Friday, April 8, 2022

कोऽहं’ चे उत्तर सोऽहं..

योगी माणूस कसा असतो? देहधारी परंतु देहातीत! मी देह नव्‍हे हे त्‍याच्‍या मनात पुरते बिंबलेले असते. कोऽहं या प्रश्‍नाला त्‍याला उत्तर मिळालेले असते सोऽहं!  त्‍यामुळे योगी मनुष्‍य नित्‍य आनंदात असतो.  आत्‍मतृप्‍त असतो.  आदि – अनादि – अकर्ता निर्गुण जो परमेश्‍वर तोच मीही आहे या विचाराचा चित्तात उदय झाला. मग द्वैत राहतेच कुठे? ब्रह्माकार वृत्‍तीत सदैव रंगलेल्‍या ज्ञानी माणसाचे वर्णन भगवान श्रीकृष्‍ण करीत आहेत – 

प्रश्‍न मुळातिल ‘कोऽहं’
उत्तर त्‍याचे सोऽहं, सोऽहं!ध्रु. 

शांती येते शोधत शोधत 
तिला आवडे ज्ञानी सोबत 
पतिव्रतेसम नांदू लागे तीहि अनुभवे सोऽहं, सोऽहं!१  

नाशवंत तनु नव्‍हेच आपण 
ब्रह्मी विरले कधीच मीपण 
निरासक्त मन आनंदाने गीत गुणगुणे सोऽहं, सोऽहं!२  

चराचराचा जो निर्माता 
न ये पाहता न ये ऐकता 
अनासक्तता सर्वात्‍म्‍याची नकळत शिकवी सोऽहं, सोऽहं !३  

सहजस्थिति ही अभंग राही 
पापपुण्‍य तर शिवतच नाही 
निर्गुणतेला न ये मलिनता मूलाधारच सोऽहं, सोऽहं!४  

ज्ञानरूप रवि उदया येता 
तम मावळते बघता बघता 
किरणशलाका रविची ठसवी सहजपणाने सोऽहं, सोऽहं!५ 

वर्णन करण्‍या शब्‍द थिटे 
द्वैतालागी स्‍थान कुठे ? 
बुद्धि स्थिर होताच साधका अनुभव येई सोऽहं, सोऽहं!६  

भेद संपतो, अभेद उरतो 
सर्व काहि तो, अनुभव येतो 
समदृष्‍टी दे अलिप्‍तता शिकवीत सुस्‍वरे सोऽहं, सोऽहं!७  

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले
१९७३

No comments:

Post a Comment