चला गाऊ या सारे आपण आरति साईबाबांची
ज्योत ज्योतिने लावत करु या दिपवाळी हो भक्तीची! ध्रु.
ज्योत ज्योतिने लावत करु या दिपवाळी हो भक्तीची! ध्रु.
एक वेळ शिरडीला जावे, साईसच्चरिता वाचावे
नयन मिटुनि साईस पहावे, रामरंगि रंगुनिया जावे
भाव जसा मनि देव तसा हो प्रचीति येते नित्याची! १
श्रद्धा सबुरी दोनच नाणी, रसाळ वाणी प्रेमळ करणी
गावी ओवी अभंगवाणी, अभ्यासाने स्थैर्य आसनी
दत्त दिगंबर श्रीशिवशंकर सगळी रूपे साईची! २
गहू भरडले, पीठ पेरले, महामारिने काळे केले
पाणी प्याले, दिवे लागले, सगळे गावच क्षेत्र जाहले
धुनी सांगते तनुसमिधा ही यज्ञाग्नीला देण्याची! ३
जन्मा आलो मूळ स्मरावे, वासनेत का कधि गुंतावे
साई सेवा सद्गुरुभावे, जन्ममरणचक्रा भेदावे
राम कृष्ण हरि बोला साई करु या उधळण प्रेमाची! ४
मन मुरडावे आत पहावे पवना नामहि सहज जुळावे
सोऽहं भावे जगी फिरावे, सदनच अपुले शिरडी व्हावे
आत्मसुखाची भूक भागु दे, विनंती चरणी रामाची! ५
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
No comments:
Post a Comment