर्माचा त्याग कर आणि तू मला एकट्यालाच शरण ये - यामुळे मी तुला सर्व पाप कर्माच्या फलापासून मुक्त करीन. म्हणून तुला कशाचीही भीती नाही.  हे आश्वासन ऐकल्यावर मनात उठलेला तरंग ..

******** 

आलो शरण तुला श्रीकृष्णा!ध्रु.
 
तव गीता मज अंगाई 
भवदुःख लयाला नेई 
दे मना जोडुनी पवना!१ 

तू नाम वदवुनी घेई 
तू सत्कर्मी रति देई 
गीतेतुन अंतरि ये ना!२ 

मन तनात गुंतुन राही 
तव नाम न वदनी येई
निर्मळ कर घाली स्नाना!३

तू श्रवणी, स्मरणी येई 
मन चंचल सुस्थिर होई
कर पूर्ण मला संपूर्णा!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
१३.१२.१९८३

Wednesday, October 4, 2023

नमस्कार! नमस्कार! नमस्कार सूर्याला!

नमस्कार! नमस्कार! 
नमस्कार सूर्याला!ध्रु. 

तेजोनिधि हा 
लोहगोल हा 
कृतज्ञ वंदन त्याला!१ 

श्वासासंगे 
सोऽहं रंगे 
ये गति उपासनेला!२

हात जोडता 
पाय जुळवता 
दृष्टि भिडे बिंबाला!३ 

बलसंवर्धन 
मन:संयमन 
साधत सहज नराला!४ 

सत्कर्मी रति 
कुशाग्रशी मति 
धार चढे प्रज्ञेला!५ 

मेद झडू दे 
घाम गळू दे 
निश्चय दे सुयशाला!६ 

यज्ञच सुंदर 
खचित क्षेमकर 
प्रेरक श्रीरामाला!७ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०९.०३.१९७८

वाच ज्ञानेश्वरी

दुपारी दुपारी वाच ज्ञानेश्वरी 
अर्थ थोडा तरी उकलेल १

ताप प्रपंचाचा जाच तो मनाचा 
तोच कायमचा संपणार २

एक एक ओवी आदरे वाचावी
चिंतनाला घ्यावी गृहिणींनी ३

जे का माझे दुःख जे का माझे सुख
त्याचे का कौतुक करायचे? ४

मायतात गेली सरली सावली
पोरकी ज्ञानुली आई झाली ५

बाया बापड्यांची सखी आवडीची
तीच आळंदीची ज्ञानाबाई ६

सोपी केली गीता शांतविले चित्ता
सोपविली सत्ता अध्यात्माची ७

ग्रंथ ज्ञानेश्वरी सासरी माहेरी 
बाहेरी अंतरी अभ्यासावा ८

ओवी वाचू जाता भक्तीने ऐकता 
मन हे निवता धन्य वाटे ९

विष हो अमृत दुष्ट सत्प्रवृत्त 
नीच हो उन्नत श्रवणाने १०

सयांनो घ्या वसा एके जागी बसा
उमटेल ठसा माऊलीचा ११

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(माजघरातली ज्ञानेश्वरी या परमपूज्य ताई दामले यांच्या प्रवचनांवर आधारित काव्य)

Monday, October 2, 2023

क्षमा करी श्रीहरी!

क्षमा करी श्रीहरी!
लोक विलक्षण इच्छा माझी -
परि तू अवधारी!ध्रु.

अनंत रूपे तुझी दयाळा 
अनंत स्थानी तू भरलेला 
एक ठिकाणी पाहु वाटते तुजसी गिरिधारी!१

हे कथितांना भयकंपित मन 
उतावीळ परी होती लोचन 
मुद्दलरूपा दाखव मजला 
विचित्र इच्छा खरी!२

तव संकल्पे विश्व उपजते 
विकसित होते, विलय पावते 
स्वरूप कुठले जिथे रमसि तू 
दर्शन ते दे हरी!३

निर्गुणांतुनी सगुणी येसी 
खेळ संपता स्वरूपि मिळसी 
ते स्वरूप कधि दिसेल डोळा
आतुरलो अंतरी!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०४.०७.१९७४
(स्वामी माधवनाथांच्या ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या पुस्तकातील प्रवचन क्रमांक १०३ वर आधारित काव्य).

संत भवरोग बरा करतात



शारीरिक रोग बरा होण्यासाठी औषधाइतकीच मनःस्वास्थ्याची सुद्धा आवश्यकता आहे. संत हेच खरे डॉक्टर आहेत, ते भवरोगाचे जाणकार आहेत.

माझा सर्वात जवळचा व कधीही त्याग न करणारा चैतन्यघन प्रभू आहे.

सतत नामात रंगून राहिलो तर जिवाला दिलासा मिळतो, परमेश्वरावरील श्रद्धा दृढ होत जाते. देव होऊन देवाची भक्ती करायला हवी. जो जीवन प्रकाशित करतो तो देव. 

विवेकाने मनाचा तोल सावरला जातो. भक्ती ही कृती नसून ती वृत्ती आहे.

*******

मन करा रे प्रसन्न - आत येतो नारायण
संत घालतात प्रेमे नामामृताचे भोजन!ध्रु.

नाम जो जो कोणी घेतो त्याचा भवरोग जातो 
जेथे जेथे तो पाहतो तेथे विठ्ठल दिसतो 
नाम मनालागी स्नान!१

पहा आपल्या डोळ्यांनी देह चालला झिजूनी 
न ये ऐकता कानांनी गोड गाणी गोड वाणी 
ठेवा अनंताचे भान!२

संतसंग दे गा सदा ऐसे विठ्ठलासी वदा
कधी देवाला ना निंदा करा स्वहिताचा धंदा 
हरी करील कल्याण!३

संत नामांकित वैद्य भक्तिवैराग्याचे पथ्य 
रामनाम हेच सत्य येता जाता घ्यावे नित्य 
पहा औषध घेऊन! ४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(माजघरातली ज्ञानेश्वरी या परमपूज्य ताई दामले यांच्या प्रवचनांवर आधारित काव्य).

गीताबावनी



गोपाला हे गोपाला शिकवी गीता आम्हाला १
अहंकार हा जाऊ दे अर्जुन बनता येऊ दे २
काय करावे समजेना ऐसी दीनाची दैना ३
आत्मबला तू पुरवावे कृष्णसख्या यावे यावे ४
मी माझे चे हे ओझे का आम्ही जगि मिरवावे? ५
कर्तृत्वाच्या कैफाने का आम्ही पागल व्हावे? ६
थोडेही यश मिळे जरी तोल मनाचा गेलेला ७
थोडे अपयश येत जरी तोल मनाचा गेलेला ८
सूर आमचा दाखव रे गीता गाउन घेई रे ९
तालाचेही ज्ञान हवे अधिक काय ते मागावे? १०
आप्तांशी होता झगडा मनावर बसे भयपगडा ११
ठाम भूमिका समजावी कठोर करुणा उमजावी १२
समाजात तू दर्शन दे एकांती तू चिंतन दे १३
ध्यानाचा तू दे छंद मन हे गावो गोविंद १४
जगद्गुरु हे यदुवीरा देवकिनंदन गोपाला १५
गीता येवो नित पठणी स्मरणी तैसी आचरणी १६
मण्यामागुनी फिरे मणी स्वच्छ दिसे या नयनांनी १७
प्रसन्न होशी गोविंदा सुटला बघ सगळा गुंता १८
भारतीय ते आवडावे उगमापाशी तू न्यावे १९
मना माधवा मुरडावे मुळास नेउन भिडवावे २०
गुलाम नच मी देहाचा योजक मी या देहाचा २१
विचार रुचु दे आत्म्याचा आत्म्याचा, परमात्म्याचा २२
तुझे सुदर्शन श्रीकृष्णा देत चेतना तनामना २३
अपुली कर्मे करताना स्फुरण चढावे हरिभजना २४
दे मार्मिकता, रसवत्ता सांघिकता दे धीमंता २५
समन्वयाची शिकव कला ऐक विनवणी गोविंदा २६
दुजेपणा जधि गेलेला दुःख संपले घननीळा २७
कोणी कोणा का भ्यावे आत्मरूप ते विसरावे २८
त्रिगुणांचा चाले खेळ अज्ञाने नाही कळला २९
सत्त्व सापडे हाताला तेढा सगळा सुटण्याला ३०
गीतामृत घुटका घुटका सेवन करता आनंद ३१
क्रिया पालटे तात्काळ रमारमण हे गोविंद ३२
स्वभाव बदले तव गीता थोडी थोडी ती कळता ३३
परस्परांशी समरसता अद्वयसुख लाभे हाता ३४
गीतामुरलीचे सूर आनंदा आणत पूर ३५
विरले विकारकाहूर दवडिसि दुःखाना दूर ३६
जर स्वामी बनता आले विकल्प सगळे सरलेले ३७
स्वरूप ठायी दिसलेले देहभान नच उरलेले ३८
विश्वरूप ते कल्पावे सूक्ष्मरूप ध्यानी यावे ३९
भक्तीने मन भारावे कृष्ण स्मरणे डोलावे ४०
मानवतेची ही गीता समाजसेवेची गीता ४१
नीतिन्यायाची गीता कळो आम्हा गाता गाता ४२
आत्म्याचे अविनाशित्व देहाचे बदलत जाणे ४३
ज्ञानाचे पावन करणे योगाचे मन सावरणे ४४
वासुदेव तो असे कुठे? वासुदेव तो नसे कुठे? ४५
जे कोणी अपणा भेटे योगबले हरिमय वाटे ४६
देता वाढे संपत्ती हसता वाढे आपुलकी ४७
अभ्यासे देही मुक्ती बंधुभाव मोठी शक्ती ४८
जे कळले ते सांगावे सकलांना संगे न्यावे ४९
नेटे पुढती चालावे कमलपत्रसम वागावे ५०
गीताचिंतन जो करतो तो नर नारायण बनतो ५१
गीताबावनी इथे पुरी रामा नाही हरी दुरी ५२

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२३/२४.०२.१९८३

Sunday, October 1, 2023

गीतादीपक करी धरी । भक्तिपथावर कार्य करी।

गीतापोथी धर हाती । भाव हवा कृष्णावरती । 
हिंडत जा पृथ्वीवरती। ही भक्ती।।१।।

कर्म करावे आलेले। नाम हवे ओठी आले ।
कृष्ण चालवी मी चाले। सुबोध हा।।२।।

गीता मातांची माता। ती कळते गाता गाता। 
भेद नुरे नावापुरता। ऐक्यच हे।।३।।

जीव शिवाचा एकपणा। कसा कळावा शब्दांना। 
जोडत जा तू मने मना। ही माळ।।४।।

जे येते ते सांग जना । मनात ठेवुन नम्रपणा ।
नयनी गंगेची करुणा। ही गीता ।।५।।

चुकता चुकता शिकायचे । पडता हासत उठायचे ।
पुढती पुढती जायाचे। गा गीता ।।६।।

तूच तुझा उद्धार करी । आत्मारामा गुरु करी ।
त्यजुन फलाशा कर्म करी। जीवन हे।।७।।

विचार गीतेचा घ्यावा । आचरणी तो आणावा ।
श्रीव्यासांचा मागोवा। नित घ्यावा।।८।।

गीतादीपक करी धरी । भक्तिपथावर कार्य करी।
प्रकाश अंतरि बाहेरी । कृष्णकृपा।।९।।

रचयिता :  श्रीराम बाळकृष्ण आठवले
२०.१०.१९८४

सत्संग लाभणं हे भाग्याचे लक्षण


जशी संगत, तसे विचार, जसे विचार, तशी वागणूक.  सत्संग लाभणे हे भाग्याचे लक्षण होय. दुर्दैवाने जीव वाईट संगतीत सापडला तर त्याचे सर्व गुण मातीमोल होतात. प्रथम इंद्रिये बहकू दिली की मग आवर घालणे कठीण होते! 
विवेकाचा दीप तेवत असेल, तर अज्ञानाच्या अंध:कारात धडपडण्याची वेळ येणार नाही. सत्संगाने सत्त्वगुण पुष्ट होतो. 

***********

सत्संग लाभला ज्याला, तो भाग्यवंत जाणावा!ध्रु.

जशी संगती विचार तैसे 
विचार जैसे वर्तन तैसे  
प्रवास आयुष्याचा सारा मंगल सुखकर व्हावा!१ 

एक एक गुणसुमना घ्यावे 
ते भावे हरिपदी वहावे 
भक्तिपंथ जो समर्थ कथिती तोच तोच निवडावा!२ 

कृतार्थ जीवन विकार शमता 
विकार शमता मनी शांतता 
सत्संगाने आचरणी ये सुखद सुखद ओलावा!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(माजघरातली ज्ञानेश्वरी या परमपूज्य ताई दामले यांच्या प्रवचनांवर आधारित काव्य)

Saturday, September 30, 2023

जिभेवर ताबा हवा



जिभेची खोड मोडल्याशिवाय जीभ ताब्यात येणारच नाही. जिभेचे लाड केले तर ती डोक्यावर बसलीच म्हणून समजावं!

बोलण्याच्या आधीच विचार व्हायला पाहिजे.  बोलून मग विचारात पडण्यात काय अर्थ आहे? वाणीचा संयम न ठेवल्याने आपले शत्रू जे षड्विकार त्याचेच आपण पोषण करतो. 

अहंकारापायी माणूस स्वतःच्या व कुटुंबाच्या स्वास्थ्याची राखरांगोळी करतो.

मी कोण हे कळण्यासाठी गुरूंच्याकडेच धाव घ्यायला पाहिजे. ज्ञान प्राप्त झाले पाहिजे.

**********

सुजनहो, हे ध्यानी घ्यावे
हवा जिभेवर ताबा अपुला
जो रसनांकित तो तो बुडला
रहस्य उमजावे!ध्रु.

काय खात मी, काय वदत मी
विचार आधी करू नेहमी
विवेक अपुला जीवनसाथी त्याचे ऐकावे!१

नव्हे देह मी हे बाणावे
सद्गुरुचरणी लीन असावे
चराचरा जो व्यापुनि उरतो तो मी समजावे!२

अरे जिभेचे नका बघू सुख
चला गड्यांनो व्हा अंतर्मुख
षड्विकार का आपण अपुल्या कृतिने पोसावे?३

कवी : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
(माजघरातली ज्ञानेश्वरी या परमपूज्य ताई दामले यांच्या प्रवचनांवर आधारित काव्य)

जर भक्त जाहला मूल, भगवंतही होतो माता!

जर भक्त जाहला मूल, भगवंतही होतो माता!ध्रु.

मीपणा सकल सोडावा
अनुभवहि आगळा घ्यावा
ओळख मग देवाजीची संजीवन देते चित्ता!१

मन भगवंताच्या ठायी
तन भगवंताच्या पायी
अर्पिली जरी ही सुमने संतोष होय भगवंता!२

निश्चिंत स्मरणि असावे
धैर्याने वागत जावे
देहाचे भान हरपता ये आत्मज्ञानच हाता!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(गोंदवलकर महाराज प्रवचन क्र १८९, ७ जुलै वर आधारित काव्य)

Monday, September 25, 2023

कळसूत्री बाहुली एक मी - सूत्रधार श्रीहरी

सूत्रचालक परमेश्वर आहे

वाहवले जावो, राहिले सांभाळा ।
आठवा गोपाळा आता तरी  । (संत नामदेव) 

एकदा मी म्हणजे देह नाही, हे अभ्यासाने पटवून घ्यायला पाहिजे, म्हणजे जीवनातली दुःखे मनाला यातना देणार नाहीत. 
परमेश्वरच सर्वत्र भरून राहिला आहे.
कर्माचा लेप जिवाला लागू नये अशी इच्छा असेल तर कर्म केले नाही असे प्रामाणिकपणे मान व केलेले प्रत्येक कर्म ईश्वरालाच अर्पण कर म्हणजे हा जीव कर्मापासून मुक्त होतो.
सूत्रचालक परमेश्वर आहे, मी त्याच्या हातातले बाहुले आहे, मला वेगळी अशी काही सत्ता नाही. 
*********

कळसूत्री बाहुली एक मी - सूत्रधार श्रीहरी!ध्रु. 

देहभाव वाढला, वाढला 
दुःखाला तो कारण झाला 
अता बोध घे तरी!१

संतांनी मज जागे केले
भक्तिपथावर संगे नेले 
कानी हरिबासरी!२ 

आवड लागो मज नामाची
तुटो शृंखला अज्ञानाची 
सार्थ जन्म हा तरी!३ 

कवी : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(परमपूज्य ताई दामले यांच्या माजघरातली ज्ञानेश्वरी या प्रवचनांवर आधारित काव्य).

Sunday, September 24, 2023

माझे काही नाही येथे

ईश्वरनिष्ठा नसेल तर जीवनवेल सुकेल!

मन स्वस्थ असेल तरच शांत झोप लागेल. गाढ झोप येण्यासाठी कर्मे चोख व्हायला हवीत. 
श्रद्धेवाचून आपले जीवन उदास आणि दैन्यवाणं. 
परमेश्वर फार कृपाळू आहे तसाच तो न्यायनिष्ठुर पण आहे. एकदा देवाबद्दल प्रेम वाटू लागले की तो सर्व विश्वात भरून राहिला आहे, असा भाव होतो. जो जगन्नियंता आहे; तो आपले चांगले केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास पाहिजे.

******

माझे काही नाही येथे, 
माझे काही नाही!ध्रु. 

श्रीहरि सारे करवुनि घेतो 
दूर राहतो कौतुक बघतो 
ईश्वरनिष्ठा हे संजीवन शक्ती पुरवत राही!१ 

शरीर आहे ठेव तयाची 
ज्याची त्याला परत द्यायची 
नाम दाखवी राम आतला शीणभाग तो जाई!२

मी रामाचा रामहि माझा 
पहिला पाढा घोकायाचा 
गणित बरोबर तरीच सुटते ताळा करुनी पाही!३ 

कवी : श्रीराम बाळकृष्ण आठवले (माजघरातली ज्ञानेश्वरी या परमपूज्य ताई दामले यांच्या प्रवचनांवर आधारित काव्य)

Saturday, September 23, 2023

चल मना, पहा सर्वत्र हरि!



सर्वत्र हरिरूप पाहावं!

परमार्थात ' मी ' ला विसरायला शिकायचे असते!
तेजोमय भगवंताशिवाय जगात काहीच नाही. जग रूपाने तोच नटला आहे. 
बोलणारा परमेश्वर, ऐकणारा परमेश्वर ही खुणगाठ मनाशी बांधावी!
जे जे निर्मळ, सोज्ज्वळ त्यात देव दिसवून घ्यायचा, हा अभ्यास सतत व्हायला पाहिजे. जीवनात उन्हाळे पावसाळे असतातच. हरिरूप डोळे भरून पाहिलं पाहिजे. कान भरून ऐकले पाहिजे, तोंड भरून गायिले पाहिजे. तरच ते अंतरात ठसेल.


*********

चल मना, पहा सर्वत्र हरि!ध्रु.

विसर तनाला, विसर स्वतःला 
तेजोमय भगवंतच भरला
घे अनुभव आपण निमिष तरी!१

जगरूपाने ईश्वर नटला
अंतरातही तोच विनटला 
तू वळुनि अंतरी पहा तरी!२

सुख येऊ दे, दुःख येउ दे
तेच श्रीहरि - श्रद्धा असु दे
तू निशिदिनि ऐसा भाव धरी!३

कवी : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(माजघरातील ज्ञानेश्वरी या प. पू. ताई दामले यांच्या प्रवचनावर आधारित काव्य)

संतांचे संगती मनोमार्ग गती



साधकाचे हित पाळावे नियम 
मनाचा संयम कळो यावा १

देहाने, मनाने रहावे पवित्र 
पहावा सर्वत्र गुरुराव २

शुभ आठवावे अशुभ वर्जावे 
दुःख विसरावे नाम घेता ३

नाम घेता कळे आतच श्रीराम 
मंगल ते धाम हृदय हे ४

भजन सहज कर्म ही सहज 
अध्यात्म सहज साधुबोध ५

चाललासे खेळ जगात द्वंद्वांचा 
बाऊ संकटांचा मानू नये ६

सुखात, दुःखात हर्षात, शोकात
छायेत, उन्हात जैसा, तैसा ७

संकल्प, विकल्प कैसे छळतील?
पापे पळतील श्रद्धा ठाम ८

माझे समाधान नक्की मजपाशी
सद्गुरु मजशी शिकवीती ९

 
नित्य सुसंगती बोलात, कृतीत 
झाला द्वंद्वातीत गुरुपुत्र १०

तोच मी हा बोध तोच मी हा भाव
यात अंतर्भाव संतत्वाचा ११

आतला जो बोध कधी न सुटतो
दक्षता जो घेतो तोच शिष्य १२

मोकळ्या मनाने संतांपाशी जावे
बोधामृत प्यावे आवडीने १३

मन ते विशाल बोलणे रसाळ 
पाहणे प्रेमळ साधकाचे १४

स्वानंदी असावे स्वार्थांध नसावे 
स्वरूपी राहावे साधकाने १५

सत्य ते सद्गुरु शिव ते सद्गुरु 
सुंदर सद्गुरु भाव असो १६

लोकांचा कंटाळा कधी न मानावा
देव तो पहावा लोकांतही १७

वर्तनावरून पारख ज्ञानाची 
महती गुरूची शिष्यामुळे १८

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२८.१०.१९९४

 भावे अवलोकिता ज्ञानेश्‍वरी।  स्‍वरुपानंद येत घरी।  

ओवी ओवी आपण विवरी।  ज्ञानदेव ॥ १ ॥ 


माधव सुपुत्र माऊलीचा।  त्‍याची प्रेमपूर्वा वाचा।  

लोटे पूर अमृताचा।  मंगलधामा ॥ २ ॥ 


अलंकापुरी पावस येथे।  पुण्‍यनगरी साक्ष देते।  

कृपा केलिया माधवनाथे। पटे खूण ॥ ३ ॥ 


होता स्‍पर्श परिसाचा।  भाविका केवळ माधवाचा।  

अध्‍यात्‍माचा सुराज्‍याचा।  होय अधिकारी ॥ ४ ॥ 


सुषमा, माधव, मकरंद।  सर्वा हृदयी परमानंद।  

हंस मानसी स्‍वच्‍छंद।  लागे विहरु ॥ ५ ॥ 


तन्‍मय व्‍हावे वाचताना।  तन्‍मय व्‍हावे बोलताना।  

तन्‍मय व्‍हावे पाहताना।  आवर्जून ॥ ६ ॥ 


रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले 

१३.१०.१९९७ 

हे जगदंबे माय भवानी पाव मला लवलाही पसरते पदर मी आई

 
पसरते पदर मी आई 

हे जगदंबे माय भवानी पाव मला लवलाही
पसरते पदर मी आई!ध्रु.

लाडकी लेक विनवीते 
तुजपाशि हट्ट हा धरिते 
चुडेदान दे, स्वराज्य ही दे, दे दे ग पुण्याई!१

शिवबा हा बघ बावरला 
तव चरणी शरणहि आला 
पिता आणि गे स्वराज्य त्याते तीर्थरूप की होई!२

रिपुपुढे न घाशिन नाक
वाटे न तयाचा धाक 
शरण शरण परि तुजला माते धावत ये ग आई!३

का स्वराज्य दृष्टावले 
ग्रासण्या दैत्य हे टपले 
झुंज द्यावया कडो निकडीची शक्ति शिवाला देई!४

तव चरणी श्रद्धा माझी 
लावीन जिवाची बाजी 
हा करारीपणा टिकण्यासाठी देई मजसि धिटाई!५ 

सुखदु:खी तुजला स्मरते 
हा पदर नित्य पसरते 
कधि विसरणार ना तुजला आई हसता रडतानाही!६ 

धैर्याची देउनि ढाल 
लेकरू तुझे सांभाळ 
स्वराज्य व्हावे तुझीच इच्छा कौल तुझा दे आई!७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले



(छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित काव्यामधील एक कविता  )

माझा शिवबा शिवबा


माझ्या प्राणांचा विसावा, माझा शिवबा शिवबा
मनगगनी चांदोबा, माझा शिवबा शिवबा!ध्रु.

बाळ रांगे तुरुतुरु, जीभ बोले चुरुचुरु
बाळ ओलांडे उंबरा, किती कौतुक मी करू?
सावलीते धरू पाहे, माझा शिवबा शिवबा!१

लालसर तळहात, मोत्यांसम शुभ्र दात
टाळ्या वाजविता बाळ, डोलडोलतो नादात
भारी खोडकर गोड माझा शिवबा शिवबा!३

जरि केले उष्टावण, खाई माती चुकवून
उधळितो माती माथी पृथ्वि करिते प्रोक्षण
रागवता हासवीतो माझा खट्याळ शिवबा!३

पाय फुटता बाळाते नच अंगण पुरते
दुडदुडा धावे शिवा मन बागडते गाते
आज चंद्रकोर छोटी उद्या व्हायची चांदोबा!४

खेळे मातीच्या घोड्यांशी खेळे मातीच्या हत्तींशी
खेळे झुंज खोटीखोटी माझ्या मनाची मिराशी
आज खेळातला राजा पुढे सम्राट शिवबा!५

मृत्तिकेचा छोटा किल्ला, मृत्तिकेचे सिंहासन
खेळातले राज्य याला वाटे मानाचे भूषण
उंच निशाण धरता खाली शोभतो शिवबा!६

नाकेबंदी मोर्चेबंदी शब्द जाहलेत पाठ
बडी जोखीम म्हणून राजे होत चिंताक्रांत
व्यूह रचण्या पाहतो माझा शिवबा शिवबा!७

एक बरी अडचण हत्ती घोड्या गती नाही
बाळ हालविती त्यांना नुरे प्रश्न थोडासाही
उभा सैन्याच्या पुढती माझा शिवबा शिवबा!८

फुलपाखरे आजची उद्या गरूड होतील
गड किल्ले जिंकतील नील नभ जिंकतील
देतो दिलासा दिलाला माझा शिवबा शिवबा!९

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित काव्यामधील एक कविता महाराजांच्या बाललीलांवर)

Sunday, September 17, 2023

जय जय स्वामी स्वरूपानंद जय जय स्वामी माधवनाथ!

जय जय स्वामी स्वरूपानंद 
जय जय स्वामी माधवनाथ!ध्रु. 

घरीच ज्ञानेश्वरी सांगता पावसेत ऐकतो 
अवघड सोपे करुनि सांगणे प्रसादगुण मानतो 
देहातुन चल देवापाशी मना मज करी साथ!१

अनुग्रहच हा स्वामीजींचा निष्ठा तारतसे 
अभ्यासाला प्रेमे बसणे सद्गुरु पाहतसे 
प्रपंच परमार्थांचे नाते विवरुन वर्णित नाथ!२ 

कृपाच असते नित शिष्यावर दृष्टि हवी तेथे 
सुख:दुखी सम होता येणे योग म्हणत ज्ञाते 
स्वये तरावे जनहि तरावे हेतु स्वामी धरतात!३ 

सद्ग्रंथांच्या पठणे श्रवणे पालट जो घडतो 
तो आप्तांना सुहृदांनाही सहजच जाणवतो 
त्रिगुणातीतहि होता येते कर द्वंद्वावर मात!४ 

थेंब सागरी कधी बुडाला हे नाही कळले 
असंख्य जन हे गुरुकृपेने तरले भव तरले 
श्रीरामा मनि भावच केवळ हळवेपण हृदयात!५ 

कवी : श्रीराम बाळकृष्ण आठवले