Sunday, April 3, 2022

ओव्या आळवून गाव्या..


(चाल - अरे संसार संसार)

वाटे दाखवावी ओवी स्वामी समर्था गाऊन
भाव मनीचा जो माझ्या तेच घेतिल जाणून!१

पदोपदी अडथळे तया कैसे ओलांडावे
रडू नये, अडू नये, उड्या मारित चालावे!२

झाले गेले काय त्याचे द्यावा बोजा तो टाकून
आज आता काय कार्य त्वरे घ्यावे उरकून!३

रडूनिया काय होते रक्ताचेही पाणी होते
नाम घेताना ऐकावे शक्तिकेंद्र मन होते!४

तोच खरा रणशूर झेले घाव ढालीवर
संधि साधुन नेमकी करी शत्रुवर वार!५

स्वामी समर्थ रावाचे स्वामी समर्थ रंकांचे
स्वामी जैसे पंडितांचे स्वामी तैसे अडाण्यांचे!६

घरोघर वाटे जावे गावी समर्थांची गाणी
गुजगोष्ट ही संतांची परमार्थाची निशाणी!७

स्वामी समर्थ समर्थ तेच पुरवती हट्ट
कुशलता त्यांची ऐसी लेचापेचा होतो घट्ट!८

स्वामीप्रसाद या ओव्या गाव्या गाववून घ्याव्या
आवडते ऐसी भक्ती ओव्या आळवून गाव्या!९

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

No comments:

Post a Comment