द्रव्य जसे संसारी, "भाव" हवा परमार्थी!ध्रु.
भावे कळे देव
भावे मिळे देव
सहज खात नैवेद्य पाषाणाची मूर्ती!१
देहे आचरावे कर्म
मुखे उच्चारिता नाम
स्तंभातही झाली भक्ता ईश्वराची प्राप्ती!२
बीज जळे वासनेचे
विस्मरण मीपणाचे
नारायणा नेमे करी भक्तिभावि वस्ती!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १७३ (२१ जून) वर आधारित काव्य.
प्रपंचात जसा पैसा लागतो त्याप्रमाणे परमार्थात भाव लागतो. जसा तुमचा भाव असेल त्याप्रमाणे तुम्हास देवाची प्राप्ती होईल. आपल्यासारख्या आस्तिकांना देव "हवा" असे वाटते पण "हवाच" असे वाटत नाही. आपल्या प्रपंचाच्या मदतीसाठी देव हवा असे वाटते. प्रपंचाची आवड असू नये, पण प्रपंचातील कर्तव्यांची आवड असावी. देहाने ते कर्तव्य करावे व मनाने मात्र अनुसंधान ठेवावे. दगडातील माती अनेक यंत्रांनी व चाळणीने चाळून काढून टाकतात व नंतर सोने हाती लागते, त्याचप्रमाणे अनेक वासना नष्ट झाल्यानंतर परमात्मा आपल्या हाती लागतो. ज्यांना व्याप आहे ते लोक रडतात व ज्यांना व्याप नाही तेहि लोक रडतात. मग सुख कशात आहे? सुख हे समजुतीमध्ये आहे, आणि भगवंताचे होणे हीच समजूत तेवढी खरी आहे. आपल्या देहावर आपली सत्ता नाही, आपल्या पैशावर आपली सत्ता नाही, आपल्या माणसांवर आपली सत्ता नाही, म्हणून आपण कर्तव्य तेवढे करावे आणि ते करीत असताना आपले मन दुश्चित होऊ देऊ नये. आपल्या इच्छेनुसार सर्व गोष्टी घडत नाहीत ही भगवंताची कृपा आहे.
No comments:
Post a Comment