सांग भगिनी! घालू तुजला कोणती ओवाळणी?
लाडका भाऊ तुझा मी पातलो गावाहुनी।।ध्रु.।।
गगन किती हे उंच आहे, येतसे का मोजतां
रत्नाकराची भव्यता येईल कोणा वर्णितां
माया तुझी तैशी मला बोलुं ना देते अता
मूक माझ्या भावना या दाटु बघती लोचनी!१
ताई, मजसाठिच तू गे देह अपुला झिजविला
प्रेमरस पाजुनी तू मज सुस्वभावी बनविला
तुजपुढे मी सान मूर्ति काय देऊ मी तुला?
वाटते ऐसे मला, व्हावे न मी कधि अनृणी!२
तेल उटणे लावुनि गे न्हाउ घालि तू मला
होउ दे अजि मज फिरूनी बंधु तुझा सानुला
बाळपणचा सोहळा तो फिरुनि लाभो आजला
भेट परि गे अल्पशी तू गोड घेई मानुनी!३
- श्रीराम बाळकृष्ण आठवले
७ ऑगस्ट १९५५
No comments:
Post a Comment