परनिंदेचे पातक माथी नको नको देवा
त्याहुनि बरवा चाखावा मी तुझा नाममेवा!ध्रु.
नामरत्न हाती कशाला हवी पापमाती?
निंदेच्या संगती लोटती महापापपंक्ती
जिव्हा केवळ नाम जपू दे वर देई देवा!१
निंदेने मन दूषित होते हानि किती मोठी?
देता घेता प्रेम वाढते करु या गुजगोष्टी
परनिंदेची गोडि न वाटो या जीवा देवा!२
जे दुसऱ्याचे दोष दिसत मज ते माझ्या अंगी
दुर्गुण जावे म्हणुनि रमावे सत्वर श्रीरंगी
शरण येउनी चरण धरुनि मी विनवित तुज देवा!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचानामधी २९० व्या प्रवचनावर आधारित ही कविता)
निंदा ही आपल्या साधनाची होळी करते.
परनिंदा करण्यासारखे पाप नाही. परनिंदा गोड वाटेनाशी झाली की देव जवळ येत चालला असे समजावे. ज्याला स्वतःचे हित करून घ्यायचे असेल त्याने परनिंदा सोडून द्यावी आणि जिव्हा नामाला वाहावी. पुष्कळ वेळा आपले दोष आपल्याला कळतात, ते भगवंताच्या आड येतात हे देखील कळते.
No comments:
Post a Comment