देवा तुज जन नित्य प्रार्थिती
कोणी तव प्रतिमांना पुजिती
मला मात्र निष्क्रीय बघोनि
जन म्हणति मज 'नास्तिक' नास्तिक' ।।१।।
मला न मूर्तिपुजा आवडे
बाह्याचरणी मम मन न रमे
मी तुज चिंतित असे मनीं पण
जन म्हणती मज 'नास्तिक' नास्तिक' ।।२।।
बाह्यात्कारी तव स्तुति करुनि
हृदयि भयानक द्वेष धरुनि
राक्षस जगि या आस्तिक ठरती
जन म्हणती मज 'नास्तिक' 'नास्तिक'।।३।।
दगडामघ्ये देव असे का?
आकाशामधिं नित्य वसे का?
सर्वाभूतीं ईश्वर बघता
जन म्हणती मज 'नास्तिक' नास्तिक' ।।४।।
पुरुनी टाका द्वेष भावना
सारे जग हे एक कल्पना
उरी बाळगा असे सांगता
जन म्हणती मज 'नास्तिक' नास्तिक' ।।५।।
- श्रीराम बाळकृष्ण आठवले
२७ जानेवारी १९५५
No comments:
Post a Comment