विघ्नहर्त्या श्रीगणेशा, तुज जिजाई वंदिते!
मागणे हे मागते!ध्रु.
या विनाशातून सृष्टी निर्मिण्या दे प्रेरणा
देवकार्यी देशकार्यी तूच देणे चेतना
जाऊ दे नैराश्यभिती शिवकुमारा प्रार्थिते!१
पालटूनी रूप रडके पुण्यपत्तन हासु दे
लाभु दे सर्वा निवारा लक्ष्मि येथे नांदु दे
जोम दे निर्धार दे या दिनी तुज सांगते!२
ऋद्धिसिद्धीनायका मोरया वरदायका
स्थापना करितो इथे दास्यबंधनमोचका
सर्व श्रद्धा, सर्व शक्ती चरणि तुझिया अर्पिते!३
हाच अमुचा श्रीगणेशा साक्षि तुजला ठेविले
राष्ट्रमंदिर बांधणे ध्येय चित्ती बिंबले
अविचला श्रद्धाच भक्ता पाठराखिण राहते!४
राज्य व्हावे हिंदवी निश्चयो दृढ जाहला
सांगुनी सारे तुला, बाळ चरणी घातला
दे जयश्री, दे धनश्री, भाववेडी विनविते!५
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
No comments:
Post a Comment