।। श्रीशंकर ।।
सदैव जो शिव, आशुतोष तो, ऐशा कर्पुरगौराची
आरति गाऊ चला सुजनहो अंबेसह महादेवाची ! ध्रु.
भस्म लिंपिले ल्याला तनुवर सहजच व्याघ्राचे चर्म
डम् डम् डम् डम् डमरु निनादे प्रस्थापित करि सद्धर्म
कोऽहं प्रश्ना, उत्तर सोऽहं कला शिकू अभ्यासाची ! १
हर हर म्हणता तिमिर मावळे हासू लागे उष:प्रभा
आपआपली ओळख पटता स्वानंदहि ठाकतो उभा
‘मीच शत्रु मम, मीच मित्र मम’ वाट चालु अध्यात्माची ! २
तिसरा डोळा ज्ञानाचा तो उघडाया दो नयन मिटा
नेट धरुनि नेमास बसा मग भवसागरही होय थिटा
अंतरि दडवुनि राम यात्रि शिव यात्रा करि आनंदाची ! ३
शारीरिक क्षमता ती नंदी वृषभरूप वाहन केले
कामक्रोध हे सर्प विषारी अंगावरती खेळविले
पूर्ण विरागी लेकुरवाळा धन्य शंभुपरिवाराची ! ४
सुधा मिळावी सज्जनांस हा उदात्त हेतू बाळगला
हालाहलही प्राशन केले अतिदिव्या ही शिवलीला
नीलकंठ हे विशेषणच पसरविते कीर्ती शंभूची ! ५
देहाचे आकर्षण घातक अनंग केले मदनाला
विषयातिल विष समूळ नष्टच वंदनीय त्रैलोक्याला
सांसारिक जीवना भूमिका ओळख दृढ अंत:स्थाची ! ६
कधी लास्य तर केव्हा तांडव नर्तन विस्मयकारक ते
लय भिनली देहात पुरेपुर पदन्यास बघता कळते
कलाकार ती मूर्ती वंदित पूजनीय नटराजाची ! ७
हृदयी काशी गंगा नयनी घरकुल हे क्षेत्रच झाले
आरंभी भूपाळी अंती आरति व्रत हे पत्करले
शुभ चिंतावे अशुभ पळे ही खात्री पटण्या भक्तांची ! ८
कालाचा ही महाकाल जो त्या स्मरता भय कुठले हो ?
देह विनाशी जाइल जावो मी शिव भान सदा राहो
कलिमलदहना देइ प्रेरणा आर्त प्रार्थना साधूंची ! ९
पिंड शिवाचे प्रतीक आहे जलधारा बहु आवडते
मंत्रघोष भारून टाकतो श्रवणे मन उन्मन होते
शिवमंगल ते कार्य विधायक पूजा गिरिजारमणाची ! १०
आज्ञांकितता तशी एकता आवश्यकता जाणवते
सामंजस्य नि बंधुभावना हवी हवी सर्वां पटते
श्रीरामाची आस निर्मला शिवानेच पुरवायाची ! ११
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०४.०२.१९९६
No comments:
Post a Comment