"प्रभात झाली स्वरूपनाथा या हो मम अंतरी, सोऽहं घोषची घुमत रहावा मानस गाभारी"
अण्णांनी म्हणजे माझे वडील श्रीराम बाळकृष्ण आठवले यांनी त्यांचे सद्गुरू, पावसचे स्वामी स्वरूपानंद यांच्यावर लिहिलेली ही भूपाळी शमिका भिडे यांनी स्वामी स्वरूपानंदांच्या जयंतीच्या दिवशी यूट्यूब वर टाकली आणि नवीन वर्षात ती व्हॉट्स ॲपवर खूप viral झाली.
खूप छान वाटलं.
शमिका भिडे यांनी खूप छान गायली आहे भूपाळी. भूपाळी बरोबरच त्यांनी अण्णांना पण घरोघरी पोचवले.
या निमित्ताने खूप आठवणी जाग्या झाल्या. अण्णांना ८० वे वर्षे लागत होते म्हणून २०१२ मध्ये साधारण एप्रिल मध्ये राष्ट्रीय कीर्तनकार, प्रवचनकार आणि संगीत नाट्य रंगभूमीचे प्रथितयश कलावंत श्री चारुदत्त आफळे यांना सौ यश:श्री अण्णांकडे घेऊन गेली आणि त्यांना काही कविता हव्या आहेत असे अण्णांना सांगून अण्णांच्या निवडक कविता अण्णांच्या आवाजात मोबाईल वर रेकॉर्ड करून घेतल्या. त्यात ही भूपाळी पण होती. त्यांच्या ८० व्या वर्षी या गाण्यांची एक सीडी काढायची आणि अण्णांना सरप्राइझ द्यायचे असा आमचा मानस होता. पण तो योग नव्हता. ऑगस्ट २०१२ मध्ये अण्णांना admit करायला लागले त्यांची प्रकृती तेंव्हा गंभीर होती. त्यावेळी प्रसाद जोशी (प्रसिद्ध तबला वादक) हे साऊंड व्हिजन या त्यांच्या स्टुडीओ मध्ये ही सीडी करत होते. त्यांनी सांगितले की भूपाळीचे रेकॉर्डिंग पूर्ण झाले आहे. ती भूपाळी मोबाईल वर घेऊन अण्णांना icu मध्ये ऐकवली. त्यांनी मान डोलावली आणि हसले. दुसऱ्याच दिवशी अण्णा गेले.
त्यानंतरच्या दिवाळीमध्ये या सीडीचे डॉ. संजय उपाध्ये यांच्या हस्ते प्रकाशन केले. यात ही भूपाळी सुरवातीलाच आहे. आम्ही स्क्रिप्ट दिलं नव्हतं चारुदत्त आफळे यांना, त्यामुळे एक दोन ठिकाणी शब्द बदलले गेले आहेत. पण त्यांनी गायलेली भूपाळी सुद्धा यूट्यूबवर आहे आणि लोकांना ती आवडत देखील आहे.
त्यानंतर परत आता शमिका भिडे यांनी ही भूपाळी गायली आणि हे सगळे आठवले.
आम्ही आमच्या लहानपणापासून ही भूपाळी ऐकतो आहोत. अण्णांच्या आवाजात ती भूपाळी ऐकणे म्हणजे पर्वणी असायची. कारण शब्दाशब्दात भाव असायचा, आर्तता असायची, भक्ती असायची. सहज सोपे शब्द आहेत या भूपाळी मधले पण आचरणात आणायला अवघड. त्यातले थोडे जरी आचरणात आले तरी स्वामींची कृपाच.
"माझे माझे लोप पावू दे", "चित्ती वचनी कृतीत यावी सहज सुधा माधुरी", "प्रसन्नतेची प्रभा सदोदित झळको वदनावरी". असे सहज सोपे शब्द आहेत या भूपाळी मधे, पण केवढा मोठा अर्थ आहे त्यात..
भूपाळी हा परमेश्वराला जागे करण्यासाठी पहाटे भूप रागात गायला जाणारा काव्यप्रकार. सदर भूपाळी लोकांना भावली असावी ती म्हणजे त्यातले नुसतेच शब्द आणि संगीत यामुळेच नाही तर त्यातल्या आर्ततेमुळे, त्यातल्या भक्तीभावामुळे आणि सद्गुरू आणि भक्त यांच्यात असलेल्या भावबंधामुळे. अण्णांची स्वामींवर असलेली श्रद्धा, भक्ती या भूपाळी मध्ये पूर्णपणे उतरली आहे.
ही भूपाळी १९७३ मध्ये रचली आहे आणि पावस येथील स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिरात खूप पूर्वीपासून पहाटे ५.१५/५.३० ला ती रोज म्हटली जाते. आम्ही जेव्हा केव्हा पावसला जातो तेव्हा हमखास त्यावेळी मंदिरात जातो भूपाळी साठी.
शमिका भिडे यांनी गायलेल्या या भूपाळी मुळे या गोष्टींना परत एकदा उजाळा मिळाला.
शमिका भिडे यांनी गायलेली आणि चारुदत्त आफळे यांनी गायलेल्या भूपाळी ची लिंक सोबत देत आहे.
श्री. चारुदत्त आफळे आणि आता शमिका भिडे यांचे मन:पूर्वक आभार ही भूपाळी जनमानसात नेल्याबद्दल..
- सुयोग श्रीराम आठवले
२१.०१.२०२२
No comments:
Post a Comment