Saturday, July 4, 2026

मी कसे पहावे तुजला.. ?

विश्वदेवाचे विराट स्वरूप. 
ईश्वराचे रूप विशाल, अद्‌भुत व उग्रही आहे. या ईश्वरी स्वरूपाला आदि, मध्य व अंत काहीच नाही. हे स्वरूप कधी सौम्य, सुंदर, भव्य दिसते तर कधी अद्‌भुत व उग्रही दिसते. सामान्य मनुष्य ते पाहून स्तंभित होतो.  तुफान, वादळ, भूकंप, ज्वालामुखी, जलप्रलय असे अनर्थ आले की ईश्वरी शक्तीची रूपे अनुभवास येतात. 
----००----

मी कसे पहावे तुजला.. ?ध्रु.

विराट असशी, व्यापक असशी 
अनादि असशी, अनंत असशी
जिथे पहावे तिथे तूच तू 
ठाव न ठावा मजला!१

खेळवशी तू, जाणवशी तू 
दडुनी लपुनी खुणावशी तू 
मी मर्यादित, अमर्याद तू 
कुणी न वानू धजला!२ 

उग्ररूप तू, सौम्यरूप तू
अतिकठोर तू, दयाशील तू
कवळावे वाटते माधवा 
लपंडाव मज नडला!३ 

रोगच वरवर योग खरोखर
संहारातुन निर्मिति सुंदर 
धराधरा घननीळा!४ 

उपासनेला नियमित बसवी
वदनातुन या हरि हरि वदवी
घे सामावुन मजला!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

१३ डिसेंबर २००४
सोमवार, पहाटे ४.४५

No comments:

Post a Comment