सर्वभावे मजसी भजले, ते माया तरले तरले!ध्रु.
त्रिगुणात्मक माझी माया
अवघड ती जनां तराया
अज्ञाने, अहंपणाने जग मायेतच गुरफटले!१
करू जाता काहि उपाय
तो होतच जाइ अपाय
तरणेच राहिले दूर हे नवलचि येथे घडले!२
सत् केवळ मी भगवंत
जाणती न कोणी भ्रांत
"तोच मी" कळुनि ना सगळे भोवऱ्यात फिरले फिरले!३
सद्गुरूच करतिल सोय
उरणार न मायातोय
सोऽहंच्या भजने भक्त मजमाजी मिसळुनि गेले!४
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२३.०२.१९७४
(येथ एकचि लीला तरले
जे सर्वभावे मज भजले
तया ऐलिच थडी सरले
मायाजळ
जया सद्गुरू तारू फुडे
जे अनुभवाचे कासे गाढे
जया आत्म निवेदन तरांडे
आकळले
या ज्ञानेश्वरीतील ओव्यांवर आणि ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या स्वामी माधवनाथांच्या पुस्तकातील प्रवचन क्रमांक ६२ वर आधारित काव्य).
No comments:
Post a Comment