Sunday, May 21, 2017

घण घण घण घण घंटा सांगे, चला गं मिळवा विद्येला !

१९६८ साली महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित कवितांमधील श्रीराम बाळकृष्ण आठवले यांनी लिहिलेली ही कविता :

पाटी पेन्सिल घेउन हाती 
पोरी चालल्या शाळेला!
घण घण घण घण घंटा सांगे
चला गं मिळवा विद्येला! ध्रु. 

शिक्षण ही तर सुवर्णसंधी 
हरेल दास्याची व्याधी
कुटुंबियांना सुखी कराया
ऐका या तर हाकेला !१

घराघरातील जर बाई शिकली
शहाणी होतील मंडळी सगळी
चला वंदुया घरी येणाऱ्या 
ज्ञानाच्या या गंगेला!२

जमलेल्या मुली हसती खेळती
मनापासुनी सगळ्या शिकती
मुक्त जाहली मने मुलींची 
अनुभवती आनंदाला!३

भरते आले आनंदाला
बघुन मुलींच्या उत्साहाला 
आनंदाश्रू नयनी येता 
कोण आठवे कष्टाला?४

स्त्री शिकली तर बने देवता
करील मग डोळस ममता
स्त्रीशिक्षण तर संस्कृती रक्षण 
हवे मर्म हे कळण्याला!५

--००00००--

1 comment:

  1. खूप छान अर्थपूर्ण कविता आहे ...

    ReplyDelete