Sunday, September 17, 2017

प्रसाद पुष्पे - थोडं सोसायला शिकू या!

प्रसाद पुष्पे - थोडं सोसायला शिकू या!

अत्यंत उकडतंय, घामाच्या धारा लागल्यात. विजेचा पंखा स्वतः तापून फिरत आहे पण त्याचा वारा तलखी नाही शांत करू शकत. पण पंखा बंद करून पहा काय होतंय ते.

गंमत आहे नाही! ऋतुचक्र असेच फिरले, फिरत आहे, फिरत राहणार. माठातले पाणी एखादा घोटच प्यावे पण नाही राहवत. थंडगार सरबत प्यावे वाटणार, आईस क्रीम चालेल ना! किती चोचले पुरवतो आपण या देहाचे!

मुद्दाम उन्हात उभे रहावे असे नाही म्हणत कोणी. पण दुर्लक्ष करायला शिकावं, अखंड नामस्मरण चालू ठेवलं, संतवचनांवर चिंतन करीत गेलं की मन उंच उंच जाऊन पोचतं. वातावरणच बदलून जातं सारं.

अंदमान मधे तुरुंगात स्वातंत्र्यवीर कसे राहिले असतील? त्यांना नव्हतं उकडत? त्यांना नव्हते डास चावत? कोलू फिरवावा लागत होता ना?

मंडालेमध्ये लोकमान्य कसे राहात होते?

निसर्गाशी जेवढी जवळीक साधावी तेवढी साधत नाही आपण. झाडे लावतो का? बागकाम करतो का? थंड पाण्याने स्नान करतो का?  न लाजता मोठ्याने देवाचे म्हणतो का? शिवमंदिरात जाऊन गाभाऱ्यात पिंडीजवळ बसून शिवस्मरण करतो का?

असं केल्यास चोचले आपोआप कमी होतील आणि थोडं सोसायला ही शिकता येईल.

- श्रीराम बाळकृष्ण आठवले

No comments:

Post a Comment