Friday, September 29, 2017

प्रसाद पुष्पे - प्रथम करू या विचार पुरता.

प्रसाद पुष्पे - प्रथम करू या विचार पुरता.

पूजाअर्चा, नामजप, सद्ग्रंथ वाचन यात आपला वेळ फार जातो असे आपल्याला वाटते का? या गोष्टी मनापासून होत नाहीत याची खंत आपल्याला वाटते का? व्यवहारात वावरताना एवढ्या तेवढ्या कारणाने आपल्या मनाचा तोल ढळतो का?

वरील प्रश्नांची उत्तरे आपल्या मनाशी द्यावी आणि मग आपण आपला योग्य विचार करावा.

आजार ओढवतो, छोट्या अपघाताने परस्वाधीन होण्याची पाळी येते तेव्हा आपले वर्तन कसे घडते? भगवंताला उद्देशून अपशब्द नाही ना उच्चारत?

मूर्तीमधील दिव्यत्व मूर्तिपूजेशिवाय नाही कळणार. गणपत्यथर्वशीर्ष, श्रीरामरक्षा स्तोत्र, श्री व्यंकटेश स्तोत्र यांचे पाठ सावकाश झाल्याशिवाय अर्थ आत कसा रिघेल? देवाने आपल्याला उपासनेला बसविले आहे. नवनवीन अर्थ चिंतनातून जाणवून देण्याचे काम तोच अंतःकरणात बसून करवून घेतो असे का नाही समजू?

व्यवहारातली रुक्षता, औपचारिकपणा जाण्यासाठी संतांचा सहवास नित्याचा हवा. त्यासाठी अभंग गायचे, नामजप करायचा, मंदिरात जायचे, ध्यानाला बसायचे. तुम्ही करत असलेली देवपूजा लोकांनी बघत राहावे अशी व्हावी.

चला तर आधी आपला आड भावभक्तीने भरून घ्यायला लागू या म्हणजे मग वेळोवेळी पोहराही भरत जाईल.

हेतू शुद्ध बाळगला तर कृती चांगली होईल.

- श्रीराम बाळकृष्ण आठवले

No comments:

Post a Comment