Sunday, September 17, 2017

प्रसाद पुष्पे - लाज, संकोच, भीड, मर्यादा

प्रसाद पुष्पे - लाज, संकोच, भीड, मर्यादा

लाज, संकोच, भीड, मर्यादा! एकापाठी एक हे शब्द सुचत गेले! लिहूनही बसलो. पण यांचा एकमेकांशी आणि मानवी जीवनाशी संबंध काय आणि कोणत्या प्रकारचा?

आपले बहुतेकांचे चुकते कोठे?

आपण लाजायला हवे तिथे लाजत नाही, नको तिथे लाजतो. देवाचे नाम घ्यायला, देवळात जायला, संध्या करायला लाज वाटते. पण नको ते पाहायला, ऐकायला, बोलायला आणि निंदा करायला लाजत नाही. लज्जा हे केवळ स्त्रीचेच भूषण नाही, पुरुषांचेही आहे.

परकेपणाची भावना संकोच निर्माण करते. पण मग बोलायचे ते राहून जाते. चुटपुट वाटते. सुरवातीला सुदम्याला  श्रीकृष्णाला भेटायचा संकोच वाटत होता. पुढे जाऊ की परतू मागे असे झाले पण श्रीकृष्ण उच्चासन सोडून सुदाम्याकडे धावत गेला व त्याने त्याला कवेत घेतले.

लोक काय म्हणतील असे सारखे वाटणे म्हणजे भीड. यालाच आपण म्हणूया जनलज्जा. ती भीडच एकदा सुटली की गाडी लागली उताराला.

शिमगा सण खरं तर सांगतो शिव गा! पण आपण होलिकोत्सवाचा अगदी शिमगा करून टाकला.

मर्यादशील स्वभाव असणे व्यक्तीच्या दृष्टीने कल्याणाचे. आपण कोण, कुटुंबातले आपले स्थान कोणते, आपण नेमके काय केले पाहिजे या सगळ्याची जाणीव म्हणजे मर्यादेची जाण.

श्रीरामापुढे भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न यांनी आपली मर्यादा जाणली. मर्यादा हा धरबंध आहे. तो सुटता कामा नये.

माणसाचे मनुष्यत्व लज्जेत आहे. भीड वाटली म्हणजे वाटेल तसे वर्तन घडत नाही.

पण आई आणि मूल, देव आणि भक्त ,  पती आणि पत्नी यांचे परस्पर संबंध कसे असतात.

ते सांगायलाच हवे का?

- श्रीराम बाळकृष्ण आठवले.

No comments:

Post a Comment