Friday, August 7, 2026

तुझी भक्ति रामा आनंद देते!

तुझी भक्ति रामा आनंद देते!ध्रु.

बोरे वनीची
आस मनीची
रामास शबरी अशी मोहवीते!१

कृष्णा सुदामा 
बहिश्चर आत्मा
पोह्यांची मुष्टी मातृस्तन्य वाटे!२

नको कर्ममार्ग 
नको ज्ञानमार्ग? 
मातेस लेकरू कैसे भरवीते!३

नाम वेदतुल्य
नाम देवतुल्य
रूपाची ओळख नामातच होते!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक २२० (७ ऑगस्ट) वर आधारित काव्य.

भगवंताचे स्वरूप ज्याला समजले त्याला सृष्टीमध्ये सर्व ठिकाणी आनंदच दिसेल. भक्ति ही निश्चित श्रेष्ठ आहे. भक्ति म्हणजे परमात्मस्वरूपाचे परमप्रेम होय. कर्म, ज्ञान, योग ही साधने असून भक्ति हे साध्य आहे. नुसता कर्ममार्गी कर्मठ व जड बनतो. ज्ञानमार्गी माणसांना अभिमानाची बाधा लवकर होते. म्हणून खरा भक्त या सृष्टीला मिथ्या न मानता भगवंताची लीलाच समजतो. रूपाची ओळख खऱ्या नामानेच होते. जगत हे भगवंतापासून भिन्न नाही. जगतात आढळणारी सर्व रूपे भगवंताची आहेत. देशकालाच्या पलीकडे जे कायम राहते ते खरे सत्य. प्रत्यक्ष आकाराने आलेली अनेक रूपे नाहीशी झाली तरी त्यांचे नाव टिकून राहते. म्हणजे नाम हे देशकालाच्या मर्यादेच्या पलीकडे असते. म्हणून ते रूपापेक्षा जास्त सत्य होय व जे सत्य आहे ते श्रेष्ठ असलेच पाहिजे.

Wednesday, August 5, 2026

नामात रहावे, रामास भजावे!

नामात रहावे, नीतीस धरावे! 
नीतीत रहावे, रामास भजावे!ध्रु.

राम सदय माउली
धरत शिरी साउली 
श्रद्धेने रामनाम कंठि धरावे!१

शुद्ध मने भक्ति करी 
अंतरि मग वसत हरी 
हसत स्मरावे, स्मरत हसावे!२

शरण शरण रघुनाथा 
टेकविला पदि माथा 
हीण जळावे, मन उजळावे!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक २१८ (५ ऑगस्ट) वर आधारित काव्य.

देव कसे आणि केव्हा साहाय्य करील याचा आपण कसा अदमास घेऊ शकू बरे? सदैव नामात राहण्याचा प्रयत्न करा.  नीतीला धरून राहा. त्यानेच तुम्हाला भगवंत भेटेल. परमार्थात नीतीला, शुद्ध आचरणाला फार महत्त्व आहे. जो शुद्ध मनाने परमेश्वराचे चिंतन, नामस्मरण करतो त्याला साहाय्य करण्यास परमेश्वर सदैव तत्पर असतो. आपण त्याला शरण जाऊन त्याच्या नामाचे प्रेम मागू या. तो दीनदयाळु भक्तवत्सल परमेश्वर आपल्यावर कृपेचा वर्षाव करील याची खात्री बाळगा.

Tuesday, August 4, 2026

रामाचे स्मरण देते नित्य समाधान!

रामाचे स्मरण देते नित्य समाधान!ध्रु.

मुखी रामनाम 
करू हाति काम
वासनेचा फास तुटण्या करू नामगान!१

रामी अनुराग 
प्रपंची विराग 
खरी पोथी कळली त्याच्या जीवनात राम!२ 

झडो देहबुद्धी
लागु दे समाधी
शरण गुरुसि सत्वर जाता करी येत ज्ञान!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक २१७ (४ ऑगस्ट) वर आधारित काव्य.

भगवंताचे होणे हे माझे या जन्मातील मुख्य काम आहे असे समजावे. रात्रंदिवस मी भगवंताचा कसा होईन याचा सारखा विचार करावा. आपली वासना कोठे गुंतते हे पहावे. विचार आणि नाम यांनी वासनेला खात्रीने जिंकता येईल. मग आपले कर्तेपण आपोआप मरून जाईल. वासना सूक्ष्म व लवचिक आहे पण आपण तिला देहबुद्धीने अगदी घट्ट बनवून टाकतो, मग ती काढणे फार कठीण जाते. विषयांची वासना सर्व नाहीशी झाल्यावर जी उरते ती भगवंताची वासना होय. पोथी ऐकून प्रपंचाविषयी ज्याला वैराग्य आले त्यालाच पोथी खरी कळली असे म्हणावे. पोथीत सांगितलेले ऐकून जो ते आचरणात आणतो तोच खरा श्रोता होय.