सुख आले तर हर्ष नको
दुःखाचा तुज खेद नको!ध्रु.
दुःखाचा तुज खेद नको!ध्रु.
जगरीती ही अशी चालली -
कधी ऊन तर कधी सावली
आत्मचिंतना सोडु नको!१
मनासारखे सदा न घडते
ध्यानी घेती हेच जाणते
धीर मनाचा सोडु नको!२
कर्तव्यी रति ही विश्रांती
सुखदुःखे तर येती जाती
भोग भोगण्या डरू नको!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२७.०४.१९७८
(सुखी संतोषा न यावे। दुःखी विषादा न भजावे।
आणि लाभालाभ न धरावे। मनामाजी।।
आपणया उचिता। स्वधर्मे राहाटता।
जे पावे ते निवांता। साहोनि जावे।।
ज्ञानेश्वरीमधील या ओवीवरील काव्य)
ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या स्वामी माधवनाथांच्या विवरणावर आधारित
No comments:
Post a Comment