Thursday, April 14, 2022

रामायण गावे..

मुलामुलींनी मनापासुनी रामायण गावे
सूरताललय या सवयीने सगळे समजावे!ध्रु.

साधे सोपे जगणे असते का धरणे हट्ट?
मोहाला ना बळी पडावे मन करणे घट्ट
समजूतीने, दुसऱ्याचे सुख अपुले मानावे!१

हसतमुख असे, आज्ञापालन स्वभाव झालेला
रघुपति राघव नागरिकांचा आवडता बनला
निर्धनता वा असो सधनता जनास सुखवावे!२

'जगी चांगले त्याचे रक्षण' शक्ती यासाठी
सदाचरण हा खरा धर्म हो शिक्षण यासाठी
बलोपासना, गुणोपासना दोन्ही साधावे!३

जे नच माझे त्याचा का मी धरणे हव्यास
दयाराम जो रघुपति राघव त्याचा मज ध्यास
नाम नित मुखी तो खरा सुखी आतुन उमजावे!४

परस्परांशी जुळवुन घेई असे जोडपे कसे
भाऊभाऊ परस्परांना ओळखतात कसे
मारुति होउन राममंदिरी रमावया जावे!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२५.०४.२००४

No comments:

Post a Comment