Friday, April 14, 2023

जीवनात श्रीराम

 

बालपणी मज अंकी घेउनि आई होउनि वाढविले 
श्रीरामा मज आठवले !१

पिता होउनी धोपटुनी कधि दक्ष राहुनी वळण दिले 
श्रीरामा मज आठवले!२

गुरुजन जितके तुझीच रूपे हासत विद्याधन दिधले 
श्रीरामा मज आठवले!३

बंधू भगिनी मित्र-मैत्रिणी या रूपे मज सौख्य दिले 
श्रीरामा मज आठवले!४

भजन, निरूपण, प्रवचन, कीर्तन, भक्तिगीत हो ऐकविले
श्रीरामा मज आठवले!५

देवघरातील मूर्ती चित्रे तुझीच रूपे जाणवले 
श्रीरामा मज आठवले!६

वियोगदु:खी जवळ येउनी कुणी न  तुजविण शांतविले
श्रीरामा मज आठवले!७

प्रभात समयी जाग आणुनी रामनाम नित घेवविले 
श्रीरामा मज आठवले!८

नाम स्मरता सुधा होउनी अंतरि जाउन तोषविले
श्रीरामा मज आठवले!९

ध्याना बसता श्वासासंगे नाम जोडुनी तू दिधले
श्रीरामा मज आठवले!१०

माझ्या नकळत मला सावरत भक्तिपथावर आणवले 
श्रीरामा मज आठवले!११

रुचे न पूजा तरी आग्रहे पूजेला मज बैसविले 
श्रीरामा मज आठवले!१२

कृतज्ञ रामा तुझा नेहमी मी चुकता तू सावरले 
श्रीरामा मज आठवले!१३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(श्रोतेमुखी रामायण मधून)

No comments:

Post a Comment