।। श्रीगजानन प्रसन्न।।
तनी स्वस्थता सर्वदा या असावी
तरी आपली जीभ अंकीत व्हावी
जरा ऊदरी रिक्तता राहु द्यावी
अशी साधना हातुनी या घडावी १
नव्हे देह मी भूमिका ठाम व्हावी
सदा सर्वदा वृत्ति रामी मुरावी
मना वेदना नामघोषी विरावी
अशी साधना हातुनी या घडावी २
मना नाम घे तूच आहेस दैवी
वृथा वावगी काय चिंता वहावी
क्षणाने क्षणा सार्थकी नित्य लावी
अशी साधना हातुनी या घडावी ३
जिथे पोचणे लक्ष तेथेच ठेवी
विवेके सदा वृत्ति तू आवरावी
जरी जिद्द ती अंगि तू चेतवावी
अशी साधना हातुनी या घडावी ४
मना हो तपस्वी, मना हो मनस्वी
मना नम्र होई तदा तू सुदैवी
उभारी अशी अंगि तू आणवावी
अशी साधना हातुनी या घडावी ५
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१६.०९.१९९६
No comments:
Post a Comment