राम कर्ता, राम दाता, ही असावी भावना!ध्रु.
"कोण मी" हे जाणणे!
भाव रामी ठेवणे
विश्वव्यापक होत आपण सोडतांक्षणि मीपणा!१
विस्मृती ती दुःख देते
पामराचा अंत बघते
राम अंती सोडवीता म्हणुनि करणे प्रार्थना!२
राम करतो ते हिताचे
नाम त्याचे घेई वाचे
तन प्रपंची, चित्त रामी ठाम राहो धारणा!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१०.०१.१९७४
नाम - प्रपंच सुखी करण्याचे साधन
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १० (१० जानेवारी) वर आधारित काव्य.
व्यवहार उत्तम प्रकारचा केला
पण परमात्मा विसरला
तो व्यवहार दुःखच देता झाला
मी कोण हे जाणून ठेवावे वर्तन
हेच परमार्थाचे मुख्य साधन
बाह्यांगाने करावी प्रपंचाची संगती
चित्ती असावा एक रघुपती
काया गुंतवावी प्रपंचात
मन असावे रघुनाथात
No comments:
Post a Comment