भारतभूमी माता - आम्ही तिची मुले
नमनासाठी सदैव अमुचे कर जुळले!ध्रु.
जीवन नाही भोगासाठी
ते तर आहे त्यागासाठी
दधीचि मुनि शिकवुनि गेले!१
सत्यच ईश्वर प्रेरी सकलां
रामचंद्र या अंतरि भरला
राम होउनी सत्य जीवनी अवतरले!२
निजकर्तव्या कंबर कसली
फलाशा न या मनास शिवली
गीताईने स्तन्य आम्हां प्रेमे दिधले!३
धर्म जगावा लाभे ईश्वर
करणी बनवी नरास ईश्वर
धर्मच जीवन समीकरण हे कळलेले!४
मातेसम जगि कुणीच नाही
भगवंताला नाही आई
मातृसुखास्तव प्रभुहि कितिदा अवतरले!५
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२९.०४.१९८०
No comments:
Post a Comment