श्रीरामा कर करुणा दासाला धाव पाव लवलाही
नाम सदाचे कंठी राहो ऐसे सुखे करी आई !१
श्रीरामा दे श्रद्धा कर्तव्याचे असो सदा भान
सहकार मंत्र मोठा, बाणो अंगी असेच दे ज्ञान!२
श्रीरामा तुज शरण आलो द्यावी पदी मला जागा
आशीर्वच दे इतका एकत्वाचा तुटेल ना धागा!३
श्रीरामा दे अभया संशय सगळा विरोनिया जावा
मी नच शत्रु कुणाचा ओलावा तू मनात आणावा!४
श्रीरामा तू वचने करुणेची या मुखातुनी वदवी
ज्यातुन मिळे दिलासा ऐसे काही कराकडुन लिहवी!५
श्रीरामा कर किमया ओघे येई करात जे काम
एक अपूर्व सुसंधी दर्शन देवो तिच्यातुनी राम!६
श्रीरामा तुज स्मरता घालव सारी विवंचना माझी
तू नित माझ्यापाशी सांभाळाया प्रभो रहा राजी!७
श्रीरामा दे प्रेमा बसवी नेमे मनास ध्यानाला
विनवी हेच दयाळा जागव जागव असाच जिव्हाळा!८
श्रीरामा दे दृष्टी बघण्या सृष्टी तुझ्यात रमलेली
येवो निशिदिनि कानी माझ्या सुरेल हरिमुरली!९
श्रीरामा तव मुद्रा सुभगा हसरी तशीच दे मजला
समता शांति मनाची न ढळे, न ढळे असे करी मजला!१०
श्रीरामा तव चरिता आळविता हो मनास आल्हाद
रमवी रामकथा जी अनुपम आहे तिचाच आस्वाद!११
श्रीरामा धर हाता चालव चालव सवेच तू मजला
असशी पुढती मागे अंतरि ऐसे कळो वळो मजला!१२
श्रीरामा चैतन्या आत्मारामा इथे तिथे पाहू
घेता नाम तुझे, सुख मुक्तीचे पदोपदी लाहू!१३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले