कसे जगावे?
कसे जगावे? प्रश्न तुला का अवघड हा पडला
निसर्ग निरखुन पहा मानवा प्रश्न कसा सुटला
बीज स्वतःला दडपून घेई आधी मातीत
मेघ बरसतो नकळत वरती अंकुर येतात
फुलाफळांनी झाड लहडते सुगंध दरवळला
गुण दुसऱ्याचे जगा कथावे वारा हे शिकवी
ओला वारा, गंधित वारा तप्त जनां सुखवी
खुल्या मनाने करी स्वागता कण कण मोहरला
आकाशाचे छत्र शिरावर दूर दूर पसरे
आसऱ्यास जे येती कोणी घे जवळी सारे
मी सगळ्यांचा, सगळे माझे पाठ न का शिकला
ही धरती आधार देतसे सोसत राहे किती
अंगावरती भले विपत्ती येऊ द्याव्या किती
धीर न सोडी ठाम ठाक तू ती शिकवी तुजला
पाणी कैसे तहान शमवी ते तर झुळझुळते
जे जवळी ते जनांस द्यावे जीवन रसरसते
तू सगळ्यांशी वाग सारखा वृत्तीने मोकळा
कुणी निंदु दे कुणी वंदु दे सोड न माणुसकी
देवाशी रे ऐसी आहे सुंदर बांधिलकी
गीता ऐसे जगण्या शिकवी जो शिकला तरला
- श्रीराम बाळकृष्ण आठवले
No comments:
Post a Comment