ध्यानी घ्यावी गानी गावी रामकृष्ण जोडी
जीवनात ती गाता गाता वाढविते गोडी!ध्रु.
राम जन्मला ऐन दुपारी दाह कमी झाला
कृष्ण जन्मला घन अंधारी विश्वासच आला
दोघे श्यामल, दोघे प्रेमळ भाषा ही थोडी!१
प्रासादातच राम वाढला राजाचा पुत्र
गोकुळात तो अवखळ खेळे गोपांचा मित्र
बंधु प्रेमामधली परि हो सारखीच गोडी!२
विश्वामित्राविषयी प्रेमा रामाच्या चित्ती
सांदीपनि गुरु यांची करती रामकृष्ण भक्ती
सद्गुरुवाचुन सोय न काही तो जीवन सांधी!३
श्रीरामाला जसा मारुती दैत्या माराया
श्रीकृष्णाला अर्जुन तैसा धर्म स्थापाया
उद्धाराया अशी हवी नर नारायण जोडी!४
सेतु बांधला कपिवीरांनी सागर वश झाला
श्रीकृष्णाची बुद्धि नि युक्ती कारण विजयाला
काम दुपारी, चिंतन रात्री वल्हवा मनहोडी!५
रामनाम घ्या जीवनात ये निश्चित श्रीराम
कृष्णनाम घ्या करील सोपी गीता श्रीश्याम
आचरणी येऊ दे देवा रामकृष्ण जोडी!६
सद्गुण चिंतन करण्यासाठी जन्मोत्सव असतो
व्रत घेण्याला, नियम पालना जन्मोत्सव असतो
जाण जागवा सतत जीवनी याविषयी थोडी!७
राम अंतरी कृष्ण मस्तकी कंठी जयगान
आपआपली कर्मे घडता चढणे सोपान
या देही या जन्मी मुक्ती संदेहच सोडी!८
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१८.०८.१९८९
No comments:
Post a Comment